सजीवसृष्टीमध्ये अनेक जाती-प्रजाती आहेत. भूत ही जाती मात्र त्यामध्ये नाही. भुतं असतात पण केवळ आपल्या मनामधे. आपलं मन जी भुतंरंगवतं त्यांचे दोन प्रकार असतात. माया किंवा विभ्रमामुळे तयार झालेली भुतं हा आत्मवंचनेचा प्रकार आणि दुसरा प्रकार मानसिक असंतुलनामुळे भासणाऱ्या भुतांचा. आत्मवंचना ही जाणून बुजून केलेकी ढोंगबाजी तरी असते किंवा सांस्कृतिक अगर सूचनांच्या दबावा खाली घडलेलं वर्तन असतं किंवा इंद्रियजन्य कल्पना असतात. ह्यातील एका अगर अनेक कारणांमुळे आपल्या मनामध्ये भूत साकारतं.
ढोंगी लोक भोळ्या लोकांना आपल्या स्वार्थासाठी भूत असल्याची खात्री पटवून देतात. लहानपणापासून आपल्याला भुताखेतांच्या गोष्टी ऐकायला लागतात. त्यामुळे ती आहेत की नाहीत अशी शंकाही मनात न आणता आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. सूचना अमलात आणण्यास मानवी मन तत्पर असतं. सारं जाहीरातींचं जग आपल्या मनाच्या या तत्परतेवर अवलंबून असतं. सूचनांनुसार आपलं वर्तन बदलतं. आपल्याला जर कोणी भुतं असल्याचं खात्रीपूर्वक सांगितलं तर आपण त्यावर विश्वास ठेवतो. आपल्या इंद्रियांद्वारेच आपण ज्ञान मिळवत असतो.पण अनेक वेळा आपण केवळ कल्पना करतो- दोरीलाच साप समजतो. या इंद्रियभ्रमामुळे आपण अस्तित्वात नसलेली भुतंही असतात असं मानतो. सायकॉसिस या मानसिक आजारामुळेही भुतांवर विश्वास बसतो. मेंदूच्या कार्यांतील बिघाडामुळे कोणत्याही बाह्य कारणांशिवाय भुतांचं अस्तित्व जाणवतं.
