एखाद्या माणसाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या अतृप्त राहिलेल्या इच्छांमुळे त्याचा इतस्ततः वावरणारा आत्मा भूत बनतो हे खरे आहे का?

मध्याश्मयुगामध्ये भुताची संकल्पना उदयास आली असावी. ही कल्पना म्हणजे आदिमानवाने स्वप्नांचं स्वरूप आणि जीवन मरण यांच्यातील फरक जाणून घेण्यासाठी केलेला प्रयत्न असावा. कालांतरानुसार या कल्पनेमध्ये बदल होत गेले पण ती कल्पना टिकून राहिली कारण अनेक लोकांना या कल्पनेमुळे मरणाच्या भीतीतून थोडासा दिलासा मिळतो.
परंतु आता विज्ञानातील प्रगतीमुळे मानवी जीवन म्हणजे नैसर्गिक-भौतिक प्रक्रिया असतात आणि त्यामध्ये एखाद्या अतिभौतिक शक्तीचं अस्तित्व मानण्याची गरज नाही हे सिद्ध झालेलं आहे. शिवाय मानवासहित सर्व जीवसृष्टी जैविक उत्क्रान्तीच्या तत्त्वानुसार सिद्ध झाली आहे आणि ह्या नैसर्गिक प्रक्रियेमधून आत्म्यासारखे अतिनैसर्गिक सृजन होणे अशक्य आहे हे आता सर्वमान्य झाले आहे. आपण पूर्णपणे नैसर्गिक रीत्या घडलेलो आहोत आणि आपल्यामध्ये काही अतिनैसर्गिक अंश नाही असे मानण्यास पुरेसा आधार आहे.
आत्म्याचे अस्तित्व हा भूत मानण्यामागचा आधार आहे. हा आत्माच काल्पनिक असल्याने त्याचे अगर भुताचे इतस्ततः वावरणे हेही काल्पनिकच असणार.