श्रद्धा: अंधश्रद्धेचं मूळ

अंधश्रद्धानिर्मूलनाची सारी चळवळ या एका विषयाभोवती फिरत असते आणि या विषयासंबंधातच या चळवळीवर होणारी कठोर टीका आणि प्रशंसाही असते. काहींना आमचे उपक्रम अर्थपूर्ण, उपयोगी आणि यथार्थ वाटतात तर इतर काहींचं मत बरोबर याच्या विरुद्ध असतं. काहीजण म्हणतात की अंधश्रद्धा नाहीशा झाल्याशिवाय आपल्याला २१ व्या शतकात प्रगती करता येणार नाही तर याउलट काही जण असं मानतात की अंधश्रद्धानिर्मूलन हा केवळ बुरखा आहे. खरं उद्दिष्ट आहे देव-धर्म-परंपरा यांचं निर्मूलन करणं हे. अखेर अंधश्रद्धा म्हणजे नक्की काय असं ते विचारतात. जळणाऱ्या कोळशावरची राख फुंकरणंच नव्हे का? राख फुंकरून टाकली की कोळसा पुन्हा तळपू लागतो. म्हणून त्यावरची अंधश्रद्धेची राख मधून मधून फुंकरायला हवी; मात्र त्याच वेळी आतील अग्नी विझणार नाही, तो प्रज्वलितच राहील याची दाक्षता घ्यायला हवी.

श्रद्धेची सापेक्षता: अंधश्रद्धानिर्मूलनाबाबत एवढी मतमतांतरे का असवीत? याचं कारण असं आहे की एका माणसाची श्रद्धा दुसऱ्याला अंधश्रद्धा वाटते तर तिसऱ्या इसमाला जी अंधश्रद्ध वाटते तीच गोष्ट चवथ्या माणसाची अढळ श्रद्धा असते; अगदी जीवन-मरणाचा सवाल असल्यासारखी. त्यामुळे श्रद्धा म्हणजे काय आणि अंधश्रद्धा म्हणजे काय हे नाक्की करणे आवश्यक होते. परंतु इथे एक अडचण उभी राहते कारण आपण आधीच पाहिलं आहे त्याप्रमाणे श्रद्धा माणसागणिक आणि काळानुसार बदलत असते. सत्यसाईबाबाचा फोटो प्रत्येकाने पाहिलेला आहे. त्याच्या भक्तांसाठी तो एक महान बाबा, गुरू, ऋषी, आणि भगवान सुद्धा आहे. असं या बाबामध्ये काय खास आहे? तो हवेत हात फिरवतो आणि तुम्हाला विभूती, सोन्याची साखळी, चांदीची अंगठी नाहीतर आणखी काही तरी काढून देतो. त्याच्या पुस्तकांमध्ये तर असा दावा केलेला आहे की तो भक्तांना सोन्याचे रत्नखचित ताईत आणि साखळ्या देतो. यामुळे अगणित स्त्रीपुरूष त्याच्याकडे आकृष्ट झाले आहेत. त्यामध्ये देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा सामील आहेत. दुसऱ्या बाजूला असेही अनेक जण आहेत जे ह्या सर्व गोष्टींना केवळ एक थोथांड मानतात, भोळ्या भाबड्या लोकांकडून बाबांना देवत्व मिळवून अंधश्रद्धा पसरविण्यासाठी रचलेलं. याला श्रद्धेतील वैयक्तिक सापेक्षता म्हणता येईल.

