जादूटोणा

जादूटोणा अनादि कालापासून जगात सर्वत्र प्रचलित आहे. वेदांमधे, विशेषतः यजुर्वेदामध्ये जादूटोण्याचं वर्णन सापडतं. जादुटोण्यातील अलौकिक शक्तींचं अस्तित्व मानणं ही एक अंधश्रद्धाच आहे. त्यामध्ये तांत्रिक कर्मकाण्डं असतात. भूतबाधा अगर जादुटोण्याचा असर झालेल्या व्यक्तींवरील असर नाहीसा करण्यासाठी ह्या कर्मकाण्डांचा उपयोग करतात. काही तांत्रिकांच्या अंगी अलौकिक शक्ती असते आणि त्यामुळे ते इतर काही लोकांचं वर्तन नियंत्रित करू शकतात असा समज आहे. परंतु या कशालाही भुतांच (आणि देवाचंही) अस्तित्व किंवा त्यांच्यातील व मांत्रिकांच्यातील अलौकिक शक्तीचं अस्तित्व या कशालाही काडीचा आधार नाही. हे सर्वच थोतांड आहे.

महाराष्ट्रात तर भूतांच्या आणि आत्म्यांच्या वेगवेगळ्या जातीही मानल्या जातात आणि त्यांना वेगवेगळी नावेही दिलेली आहेत. लोभी ब्राह्मण मेला तर त्याचा ब्रह्मसमंध होतो; बाळंतपणामध्ये मेलेली बाई हडळ बनते; कर्णपिशाच्च डोळ्यांना दिसत नाही पण कानाने ऐकता येते; पिशाच्चांना वस्तू जागेवरून हलवता येतात, आग लावता येते, कपडे फाडता येतात, कपड्यांवर किंवा भिंतींवर घाणेरड्या खुणा करता येतात, अन्न घाणेरडं किंवा पाण्यासारखं करता येतं, इत्यादी, इत्यादी. अशा घटना केवळ अतिमानवी शक्तीच घडवू शकतात आणि जादुटोणा जाणणारे तांत्रिक-मांत्रिकच असल्या त्रासदायक पिशाच्च्यांपासून आपली सुटका करू शकतात असे गैरसमज लोकांमध्ये फार दृढ झालेले आहेत. स्वयंघोषित मांत्रिक स्वतःला याबाबतीत तज्ञ मानतात आणि भूतांचा पाहुणचार कसा करायचा तेही तुम्हाला शिकवायला तत्पर असतात. भुतांना आणि आत्म्यांना त्यांच्या भटकंतीपासून आणि झपाटलेल्यांना त्यांच्या मानगुटीवरील भूत अगर आत्म्यापासून ते मुक्ती देतात असा त्यांचा दावा असतो.