विज्ञान आणि तर्कशक्ति

विकसित देशांमध्ये बुद्धिमत्ता वाढली आहे आणि त्याबरोबरच धर्मावरील श्रद्धा कमी झाली आहे असं वैज्ञानिक अभ्यासातून दिसून आलं आहे. साहजिकपणे यातून असा निष्कर्ष निघतो की लोक जास्त हुशार होत आहेत; हुशार लोक अतार्किक समजुती सोडून देतात; म्हणून वाढत्या हुशारीसोबत अश्रद्ध लोकांची संख्या वाढते. परंतु वस्तुस्थिती इतकी सरळ, सोपी नाही असं वॉटरलू विश्वविद्यालयाचे मानद शास्त्रज्ञ जेम्स अॅलन चेनी यांचं म्हणणं आहे.

परंतु प्रथम हे लक्षात घ्यायला हवं की वर उल्लेखिल्याप्रमाणे होत असलेला परिणाम लक्षणीय आहे. इंग्लंडचंच उदाहरण घ्या. चर्चमध्ये जाणाऱ्यांची संख्या पूर्वीच्या मानाने १/३ पेक्षा कमी झालेली आहे. आणि निरीश्वरवादी काही पूर्वीइतके विरळा राहिलेले नाहीत. परंतु अनेकजण स्वतःला निरीश्वरवादी म्हणविण्याऐवजी अश्रद्ध म्हणविणं पसंत करतात त्यामुळे सर्वेक्षण दाखवतं त्यापेक्षा बरेच जास्त लोक निरीश्वरवादी असावेत. इतर अभ्यासातून असंही दिसून येतं की उच्च वर्गातील शास्त्रज्ञांमध्ये ७% शास्त्रज्ञ श्रद्धावान असतात. विज्ञान आणि धर्माला नकार या दोन गोष्टींमध्ये काही संबंध इथे दिसून येतो का?
चेनी असं दाखवून देतो की (विकसित देशातल्यासारख्या) वैज्ञानिक शिक्षणामुळे लोक अमूर्त संकल्पना हाताळायला शिकतात आणि आपण चुकत असणं शक्य आहे याची त्यांना जाण येते. कारण एखादी संकल्पना बरोबर आहे का असा प्रश्न पडणं हीच मुळात वैज्ञानिक संकल्पना आहे. असा प्रश्न पडल्याने मग लोक जास्त तर्कशुद्ध विचार करू लागतात आणि धर्मासारख्या तर्कविसंगत कल्पना टाकून देतात. लोकांना जेव्हा अमूर्त(अॅब्स्ट्रॅक्ट), निरपेक्ष (कॅटॅगोरिकल) आणि गृहीत (हायपोथेटिकल) (एसीएच=अनिगृ) विचार करण्याची गरज भासू लागली तेव्हा हीच वृत्ती द्विगुणित झाली. आणि थोड्याफार प्रमाणात सर्वानाच वैज्ञानिक शिक्षण क्रमप्राप्त झालं. विकसनशील देशांमधल्या शेतकऱ्यांना या कौशल्याची गरज भासत नाही त्यामुळे ते असा विचार करू शकत नाहीत. म्हणून केवळ विकसित देशातील लोकच जास्त हुशार (अनिगृ पद्धतीने विचार करण्यावर आधारित असलेला उच्च आयक्यूवाले) असतात आणि केवळ विकसित देशातील लोक तर्कविसंगत धर्माचा अव्हेर करतात. ही अनिगृ विचारपद्धती खरोखरच श्रेष्ठ आहे आणि आपल्या जमान्यात झालेल्या सर्व उपलब्धी या विचारपद्धतीनेच प्राप्त झाल्या आहेत.

तेव्हा जग जसं अधिकाधिक सुशिक्षित होईल, जास्त चांगला विचार करायला शिकेल आणि अगदी प्राथमिक स्वरूपात का होईना वैज्ञानिक संकल्पना आणि ज्ञान हाताळू लागेल तेव्हा लोक हळू हळू उमजतील की त्यांचा धर्म नव्या युगाशी जुळत नाही आणि अर्थहीन झाला आहे.

चेनीच्या मते विकसित देशांमध्ये विचारप्रक्रियेचा विकास पूर्ण झाला आहे परंतु विकसनशील देशांमध्ये विकास होत राहील. याचा अर्थ असा की येत्या काहीशा दीर्घ काळामध्ये धर्माचं आकर्षण २० % लोकांना असेल (जसं आज स्कँडिनेव्हियात आहे). पूर्वीच्या ८० % पेक्षा ही बरीच सुधारणा आहे. इथे माझा प्रश्न असा आहे की हे असं युनायटेड स्टेट्समध्ये का घडत नाही? तिथे शाळांमधून विज्ञान शिकवलं जात नाही का? का काही निवडक लोकांनाच वैज्ञानिक शिक्षण लाभू शकतं?