‘श्रद्धा‘ याचा अर्थ: श्रद्धा या शब्दाचे अनेक अर्थ प्रचलित आहेत. ही विधाने पहा: माझ्या आईवर आणि वडिलांवर माझी श्रद्धा आहे; माझ्या गुरूंवर किंवा बाबांवर माझी श्रद्धा आहे; माझ्या कुलदैवतावर आणि धर्मावर माझी श्रद्धा आहे; चमत्कार, अलौकिक शक्ती आणि मंत्रशक्तीवर माझी श्रद्धा आहे. समता आणि माझ्या देशाच्या संविधानावर माझी श्रद्धा आहे. या प्रत्येक विधानातील श्रद्धा या शब्दाच्या अनेक वेगवेगळ्या छटा आहेत. पण फार थोड्या लोकांना त्याची जाण असते. एखादा शब्द दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या अर्थाने वापरला जातो तोच अर्थ आपण ग्राह्य समजतो. समजा तुम्ही तुमच्या मित्राबरोबर फेरफटका मारीत असताना समोरून एक ओळखीचा माणूस येतांना दिसला आणि तुम्ही आपल्या मित्राला म्हणालात, ‘तो समोरून येत असलेला माणूस अमक्या तमक्या नेत्याचा चमचा आहे’ आता चमचा म्हणजे (इंग्रजीमधला) स्पून. पण तुमच्या मित्राला या प्रसंगी चमचा म्हणजे काय ते सहज समजते. तद्वतच रोजच्या व्यवहारात श्रद्धा म्हणजे धार्मिक श्रद्धा, परलोकावरील श्रद्धा, किंवा जन्ममरणाच्या फेऱ्यातून आत्म्याच्या सुटकेवरील श्रद्धा. लाखो देवळामधले हजारो कथेकरी आपल्या मनावर बिंबवीत असतात की आपल्यामध्ये श्रद्धा असलीच पाहिजे आणि केवळ श्रद्धाच आपल्याला या भवसागरातून सुखरूपपणे तरून नेईल. उगाच विचार करीत बसू नका; कारण विचार करून काही उपयोग होत नसतो. त्याऐवजी तुमच्या भावभक्तीला तुमचं मार्गदर्शन करू द्या. तुमच्या धार्मिकतेच्या आड तुमच्या सदसद्विवेकाला किंवा तर्कबुद्धीला येवू देवू नका. हे जे ते तुम्हाला सांगत असतात आणि तुमच्याकडून जी अपेक्षा करीत असतात ती असते अंधश्रद्धा; श्रद्धा नव्हे. अंधश्रद्धा आणि श्रद्धा यांच्या ऊहापोहामध्ये खोल जाण्यापूर्वी इथे आपण आणखी एका शब्दांच्या जोडीचा विचार करू.

विश्वास आणि श्रद्धा: आता पुन्हा ही विधाने बघा: माझ्या खोलीतील पंख्यावर माझी श्रद्धा आहे की तो मला थंड वारा देईल. माझ्या पेनवर माझी श्रद्धा आहे की ते कागदावर अक्षरे लिहील. ही विधाने खरी आहेत का? काही म्हणतात खरी आहेत. इतर काही म्हणतात खरी नाहीत कारण तुमची तुमच्या पंख्यावरची आणि पेनवरची श्रद्धा कितीही दृढ असली आणि तुम्ही त्यांची कितीही आळवणी केलीत तरी पेनमधली शाई संपल्यावर आणि विजेचा पुरवठा खंडित झाला तर तुमचं पेन आणि तुमचा पंखा लिहिण्याचं आणि वारा घालण्याचं बंद करतील. हा कार्यकारण संबंध सर्वमान्य झालेला आहे. म्हणून इथे श्रद्धा नव्हे तर विश्वास किंवा खात्री असते. त्याप्रमाणेच दोन गुणिले दोन बरोबर चार; योग्य लसटोचणीच्या मोहिमेमुळे पोलिओचा प्रतिबंध करता येतो; शून्य ही संकल्पना भारतीयांनी प्रथम मांडली; किंवा शिवाजी हा एक महान राजा होता या सर्व विश्वासाच्या गोष्टी आहेत. इतर समकालीन राजपुरुषांची चरित्रे पाहिली तर शिवाजी एवढा गुणसंपन्न आणि सक्षम राजा कोणीही नव्हता हे स्पष्ट होईल. आणि म्हणून तो महान होता असा माझा विश्वास आहे.

आता मी याच्या विरुद्ध असे एक अविश्वासाचे उदाहरण देतो. ही सत्यकथा आहे. एका खेड्यामध्ये एक स्त्री आपल्या तीन मुलांना घेवून राहात होती आणि तिचा नवरा मुंबईला काम करीत असे. कोणीतरी त्याच्या मनात त्याच्या बायकोच्या चारित्र्याविषयी संशय निर्माण केला. तो संतप्त होवून गावाकडे आला आणि बायकोला त्याने दरडावून सांगितले की तू जर निष्कलंक असशील तर देवळामध्ये जावून उकळत्या तेलामध्ये हात घालून त्यामध्ये ठेवलेले नाणे काढून दाखव. बिचारी बायको घाबरून गेली. तिच्या भावाला अंनिसचे कार्यकर्ते ही क्लुप्ती जाणतात हे माहीत होते. तो आमच्या कार्यकर्त्यांना भेटला. हा चमत्कार कसा करायचा हे आम्ही त्याला शिकवले. साऱ्या गावकऱ्यांच्या समोर तिने हा चमत्कार केला आणि आपला संसार वाचवला.

