भुतं दिसण्याच्या ठिकठिकाणी घडणाऱ्या घटना म्हणजे फसवणूक असते असे बहुतेक सर्व शास्त्रज्ञ मानतात. पण कॅनडा, इंग्लंड इत्यादी ठिकाणी एखादं घर भुताने पछाडलेलं आहे असा भास ज्यावेळी होतो त्यावेळी मेंदूमध्ये कोणत्या क्रिया घडतात याचा शोध काही शास्त्रज्ञ घेत आहेत. त्यांना असं आढळून आलं आहे की काही भुतांच्या आभासाने मेंदूतील विद्युतचुंबकीय क्षेत्रामध्ये (इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड-इएमएफ)तीक्ष्ण चढ उतार होतात आणि कानाला ऐकू न येणाऱ्या अवश्राव्य (इन्फ्रासॉनिक) ध्वनीलहरी ही उमटतात. विजेच्या तारांमुळे होणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डस , रेडियो-घड्याळं, आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं यांच्या सहाय्याने व्यक्ती किंवा घरं झपाटलेली असण्याचे दावे उघड करता येतील असे मायकेल पर्सिंजर हे न्युरोसायंटिस्ट म्हणतात. २००१ मध्ये ‘परसेप्चुअल अँड मोटर स्किल्स’ नावाच्या क्रॉनिकलमध्ये एका पौगंडावस्थेतील मुलीचे अनुभव वर्णन केले होते. तिचा दावा होता की तिला १९९६ साली रात्री ‘होली स्पिरिट’ कडून भेट घडत असे. त्यातील एक भेट लैंगिक होती. ह्या १७ वर्षीय मुलीला जन्मतःच मेंदूला इजा झालेली होती. तिच्या डाव्या खांद्यावर एक बाळ आहे असा तिला सतत भास होत असे.
पर्सिंजर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या मुलीच्या आईच्या सांगण्यावरून या गोष्टीचा तपास केला आणि त्यांना असं दिसून आलं की तिच्या पलंगाशेजारी एक एलेक्ट्रिक घड्याळ होतं. ते ती झोपली असतांना तिच्या डोक्याजवळ अवघ्या १० इंचाच्या अंतरावर होतं. चाचण्यांमधून असं दिसून आलं की ज्यामुळे अपस्माराचे झटके येवू शकतात अशा इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी त्या घड्याळातून निघत होत्या. घड्याळ तिथून हटवताच मुलीला दिसणारं ‘स्पिरिट‘ येण्याचं थांबलं.
ते घड्याळ आणि मुलीच्या मेंदूला झालेली इजा यांच्या संयोगाने होली स्पिरिट भेट देत होतं! पर्सिजरला जरी हे पटलं असलं तरी विद्युतचुंबकीय क्षेत्रांमुळे झपाटलेपणाचे अनुभव येतात या सिद्धान्ताबाबत काही शंका उरतातच. ख्रिस्टोफर फ्रेन्च या मनोवैज्ञानिकाने ह्या सिद्धांताची वैधता ठरविण्यासाठी काही प्रयोग केले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने लंडनमध्ये एक भुताटकीची खोली उभारली. त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्रोत आणि इन्फ्रासाउंड जनरेटर ठेवण्यात आले. ७९ जण स्वेच्छेने त्या अंधुक प्रकाशाच्या अगदी थंड अशा खोलीत काही काळ राहण्यास तयार झाले.
प्रयोगकर्त्यांनी त्यांना त्या खोलीमध्ये काहीतरी विचित्र, अभद्र असल्याचा भास होईल असे सांगितले होते. प्रयोग सुरू करण्याआधी या परासामान्य अस्तित्वाच्या सूचना कोण कितपत अंगिकारतं ह्याचं मुल्यांकन केलं होतं. त्यातून चटकन विश्वास ठेवणारे आणि संशयवादी वेगळे ओळखण्याची सोय झाली. या चाचणीतील काही प्रश्न- मरणोत्तर अस्तित्वावर विश्वास आहे कां किंवा पुढे काय होणार याबाबत आधीच काही अंदाज लागतो का असे काही प्रश्न विचारलेले होते. खोलीच्या भिंतीमागे दडविलेल्या एका कॉम्प्यूटरमधून कॉइल्सच्या एका जोडीतून संशोधक इएमएफ पल्सेस निर्माण करीत होते.
चप्रमाणे अवश्राव्य ध्वनिलहरीही निर्माण केल्या जात होत्या ज्यांच्यामुळे भुताटकीचा भास होवू शकतो. (अशाच संशोधनावर १९९८ साली ‘द घोस्ट इन द मशीन’ हा लेख जर्नल ऑफ द सोसायटी फॉर फिजिकल रीसर्च नावाच्या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये संशोधक व्हिक टँडी आणि टोनी लॉरेन्स एका प्रयोगाविषयी लिहितात. या प्रयोगात त्यांना एका फॅक्टरीमध्ये इंफ्रासाउंड वेव्ह जनरेट होत असल्याचे नजरेस आले. या फॅक्टरीमधील कामगारांना काही अधिसामान्य (पॅरानॉर्मल) अनुभव येत असल्याचे समजले होते.) ख्रिस्टोफर फ्रेंच यांच्याशी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींनाही अशाच इएमएफ पल्सेस किंवा अवश्राव्यध्वनी किंवा दोन्हीही गोष्टींना सामोरे जावे लागले. बहुतेकांना काहीतरी विपरीत अस्तित्व असल्यासारखे किंवा भोवळ आल्यासारखे अनुभव आले. आणि काहींना तर खूप भीती वाटली. फ्रेंच म्हणतात,‘खूप भीती वाटणं ही प्रतिक्रिया फार टोकाची आहे. आम्हाला केवळ थोडंसं विपरित वाटणं एवढंच अपेक्षित होतं.’ एवढं होवूनही इएमएफमुळे भुताटकीचा भास होतो असं निर्विवादपणे फ्रेंच सिद्ध करू शकले नाहीत.
