हिंदूच नव्हे तर पुनर्जन्म न मानणाऱ्या ख्रिस्ती धर्मियांमधेसुद्धा २० टक्के लोक पुनर्जन्म मानतात. जन्माला आल्यावर पहिला श्वास घेताच मेंदूला झटका बसतो आणि आत्म्याची पूर्वजन्मांची स्मृती विस्मृतीते जाते. नवीन मेंदूमध्ये फारच थोडी राहाते. असं सांगितलं जातं. प्राणिमात्राचा त्याच्या पूर्वजन्मातील कर्मांनुसार कोणत्याही प्राणी अगर वनस्पती योनीमध्ये जन्म होतो. अशा ८४ लक्ष योनीपैकी (स्पीसीज) मनुष्य योनीमध्ये जन्म मिळायला खूप पुण्यसंचय असावा लागतो. मनुष्य जन्म मिळाल्यावर त्याचा योग्य उपयोग न केल्यास पुन्हा नीच योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. मनुष्य जन्माचा उपयोग या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून बाहेर पडण्यासाठी करून घ्यायचा असतो. इत्यादी तर्कशास्त्र हिंदू धार्मिक मंडळी लढवत असतात.
प्रथम दर्शनीच हा युक्तिवाद किती तर्कदुष्ट आहे हे कोणाच्याही लक्षात येईल. नास्तिक लोक तर आत्म्याचे अस्तित्वच नाकारतात. मानसिक-बौद्धिक व्यक्तित्वासंविषयीच्या(सायको-न्युरल आयडेंटिटी) गृहितप्रमेयानुसार मेंदूची अवस्था म्हणजेच मेंदूचे कार्य. सर्व बौद्धिक कार्य मेंदूच्याच कार्याशी निगडित असल्याने वैयक्तिक गुणावगुण, स्वभाववैशिष्ट्ये, ज्ञान, स्वसंवेद्यता इत्यादी सर्व एका जन्मातून दुसऱ्या जन्मातील मेंदूमध्ये स्थलांतरित होणे अशक्य कोटीतील ठरते. अशा तऱ्हेने वैयक्तिक ज्ञान-स्मृती-गुणावगुण यांचे स्थानांतर/देहान्तर (ट्रान्समायग्रेशन) शक्य आहे असे मानायचे झाल्यास वर्तनवादी मज्जाविज्ञानात (बिहेव्हियोरल न्यूरोसायन्स) आज होत असलेले संशोधन म्हणजे मूर्खपणाच ठरेल. तात्विक दृष्ट्या सुद्धा आत्मा मानवामध्ये शिरतो किंवा बाहेर पडतो, त्या शरीरावर आणि मनावर ताबा मिळवतो आणि तेही कोणाला त्याची चाहूलही न लागता असं मानणं कसं शक्य आहे? जोपावेतो एखादा शास्त्रज्ञ पुनर्जन्माचे खोटे ठरविण्यायोग्य (फॉल्सिफियेबल) गृहीतक मांडत नाही तोपावेतो या पूर्वजन्मातील स्मृती इत्यादी संकल्पना भ्रामक विज्ञान म्हणून रद्दबातल केल्या पाहिजेत.