इथे मुद्दा त्या स्त्रीच्या पातिव्रत्याचा किंवा उकळत्या तेलाने हात भाजेल की नाही हा नव्हेच. मुद्दा हा आहे की या दोन घटनांमध्ये काही संबंध आहे का? अर्थातच या दोन्ही घटनांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही. म्हणून ह्याच्या इतका जिथे कोणताही कार्यकारण संबंध नाही असा मूर्खपणाचा समज म्हणजे अंधश्रद्धाच आहे. तरीसुद्धा हे लक्षात ठेवायलाच हवे की यासारखा संशयातीत निष्कर्ष प्रत्येक वेळी काढता येईल अशी शक्यता नसते. पण अशी शक्यता निर्माण होईपर्यंत आपण थांबू शकत नाही आणि ही अनिश्चितता असूनही आपल्याला आपलं काम पुढे रेटावंच लागतं. अनिश्चिततेला सामोरं जाताना अनेक जण श्रद्धेचा आसरा घेतात. म्हणून जेव्हा आपण वस्तूंच्या अस्तित्वावर ते सिद्ध करण्यासाठी काहीही पुरावा नसताना विश्वास ठेवतो आणि आपले त्याबाबतचे कर्तव्य पार पाडत असतो तेव्हा ती विश्वासाची बाब असते.

आपल्या डॉक्टरवरचा विश्वास: दिवसभराच्या व्यवहारामध्ये आपण काय करतो याचे लोकांना भान असते. ते आपल्या श्रद्धा तपासतही असतात. आमच्या डॉक्टरवर आमची श्रद्धा आहे असं आपण नेहमी म्हणतो. याचा अर्थ असा की घरात कोणीही आजारी पडलं तर तुम्ही त्याला ‘तुमच्या’ डॉक्टरकडे घेवून जाता. आणि त्याने दिलेल्या औषधाने तो बरा होतो. असं वारंवार घडलं तर डॉक्टरविषयी आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते. परंतु नंतर केव्हातरी आपल्या घारातील आजारी मुलाला त्याच्या औषधाने उतार न पडल्याने त्याला दुसऱ्या तज्ञ डॉक्टरकडे न्यावे लागते. दोनतीन महिन्यानंतर आणखी कोणीतरी आजारी पडतं आणि आपल्या कौटुंबिक डॉक्टरच्या औषधाने उतार न पडल्याने त्याला दवाखान्यात न्यावे लागते. त्यानंतर कुणाचा आजार या डॉक्टरांचे उपचार चालू असतांना बळावला तर तुम्ही त्याचेच उपचार चालू ठेवाल का? नक्कीच नाही. आता या डॉक्टरवरच्या तुमच्या श्रद्धेचं काय झालं? तुमच्या गेल्या काही महिन्यांच्या अनुभवाच्या आधारावर तुम्ही असा निष्कर्ष काढता की तुमचे डॉक्टर आता पूर्वी इतके गुणकारी राहिले नाहीत. आणि तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जाता. परंतु ह्या मध्यंतरात महत्त्वाच्या घटना घडल्या त्या अशा: तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या नैपुण्यावरील श्रद्धा तपासली. आणि त्याच्याकडे पुन्हा कोणाला औषधासाठी नेणं उचित नाही असा निष्कर्ष काढला. पण तुम्हाला आलेल्या त्याच्या अपयशाच्या अनुभवानंतरही तुम्ही त्याच डॉक्टरकडे जात राहिलात तर त्याचा अर्थ काय होईल? श्रद्धा का अंधश्रद्धा? या परिस्थितीवरून जो महत्त्वाचा निष्कर्ष निघतो तो असा: कोणत्याही अस्तित्वात असलेल्या परिस्थितीबाबत प्राप्त झालेल्या ज्ञान व अनुभवामुळे शंका उत्पन्न झाल्यावरही ती चालू ठेवली गेली तर ती अंधश्रद्धा आणि ज्ञान आणि अनुभवांनंतर ती परिस्थिती राहिली नाही तर तो विश्वास होता असं म्हणावं लागतं. ही परिस्थिती अशी असते: तुमचं मूल आजारी आहे. पूर्वी तुमचे डॉक्टर त्याला बरे करू शकत होते. पण ज्ञान असं आहे की आता ते पूर्वीइतके निपुण राहिले नाहीत. तेव्हा तुम्ही निष्कर्ष काढता की आता डॉक्टर बदलायची वेळ आली आहे. यामध्ये आपल्याला एक पद्धती स्पष्ट दिसून येते. आपण परिस्थितीला सामोरे जात असतो; त्यातून जीवनात आपल्याला अनुभव येत असतो; आपण ज्ञान मिळवतो; मग आपण मिळालेल्या ज्ञान आणि अनुभवाच्या सहाय्याने परिस्थिती तपासतो; आणि नंतर आपल्या श्रद्धेबाबत निर्णय घेतो. अर्थात हे ऐकताना अगदी सोपं वाटलं तरी प्रत्यक्षात उतरवणं फार कठीण आहे. स्वतःच्या श्रद्धेबाबत निर्णय घेणं म्हणजे आपण बाळगलेली श्रद्धा आहे का अंधश्रद्धा हे ठरवणं हे अत्यंत कठीण आहे कारण त्यामुळे आपल्यातला अहम् दुखावतो. म्हणून आपण हा निर्णय घेणेच टाळतो. आणि म्हणूनच ही अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ मोठ्या जोमाने चालू ठवणं अंनिसला अपरिहार्य आहे.

