संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म
मृत्यू : १७ जानेवारी २०२२
शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ
अध्यापन कार्य
- १९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर
- १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य
- शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२
- शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५
- शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८
- शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८
- सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१
- रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून
- रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून
- दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून
राजकीय कार्य
- १९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
- १९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
- १९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
- १९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस
- १९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य
- १९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
- १९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
- महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते
मिळालेले सन्मान / पुरस्कार
- भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४
- स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९
- राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००
- विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१
- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
- शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार
भूषविलेली पदे
- रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
- समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष
- अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
- जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
- म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
- दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
- महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य
प्रसिद्ध झालेले लेखन
- समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
- शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२
- कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२
- शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३
- वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६
- महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७
- शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०
- शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )
- नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )
एन डी पाटील महाराष्ट्राचे सहकार मंत्री होते तेव्हाची गोष्ट.एका सकाळी त्यांच्याकडे एक माणूस भेटायला आला.बंगल्यावर कोणीही कर्मचारी नव्हता. तो माणूस सरळ आत गेला. बैठकीच्या खोलीत बसला.बराच वेळ कोणी बाहेर येईना म्हटल्यावर तो ज्या दिशेने कपडे धुण्याचा आवाज ऐकू येत होता तिकडे चौकशी करायला गेला. तेव्हा एन डी पाटील त्याला तिथे कपडे धूत बसलेले दिसले.त्या माणसाची चाहूल लागल्यावर त्यांनी वळून बघितलं आणि म्हणाले,”तुम्ही माझ्याकडे आलाय का?जरा थांबा.आलोच मी.आज सुट्टी होती म्हणून कपडे धूत होतो.”तो माणूस ते दृश्य पाहून बघतच राहिला.कारण महाराष्ट्राचे सहकारमंत्री कपडे धूत आहेत हे त्याच्यासाठी धक्कादायक होतं.
शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते एन डी पाटील यांच्याबाबतीतला हा एक प्रसंग. असे अनेक प्रसंग सांगता येतील.त्यांचे कार्यकर्ते असे घडलेले प्रसंग सांगतात. एन डी पाटील यांनी कोल्हापूरात एक आंदोलन केलं. कोरोनाच्या काळातील घरगुती वीज बिलाची होळी करणारं हे आंदोलन. वयाची नव्वदी ओलांडली आहे.दोन्ही पायांना त्रास आहे. चालता येत नाही.पायांना अपघातात इजा झालीय.चालता येत नाही म्हणून घरात बसणारा हा नेता नाही. लढणं माहिती आहे. सरकार कोणाचेही असो. सरकारी धोरणं श्रमिकांच्या हिताच्या विरोधात निघाली की एन डी पाटील रस्त्यावर आलेच. लढेंगे जितेंगे ही त्यांची आवडती घोषणा.ती त्यांच्याच बुलंद आवाजात ऐकायला पाहिजे.आंदोलन बघत उभा असलेल्या बघ्या माणसालाही त्या आंदोलनात सहभागी व्हावं असच वाटते.
सांगली जिल्ह्यातील ढवळी हे वाळवा तालुक्यातील एन डी यांच गाव.शाळकरी वयात असतानाच सत्यशोधक विचार ऐकायला मिळाले.पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांची भेट झाली. मग रयत शिक्षण संस्थेशी जवळून संबंध आला. प्राध्यापक म्हणून रुजू झाले. याचदरम्यान त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ शेतकरी कामगार पक्षासाठी द्यायचा निर्णय घेतला.जीवनदानी कार्यकर्ते बनले.नंतर शेतकरी कामगार पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काम केले.शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ते विधानपरिषदेवर गेले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह दणादूण सोडले. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांची सभागृहात चर्चा केली, प्रश्न सोडवले.18 वर्षे या सभागृहात त्यांनी काम केले.1978 साली त्यांना पुलोद सरकारमध्ये सहकारमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामकाजाची आजही चर्चा होते.कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायद्याची ठरलेली कापूस एकाधिकार योजना त्यांनीच सुरू केली.मंत्री असताना कोणत्याही भूमिपूजन कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि अंमलात आणला.एन डी पाटील यांच्यासमोर महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श होता त्याच आदर्शाने ते आयुष्यभर वागले. सत्तेत जायची संधी मिळाली पण तेव्हाही त्यांच्या जगण्यात आणि साधेपणात काहीही फरक पडला नाही.
ते जेव्हा सहकारमंत्री होते.तेव्हा त्यांच्या मुलाला सुहास यांना मेडिकलकला प्रवेश घ्यायचा होता.एक दोन गुण कमी होते.पण त्यांनी त्यांचे मामा शरद पवार मुख्यमंत्री होते,वडील एन डी पाटील सहकारमंत्री होते.पण त्यांचा वशिला न लावता रांगेत उभा राहून इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला.वडिलांचा व्यवसाय या रकान्यात त्यांनी शेती असे लिहिले. पण मामा किंवा वडील यांची ओळख सांगितली नाही.’अशी आठवण एन डी यांच्या पत्नी सरोजमाई सांगतात.आयुष्यभर शेतकरी आणि कष्टकरी लोकांशी बांधिलकी मानुन काम करणारा हा लोकनेता. एकाचवेळी अनेक संस्थांचे नेतृत्व करत असताना त्या संस्थाचा कारभार आदर्श रीतीने झाला पाहिजे अशी त्यांची भूमिका राहिली.
एन डी पाटील आमदार झाले त्या दिवसापासून आपल्या मानधतील रक्कम गरीब कार्यकर्त्यांना देत होते. अडचणीत असलेल्या कार्यकर्त्याला हातभार लावणारा महाराष्ट्रातील हा एकमेव नेता असेल.त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत.एन डी हे एका नेत्यांचं नाही तर एका विचाराचं नाव आहे. वयाची 92 वर्षे पुर्ण केल्यावरसुद्धा विश्रांती घ्यावी अस त्यांना वाटत नाही. कारण ते एक वादळ होते.वादळाला कुठली आलीय विश्रांती? लढणं या माणसाच्या रक्तात होते. एन डी चा दुसरा समानार्थी शब्द संघर्ष हा आहे.
