आपण हे करू शकता

अंधश्रद्धा निर्मूलन हे प्रत्येकाने करायचे काम आहे!

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर म्हणायचे की बाबाबुवांना आधार देणारी व्यवस्था पाच हजार वर्षांची आहे! इतक्या वर्षांमध्ये लोकांच्या डोक्यात जे घट्ट खिळे ठोकलेले आहेत ते तीस वर्षांमध्ये आणि तेही सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकटी अंधश्रद्धा निर्मूलन समिती काढू शकेल का? नाही. 

परंतु तरीही डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी मूठभर सहकार्‍यांच्या सोबतीने तीस वर्षांपूर्वी महाराष्ट्र ढवळून काढायला सुरुवात केली आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ उभी राहिली. महाविद्यालयीन तरुण, शिक्षक, प्राध्यापक, व्यावसायिक, कामगार अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे स्त्री-पुरुष कामाशी जोडले गेले. डॉक्टर म्हणायचे की नोकरी- व्यवसाय, कौटुंबिक जीवन या सार्‍यात गुंतलेली सामान्य माणसे देखील या कामाला भरपूर हातभार लावू शकतात. कोणी महाविद्यालयात भाषण करेल, कोणी मुलांना गोष्टी सांगेल, कोणी ग्रामीण भागात भोंदूबाबा चमत्कार करून कसे फसवतात त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवेल, कोणी प्रबोधनाची गाणी गाईल व पथनाट्य करेल, कोणी निधी संकलनासाठी मदत करेल, कोणी बाबा-बुवांना आव्हान देण्याचे काम करेल. तुम्हाला अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करायचे असेल तर या कामाशी जोडून घेण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. 

जेवढा पुरावा तेवढा विश्वास या वैज्ञानिक विचार पद्धतीमुळे माणसाची प्रगती शक्य झाली. आपल्याला ही वैज्ञानिक दृष्टीकोनाची ज्योत महाराष्ट्रातील प्रत्येक मनापर्यंत पोचवायची आहे. जे या चळवळीशी जोडले गेले ते समाजाला विवेकी बनविण्याच्या या प्रक्रियेला चालना देऊ शकले. समाज घडविण्याच्या कोणत्याही  कामात सहभागी होण्याचा आनंद असतोच परंतु डॉक्टर दाभोलकर तरुणांना सांगायचे की या कामाने समाजाचे कल्याण होईल हा भाग नंतरचा परंतु त्यामुळे तुमचे नक्की कल्याण होईल कारण तुम्ही निर्भय बनाल, विवेकबुद्धीने निर्णय घ्यायला शिकाल!

ज्यांना या कामाशी जोडून घ्यायचे आहे त्यांनी जरूर संपर्क करा. 

आपण सगळे मिळून बदल घडवूया !