श्रद्धेचा अर्थ- एक विरोधाभास: आता आपण एका महत्त्वाच्या मुद्याकडे वळणार आहोत. तो म्हणजे ‘माझी श्रद्धा आणि माझी श्रद्धा म्हणजे मला काय वाटतं; तसंच माझी श्रद्धा तुम्हाला अंधश्रद्धा वाटत असेल तर त्याचा तुमच्या मते काय अर्थ आहे. या देशामध्ये व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर केला जातो म्हणून तुम्ही तुमची श्रद्धा बाळगू शकता. पण त्याच वेळी -जसे आपल्या देशामध्ये सध्या आहे- दोन प्रबळ श्रद्धा (धर्म) एकमेकांचे खंडन करीत आहेत. काहींना वाटते आपला देश हिंदू राष्ट्र असायला हवा. तर इतरांना वाटते काहीही झाले तरी आपले राष्ट्र धार्मिक होता कामा नये; ते धर्मनिरपेक्ष राष्ट्रच राहिले पाहिजे. या दुसऱ्या मताशी अंनिस सहमत आहे. आता प्रश्न असा उभा राहतो की या मतांमधले कोणते मत म्हणजे श्रद्धा आणि कोणते मत अंशश्रद्धा हे कसे ठरवायचे? इथे आपल्याला श्रद्धेच्या रसायनाबाबत एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. प्रत्येक श्रद्धेमध्ये एक गडद भावनिक छटा असते. माणूस सर्वस्वी बुद्धीच्या आधाराने व्यवहार करू शकत नाही. तो बुद्धी आणि भावना या दोन्हींच्या सहाय्यानचे निर्णय घेतो. त्यामुळे त्याच्या निर्णयामध्ये नेहमीच भावनेची छटा असतेच. आणि त्यातूनच श्रद्धा का अंधश्रद्धा हा प्रश्न निर्माण होतो. हे लक्षात येण्यासाठी एका टोकाला विश्वास, दुसऱ्या टोकाला अंधश्रद्धा आणि बरोबर मध्ये श्रद्धा असं लिहून एक अखंड रेषा घेवू या. आता जिथे विश्वास आहे तिथे विचार प्रबळ आहे आणि भावनांना तिथे थारा नाही. तुम्हाला जर कोणी मोठ्याने सुनावले की दोन आणि दोन मिळून चार होत नाहीत तर ते सांगणारा माणूस वेडा आहे असं मानून तुम्ही त्याकडे दुर्लक्ष कराल, इथे तो तुमच्या श्रद्धेला आव्हान देत नाही. परंतु पुत्रप्राप्तीसाठी कोणी नरबळी दिला तर ती निखालस अंधश्रद्धा आहे जिथे कोणत्याही विचाराला थाराच नाही; हे वर्तन पूर्णपणे भावनाधिष्ठित असतं. मग श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा एक भावना आहे जी विकसित होवून सत्त्याधारित विचारांमध्ये परिवर्तित होते आणि प्रेरक मूल्याच्या रूपात प्रतीत होते. आपण आधीच पाहिलं आहे की माणसाला बुद्धी असते तशाच भावनाही असतात आणि दोन्हीची त्याला गरज आहे. केवळ इंजिन (बुद्धी) लावून आगगाडी पळत नाही तिला इंधन (भावना) लगतं. कित्येक वेळा माणसं सारासार विचार न करता भावनांच्या आहारी जावून निर्णय घेतात. विचारांना थाराच न देणं योग्य नाही. विचारांना हद्दपार करून भावनांच्या आहारी जाण्याची वृत्ती अंधश्रद्धा होते. पण भावनांनी उत्तेजित होवून घेतलेल्या निर्णयाची तर्कशुद्ध तपासणी केली तर तो एक सूज्ञ विचार ठरतो.

