फलज्योतिष

फलज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्या बहुतेकांना फलज्योतिषाची उत्पती किंवा त्यातून केलेली भाकिते कशाच्या आधारवर केली जातात याविषयी काहीच माहिती नसते. त्यांच्या स्वतःबाबत अगर त्यांच्या मित्रांबाबत केलेल्या भाकितांपैकी काही भाकिते खरी ठरल्याचा त्यांना अनुभव आलेला असतो. आणि तेवढ्यावरून त्यांचा फलज्योतिषावर विश्वास बसतो. जुन्या रूढी आणि समजुतींवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची मनोवृत्ती हेही त्याचे आणखी एक कारण आहे. पण यातील नवल वाटण्याजोगी गोष्ट अशी की जी जोतिष्यांनी केलेली भकितं साफ चुकीची ठरली ती मात्र हे लोक पार विसरून जातात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. चुकीच्या भाकितांचं समर्थन अनेक प्रकारांनी केलं जातं. या शास्त्राचं सखोल ज्ञान असलेले ज्योतिषी विरळाच असतात; साधारण ज्योतिषी सहजपणे चुका करू शकतात; शिवाय ज्योतिषींना दिलेली जन्मवेळ तरी अगदी अचुक असतेच असं नव्हे त्यामुळेही अंदाज चुकतात; ही काही ज्योतिषशास्त्राची चूक नव्हे; इत्यादी अनेक कारणं दिली जातात. भाकिते ज्यावर अवलंबून असतात ते असले मोघम घटक कोणीच दूर करू शकत नाही. त्यामुळे फलज्योतिषींच्या भाकितांचं मूल्यमापन करण अशक्य होवून बसतं.

गृहीत गोष्टी: शकुन-अपशकुन, जमीनीखालील खनीज अगर पाणी आहे का ओळखणं, भाकीत करणं अशा अद्भूत शक्तींचं अस्तित्व मानणं हा मानवी मनाचा दुर्दैवी कमकुवतपणा आहे. त्याचे अर्थशून्य ठोकताळे बाजूला केले तर फलज्योतिष म्हणजे भविश्यात पतंग उडविण्या सारखं उरेल. त्यातील तत्त्वं पोरखेळ वाटावा एवढी सोपी आहेत: व्यक्तीचं स्वभाव, गुणावगुण आणि दैव त्याच्या जन्माच्या वेळी सूर्यमालेतील ग्रहांची राशीचक्रामधली स्थाने आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आकृतिबंधानुसार निश्चित केली जातात. ग्रहांमध्ये सूर्य आणि चंद्र या तारा आणि उपग्रहाचाही समावेश आहे. या सर्वांची स्थाने कुंडलीमध्ये दाखविलेली असतात. त्यावरून फलज्योतिषी त्या व्यक्तीचा (किंवा कंपनी इत्यादींचा) भविष्य काळातील जीवनक्रम काय असेल याचे भाकीत करतात, संभाव्य धोके, अडचणींची सूचना देवून योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. हे ग्रहतारे-नक्षत्र आपल्यापासून किती दूर आहेत आणि ते आपल्यावर काही परिणाम करू शकणे अशक्य आहे हे काही लोक जाणतात. परंतु जगभरातील इतर लाखो-करोडो लोक आपले आरोग्याबाबतचे, व्यवसायातील, किंवा वैयक्तिक बाबीतील निर्णय फलज्योतिषी आणि माध्यामांतील राशीभविष्यावरील लिखाणावरून घेतात.

मानवी जीवनांतील अनिश्चितता हे या अंधविश्वासाचं एक कारण आहे. एरवी संख्या शास्त्र आणि विज्ञान यांच्या कसोटीवर फलज्योतिष मुळीच टिकणार नाही. कुंडलीवरून भविष्य ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतीमध्ये विवेकाला पटणार नाहीत अशा अनेक गोष्टी गृहीत धरल्या जातात. भ्रामक विज्ञानाच्या मदतीने फलज्योतिषी त्यांचं समर्थन करतात. त्या गोष्टी अशा:

१. सर्व ग्रहांमधून किरणोत्सर्ग होत असतो. ही किरणे पृथ्वीवर सर्व ठिकाणी एकाच वेळी पोचतात. त्यासाठी जिथे आवश्यक होईल तिथे ही किरणे पृथ्वीच्या घनद्रव्यातूनही पलिकडे जातात. राहू आणि केतू म्हणजे तर केवळ काल्पनिक बिंदू आहेत त्यांच्यातूनही ग्रहांसारखाच किरणोत्सर्ग होतो.
२. पृथ्वीवर पोचण्यापूर्वी या किरणांचं दहा घटकांमध्ये पृथःकरण होतं. प्रत्येक घटक कुंडलीतील वेगवेगळ्या घराचं वेगवेगळं फळ देत असतो.
३. ग्रहांच्या अनेक दृष्टी असतात. कुंडलीतील विशिष्ट घरांवर त्यांची विशिष्ट दृष्टी असते आणि त्यावरून माणसाचं भविष्य ठरतं. ही सर्व कामं करण्यासाठी ग्रहांना फलज्योतिषाच्या नियमांचं ज्ञान असतं आणि दैवी शक्तीही असते.

