पूर्वायुष्य आणि भविष्य कथनाचा हा धंदा चेन्नईजवळ असलेल्या ताम्बरम येथे चालतो. भूतकाळ व भविष्यकाळ जाणण्याचे ढोंग करणारे हे भोंदू आपल्याकडे प्राचीन काळच्या ऋषींनी लिहिलेली ताडपत्रे असून त्यावर प्राचीन द्राविडी भाषेत सर्व माणसांचे भूत व भविष्य लिहिलेले आहे असा दावा करतात. त्यावर ते असेही सांगत असतात की हे सर्व लिखाण गूढलिपीमध्ये लिहिलेले असल्याने ते स्वतःच केवळ त्यावरील मजकूर वाचून त्याचा अर्थ लावू शकतात. त्यासाठी त्यांना त्या व्यक्तीची फक्त नाव, कुटुंबाची माहिती, गोत्र, जन्मस्थळ, जन्मवेळ, लिंग इत्यादी माहिती पुरवावी लागते. एवढ्यावरच त्या पौराणिक माहितीच्या जंजाळातून ते तुमचे भूत-भविष्य सांगू शकतात.
या भोंदूंची एक विशिष्ट कार्यपद्धती असते. त्याच्या सहाय्याने ते त्यांच्याकडे येणाऱ्या भोळ्या लोकांची बरीचशी माहिती गोळा करतात. त्यांच्या सेवेचा बराचसा मोबदला गिऱ्हाइकाकडून वसूल केल्यानंतर ते काही ताडपत्रे काढून तुम्हाला असं भासवतात की जणू तुमच्या जन्माअगोदरच तुमचं भविष्य प्राचीन ऋषीमुनींनी लिहून ठेवलेलं आहे. यावरील माहिती-नातेवाइकांची नावं, तुम्ही गेले असलेली स्थळं, जन्मखुणा, कामधंदा व मिळकतीविषयीची तपशीलं इत्यादी माहिती-त्यांना तुम्हीच पहिल्या भेटीमध्ये पुरविलेली असते. तीच माहिती त्यांनी ताडपत्रीवरून मिळविली असे तुम्हाला भासवतात. त्या ताडपत्रीवर नक्की काय लिहिले आहे किंवा त्या ताडपत्र्या कार्बन डेटिंगपद्धतीने किती जुन्या आहेत याचा शहानिशा करण्याचा आजपावेतो प्रयत्नच झालेला नाही. एक साधा विचार करा. त्यांच्याकडे जगातील सर्व माणसांचे भूत-भविष्य लिहिलेल्या ताडपत्र्या असल्या तर त्या सांभाळून ठेवण्यासाठी किती जागा लागेल?
इथे आश्चर्याची एक गोष्ट अशी की या सगळ्या थोतांडाचा पुरस्कार वायुसेनेतील एक अधिकारी करीत होता आणि या टोळक्याला पुण्याला आणण्याच्या खटाटोपात होता. असल्या भोंदूंवर आपला पैसा उधळायची लोकांना खोड असते. त्यांच्याशी फक्त योग्य तऱ्हने सलगी करून गोड बोलता आले पाहिजे. वास्तवात वावरतांना लोक अनुभवातून शहाणपण शिकत नाहीत. परंतु विवेक मात्र आपल्याला असल्या सर्व गोष्टींवर भाभडेपणाने विश्वास न ठेवता शंका उपस्थित करण्यास प्रवृत्त करतो. गोडगोड बोलून दुसऱ्या माणसांच्या मनामध स्वतःविषयी एकदा विश्वास निर्माण केला की मग त्यांना हवे तितके लुबाडता येते अशी या भोंदूंची शिकवण असते.