श्रद्धेचे चार निकष:

पहिला निकष आहे सत्यासत्यता तपासणे. ज्या श्रद्धेबाबत तथ्य आणि सत्य यांना अनुसरून प्रश्न विचारण्याची परवानगी नसते ती अंधश्रद्धा होय. याचा अर्थ काय हे समजण्यास बाबासाहेब अंबेडकरांनी दिलेलं एक यथार्थ उदाहरण बघू या. ते म्हणतात, ‘तुम्हाला जर एखादी पिवळी चमकणारी धातूची वस्तु दिसली तर तुम्हाला सोनं सापडलं म्हणून तुम्ही आनंदाने नाचू लागाल का? नक्कीच नाही. तुम्ही स्वतःशीच विचार करता ही वस्तू भट्टीत घातली तर ती सोन्याची असल्यास आणखीनच तळपेल आणि पितळ्याची असेल तर चमकणार नाही. एका धातूच्या तुकड्याची शहानिशा करताना तुम्ही एवढा विचार करता मग ज्या मूल्यांनी जीवन जगायचं आणि त्याला दिशा द्यायची त्यांच्याबाबत असा सारासार विचार का करीत नाही? मूल्यांबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा. तुमच्या श्रद्धेला सत्त्याच्या भट्टीत तावून सुलाखून मगच तुम्ही ती स्वीकारायला हवी.

श्रद्धेचा दुसरा निकष आहे अहिंसा. कोणत्याही समाजामध्ये लोकांच्या अनेक वेगवेगळ्या श्रद्धा असतात. त्या सर्वांना आपापल्या श्रद्धांचा प्रचार व प्रसार करण्याचे स्वातंत्र्य असायला हवे; अर्थात योग्यायोग्य संकेतांच्या मर्यादेमध्ये राहूनच. आपल्या श्रद्धेव्यतिरिक्त इतर श्रद्धा बाळगणाऱ्यांना त्या श्रद्धांचा प्रसार-प्रचार करू देणं, आपली श्रद्धा स्वीकारण्यास प्रवृत्त करणं म्हणजेच इतर श्रद्धांविषयी आदर बाळगणं होय. ही सहिष्णुता आहे आणि तिची मुळं अहिंसेमध्ये आहेत आणि जीवन जगण्याचा मूलमंत्र आहेत. आमच्या श्रद्धेव्यतिरिक्त इतर कोणतीही श्रद्धा बाळगणाऱ्यांना आमच्या देशात थारा देता कामा नये असं म्हणणं हीच एक घोर अंधश्रद्धा आहे. तेव्हा पहिला निकष सत्य आणि दुसरा अहिंसा.