भविष्यकथनासाठी फलज्योतिषींना दैवी अनुग्रह हवा असतो त्यासाठी ते वैज्ञानिक जिज्ञासेला फाटा देतात. ते जितकी खरी भविष्ये सांगतात तेवढीच किंवा त्यापेक्षाही जास्त खोटी भविष्ये असतात. त्यामुळे सारासार विचार करणाऱ्या माणसाला फलज्योतिष एक थोतांड वाटते.

फलज्योतिषाची घातकता: प्रथमतः फलज्योतिष हे ‘वैज्ञानिक मनोवृत्ती जोपासणं हे भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे’ या संविधानाच्या दिशादर्शक तत्त्वाच्या विरोधात जाणारे आहे. कारण फलज्योतिष आपल्याला पुन्हा गुहेत राहणाऱ्या आदिवासीच्या अवस्थेला नेवून पोचवणारा अंधश्रद्धांचा बोजा आहे. हिंदू शास्त्रांप्रमाणे कुंडली माणसाचं भविष्य ठरवते. दुसरं म्हणजे भन्नाट कल्पना करणारे वेदिक पंडित अस्तित्वातच नसलेल्या राहू आणि केतू या दोन ग्रहांना नवग्रहांमध्ये सामील करतात. असल्या कल्पना उराशी बाळगून हिंदू अहिंदू यांच्यामध्ये दूरी निर्माण करण्याची संविधानविरोधी कारवाई हे पंडित करीत असतात. अनेक अभ्यासातून असं दिसून आलेलं आहे की फलज्योतिषाला काडीचाही वैज्ञानिक आधार नाही. एवढेच नव्हे तर भविष्य वर्तविण्यासाठी वापरण्यात येणारी तंत्रेही अशीच निराधार आहेत. अंनिसने तर ह्या भविष्यकथनाच्या उद्योगाला ग्राहक संरक्षण कायद्याच्या नियंत्रणात ठेवून ग्राहकांना चुकीचं भविष्य सांगणाऱ्या ज्योतिष्याला कोर्टात खेचण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे. आपले दावे सिद्ध करून दाखवा असे आव्हान देवून, लोकांचे उद्बोधन आणि प्रयोग अशा तीन तऱ्हेने अंनिस फलज्योतिषाला विरोध करते.

फलज्योतिषाला आव्हान: फलज्योतिषाच्या मूलभूत संकल्पना आणि धारणांना आणि त्यांच्या सहाय्याने भविष्य-कथन करण्याच्या त्यांच्या दाव्याला अंनिस आव्हान देते. कोणीही ज्योतिषी वैज्ञानिक कसोटीला खरे उतरले तर अंनिस त्यांना एक भल्या मोठ्या रक्कमेचे पारितोषिक देण्यास तयार आहे. ही रक्कम वेळोवेळी वाढविण्यात आली आणि त्याची भरपूर जाहिरातही करण्यात आली. परंतु आजपावेतो एकही ज्योतिषी हे आव्हान स्वीकारण्यास तयार झालेला नाही. लोक मात्र त्यामुळे फलज्योतिषाबद्दल शंका व्यक्त करू लागले.

उद्बोधन: ज्योतिष शास्त्रातील मूलभूत संकल्पना आणि धारणा यांना दिलेले आव्हान सैद्धांतिक स्वरूपाचे म्हणजे त्यांच्यातील अंतर्विरोध उघड करणे अशा स्वरूपाचे असते. सामान्य जनतेच्या उद्बोधनासाठी मोठमोठ्या ज्योतिष्यांनी केलेली भाकिते किती मोठ्या प्रमाणात चुकतात याची त्यांना चटकन पटतील अशी उदाहरणेच त्यांच्यापुढे मांडली जातात. लोक त्यातून योग्य तो निष्कर्ष काढतात.

प्रयोग: यामध्ये जन्मानंतर काही तासातच मृत पावलेल्या बाळाची पत्रिका एका फलज्योतिषीला दाखविण्यात आली. हे बाळ अल्पायुशी असण्याची शक्यता आहे का असं डॉक्टरांनी विचारल्यानंतरही त्या ज्योतिषीने ते बाळ आरोग्यसंपन्न आणि दीर्घायुशी आहे असे भाकीत वर्तविले! अगदी सामान्य माणूस सुद्धा यातून योग्य तोच धडा घेईल.