परासामान्य (पॅरानॉर्मल) कृतींविषयी लोक बरंच काही बोलत असतात. पुष्कळ जण तर भुतं पाहिल्याचं शपथेवर सांगतात. तुम्हाला हे खरं वाटतं का?

कल्पना करा, अर्ध्या रात्री तुमच्या झोपण्याच्या खोलीमध्ये पावलांचा धपधप आवाज आला तर आपल्या खोलीत काहीतरी अभद्र वावरत आहे असं वाटतं; श्वासोछ्वासाचा भास होतो; आणि त्याहीपेक्षा भयानक म्हणजे तुम्ही स्वतः गलितगात्र झालेले असता; बोटही हलवू शकत नाही. पावलं तुमच्या जवळ येवू लागतात; तुम्हाला कोणीतरी स्पर्श करतं; कोणाचा तरी हलका हात तुमच्या अंगावरून फिरतो. तुम्ही अगदी निश्चल असता केवळ श्वास घेत असता. तुम्हाला डोळे सुद्धा उघडता येत नाहीत. तुम्हाला हवेत तरंगल्याचा भास होतो आणि मग सर्वच नाहीसं होतं. थोड्या वेळाने तुम्ही जागे होता, नेहमीप्रमाणे हालचाल करीत. खोली अजून शांत आणि अंधारीच असते. ही विचित्र घटना म्हणजे मज्जातंतूंची एक अवस्था आहे ज्याला झोपेतील पक्षाघात (स्लीप पॅरॅलिसिस) म्हणतात. ही घटना वास्तव आहे आणि त्यामुळे भुतांचं अस्तित्व, उडत्या तबकड्या किंवा मंगळावरून आलेल्या प्राण्यांमुळे अपहरण अशा तऱ्हेचे परासामान्य अनुभव येतात.