फ्रेंच यांनी ब्रिटिश मनोवैज्ञानिक जेम्स इ. अलकॉक यांचे ‘सायकॉलॉजी: सायन्स ऑर मॅजिक’ हे १९८१ सालचे पुस्तक वाचल्यापासून त्यांना अधिसामान्य मानसशास्त्रामध्ये रस वाटू लागला; आणि एक कर्तव्यदक्ष शास्त्रज्ञ म्हणून या क्षेत्रामध्ये त्यांनी उडी घेतली; इंग्लंडमध्ये ठिकठिकाणी असलेल्या भुतांनी पछाडलेल्या घरांना ते भेटी देवू लागले. ते म्हणतात, ‘भुतांवर विश्वास ठेवणारे लोक एकमेकांचा (अंध)विश्वास वाढवतात. अगदी गडद अंधारामध्ये आपण बसलो तर काही आवाज ऐकू येतात. अशा घरांमध्ये हे आवाज येणे सामान्य असते. पण भुताटकीवर विश्वास ठेवणाऱ्यांना अस्तित्वात नसलेलेच आवाज ऐकूयेतात आणि गोष्टी दिसतात. हे आमच्या रेकॉर्डिंगच्या साधनातून दिसून आले आहे.
फ्रेंच यांचं संशोधन ‘कॉऱ्टेक्स’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं आहे. याचाच पुढे पाठपुरावा करण्यासाठी ते आणि त्यांचे सहकारी निधी गोळा करीत आहेत. हे तसं सोपं नाही. भुताखेतांच्या गोष्टींमधली हवा काढण्यामध्ये फारसं वैज्ञानिक महत्त्व नसतं. परंतु फ्रेंच यांच्या म्हणण्याप्रमाणे या संशोधनामधून माणसाच्या मनाबाबत, स्मृती आणि संभ्रमांबाबत अनेक तथ्ये कळण्यास मदत होईल. मानसशास्त्रामध्ये आजकाल ‘रिअॅलिटी मॉनिटरिंग’चा बोलबाला आहे- माणसाच्या मनात घडणाऱ्या घटना आणि बाहेरच्या वास्तव जगात घडणाऱ्या घटना यामध्ये आपण फरक कसा करू शकतो हे जाणण्याचा प्रयत्न होत आहे. फ्रेंच म्हणतात, ‘आपण हे धरूनच चालतो; तुम्ही अंथरुणात शिरण्यापूर्वी खरोखरच दरवाजा बंद केलात का नुसता बंद करण्याचा विचार केलात?’ याचंच टोकाचं उदाहरण म्हणजे छिन्नमानस (शीझोफ्रेनिया). या मानसिक आजारामध्ये वास्तव आणि काल्पनिक असा फरकच मेंदू करू शकत नाही.
यामधे-वास्तव आणि काल्पनिक यामध्ये फरक करता येणं आणि फरक करणं अशक्य होणं यामधे- एक सबंधता (कंटिन्युअम) आहे. आणि त्याचा उपयोग आपल्याला जे भास होत असतात त्याबाबत बोलताना होतो. लोक चुकीचे आरोप करीत असतात; वास्तव जगात घडत असलेल्या गोष्टी म्हणजे आपल्या मनातील प्रक्रियांचं फलीत समजतात. तुमच्या मनामध्ये कल्पिलेले प्रसंग वास्तवाशी जितके मिळतेजुळते असतील तितके वास्तव आणि कल्पित यामधील फरक करणं कठीण होईल. असं फ्रेंच यांचं म्हणणं आहे. अर्थातच श्रद्धाळू लोक म्हणतात, ‘फ्रेंच यांच्यासारख्या अतिसंशयवादीला भुतं दिसणं वा ऐकू येणं कसं शक्य आहे?’ यावर फ्रेंच म्हणतात, ‘हे तर खरंच आहे. मला पटावीत म्हणून ही भुतं आणखीनच गूढ व्हायला पाहिजेत. दमट, कोंदट, बुरसट किल्ल्यांमधून अंधारात आणि थंडीमध्ये मी बसलेलो असतांना काही तरी जास्त घडावं अशी वाट पाहतोय मी.’
फ्रेंच आपल्या कल्पना सिद्ध करू शकले नाहीत तरीही त्यांच्या टीमचं पर्सिंजर एक उत्तम प्रयोग म्हणून कौतुक करतात. ते म्हणतात, ‘आपल्या शरीरावर इएमएफ अनेक तऱ्हेने-डोक्यापासून ते प्रत्येक पेशीवर, एन्झाइमवर, इतकेच काय डीएनएवरसुद्धा -परिणाम करीत असतात. मेंदूतील प्रक्रियांवर होणारा परिणाम तपासण्यासाठी इएमएफ सौम्यच असायला हवेत आणि योग्य पॅटर्नमधेच यायला हवेत. म्हणून इएमएफ आणि भुतांचा आभास यांचा संबंध तपासण्याचे वैज्ञानिक प्रयोग चालूच ठेवले पाहिजेत असे त्यांचे म्हणणे आहे. ‘मी एक वैज्ञानिक आहे आणि कोणत्याही गोष्टीवर श्रद्धा ठेवत नाही. ’