तिसरा निकष म्हणजे गतिशीलता. माणसाचा निग्रह भीती आणि लालूच या दोन कारणांनी ढळू शकतो. उदाः तुमची तुमच्या धर्मावर गाढ श्रद्धा आहे. तुम्हाला जर कोणी म्हणालं की मी तुम्हाला वीस लाख रुपये रोकड देतो तर तुम्ही आपला धर्म बदलायला तयार व्हाल? शक्यता अशी आहे की तुम्ही आधी आजूबाजूला कोणी तुमच्यावर नजर ठेवली नाहीना याची खात्री कराल आणि मग पैसे देणाऱ्याला विचाराल ‘तुम्ही खरंच एवढे पैसे द्याल? तसं असेल तर माझा धर्म सोडून तुम्ही म्हणता आहात त्याचा विचार करायला हरकत नाही.’ तसंच एखाद्याने तुमच्या अगर तुमच्या मुलाच्या गळ्यावर तल्वारीचे टोक ठेवून धमकी दिली, ‘धर्म बदला, नाहीतर मरायला तयार व्हा’; अशा स्थितीत तुम्ही काय कराल? तुम्ही नक्कीच विचार कराल की आधी मला आपली मान तर सोडवून घेवू दे मग पुढे काय करायचं त्याचा विचार करता येईल. माझं डोकं शाबूत असेल तर मला पगड्या बदलता येतील. मग तुम्ही त्याला सांगाल, ‘माझा जीव लाख मोलाचा आहे. तुम्ही म्हणता तसा मी धर्म बदलायला तयार आहे.’ त्याच वेळी तुमच्या मनात असंही येतं की, नंतर जेव्हा परिस्थिती अनुकूल होईल तेव्हा मी पुन्हा आपला धर्म स्वीकारेन.’ याला तुम्ही एक सूज्ञ निर्णय म्हणाल. पण तुम्ही तुमच्या गाढ श्रद्धेशी प्रतारणा करीत आहात. या दोन्ही प्रसंगामध्ये श्रद्धा नव्हे तर भीती आणि लालूच तुमच्या श्रद्धेविरुद्ध वागण्यास तुम्हाला उद्युकत करीत आहे. इतकी विपरीत परिस्थिती नसेल तर तुम्ही याउलट वागाल म्हणजे श्रद्धेशी एकनिष्ठ असाल.

चौथा निकष श्रद्धा तुमचा मूल्यनिर्णय उन्नत करते; या उलट अंधश्रद्धा तुमचा मूल्यनिर्णय अधोगतीला नेते. जेव्हा मी एखादी गोष्ट माझ्या श्रद्धेचा भाग म्हणून अंगिकारतो तेव्हा त्यातील मूल्याचा आशयही मला अंगिकारावा लागतो. जर भगवान रामचंद्रांना माझ्या श्रद्धेमध्ये महत्त्वाचे स्थान असेल तर त्यांनी स्वीकारलेली सत्त्य आणि एकपत्नीव्रत (त्या काळी अनेक स्त्रियांशी विवाह करण्याची प्रथा असूनही) ही दोन्ही मूल्ये मला मान्य केली पाहिजेत आणि आचरणात आणली पाहिजेत. रामाचे किती परमभक्त ही दोन्ही मूल्ये आपल्या वैयक्तिक जीवनात आचरणात आणतात? सत्त्याबाबत तर आपल्याकडे न बोललेलंच बरं. सत्त्यमेव जयते हे आमचं ब्रीदवाक्य आहे आणि ते आमच्या राष्ट्रीय प्रतीकांवर कोरलेले असते. पण दिसतं असं की खोट्याचीच दुनिया आहे. ज्याला आपण श्रद्धा मानतो त्याला काही लोक निष्ठा किंवा इमान म्हणतात. काहीजण त्याला सूज्ञ (धूर्त) विश्वास म्हणतात. शब्द कोणताही असू दे महत्त्व आहे तुम्ही आपली श्रद्धा तपासता की नाही याला; तुम्ही इतर श्रद्धांबाबत सहिष्णू आहात का किंसक ह्याला; आणि तुमची श्रद्धा तुम्हाला कार्यप्रवण करते की नाही याला.

याहीपेक्षा महत्त्वाचं आहे तुमची श्रद्धा तुम्हाला उन्नत करते का रानटी बनवते हे. तेव्हा हे आहेत निकष जे तुम्हाला आपली श्रद्धा तपासण्यासाठी उपयोगी ठरतील. अशी तपासणी करण्याचा आग्रह धरण्यानेच मानवाची प्रगती होते. म्हणून अंनिसच्या तात्विक विचारविमर्षामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यावरील ऊहापोहाचे विशेष महत्त्व आहे.

– डॉ नरेन्द्र दाभोलकर