पुढचा विचार असा आहे की एकदा धर्माने झपाटलेल्यांच्या विज्ञानाच्या शिक्षणामुळे धर्माची पीछेहाट होत आहे हे लक्षात आले म्हणजे मग ते कशाचा पुरस्कार करू लागतील? मला वाटतं की त्यांना नळाचं पाणी, वीज, सेलफोन, टीव्ही, मोटारी इत्यादी सर्व टाकावू वाटेल आणि प्राथमिक अवस्थेमधल्या गुहेत राहणाऱ्या मानवाचं निसर्गावलंबित जीवन हवंसं वाटू लागेल. पण एक चांगली बातमी ही आहे की विज्ञानाचं शिक्षण परिणामकारक होण्यासाठी अत्युच्च असण्याची मुळीच गरज नाही. त्या शिक्षणात केवळ विज्ञानाची मूलभूत तत्वं आणि प्रयोग करण्याचं तसंच प्रश्न विचारण्याचं महत्त्व शिकवलं की पुरेसं आहे.
ज्यांना या विषयात गोडी वाटत असेल त्यांनी ‘सायन्स अँड रीझन- द ह्यूमन माइंड’ हा जॉन ड्रेपर यांचा ६-८-२०१० चा संपूर्ण लेख वाचावा. तो वाचनीय आहे आणि त्यामध्ये तांत्रिक परिभाषेचा फारसा वापर केलेला नाही.

ईश्वर आणि विज्ञान जुळू शकत नाहीत
ही कल्पना जे.बी.एस हाल्डेन यांनी १९३४ मध्ये ‘फॅक्ट अँड फेथ’ यामध्ये प्रथम मांडली, ती अशी: ‘एक वैज्ञानिक म्हणून माझं आचरण निरीश्वरवादी असतं. म्हणजे मी जेव्हा एखादा प्रयोग आखतो तेव्हा त्या प्रयोगाच्या सिद्धतेमध्ये कोणी देव, देवदूत वा दैत्य लुडबूड करणार नाहीत असं मी मानतो. आणि माझ्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये मला जे काही यश मिळालं त्याने माझ्या या धारणेला पुष्टी मिळाली आहे. तेव्हा माझ्या इतर व्यावहारिक आचरणामध्ये जर मी निरीश्वरवादी राहिलो नाही तर तो बौद्धिक अप्रामाणिकपणा ठरेल.

तरी सुद्धा अनेक वैज्ञानिक स्वतःला ख्रिश्चन किंवा इतर कोणत्यातरी धर्माचे अनुयायी म्हणवतात. हे असं का?
आपलं विज्ञानाच्या क्षेत्रातील काम करीत असताना वैज्ञानिक विवेकवादी असतात आणि त्यांच्या कामाशी कोण्या गूढ शक्तीचा संबंध आहे असं ते अजिबात मान्य करीत नाहीत. परंतु रविवार उजाडला की किंवा धर्माबाबत विषय निघाला की ते बरोबर उलट्या दिशेला फिरतात. म्हणजे त्यांना असंच म्हणायचं असतं की, ‘सर्वच गोष्टींना तार्किक कायदे लागू करता येत नाहीत; मी माझी श्रद्धा जपतो.

याला काही सरळ सोपं उत्तर नाही. लॉरेन्स क्रॉस दोन कॅथॉलिक अस्तित्ववादींशी चर्चा करीत असताना त्याच्या लक्षात आलं की ते दोघे अखेरीस ‘कौमार्यावस्थेत जन्म ही घटना शब्दशः मानायची नसते’ या मुद्यापर्यंत येतात. हे मूलतत्त्ववादींना (त्या अस्तित्ववादींनी) सांगायला हवं. तसं आता बहुतांश लोकांना आपण विवेकवादी असायला हवं हे पटतं. म्हणून आधुनिक ख्रिश्चनांना बायबलमधल्या कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या गोष्टीवर ठेवायचा नाही याची निवड करावी लागते. ही निवड ते कशी करतात? चर्च किंवा एकूणच बायबलची शिकवण यामधून या प्रश्नांची उत्तरं मिळतात. आणि ती अवलंबून असतात तुम्ही कोणाबरोबर चर्चा करीत आहात, धर्म कोणता आहे, चर्चेला संदर्भ काय आहे यावर. एखाद्या विवेकवादी (श्रद्धाळू नसलेल्या) वैज्ञानिकाला या साऱ्याच संकल्पना अगदी परक्या वाटतात; कारण विज्ञान खरोखरच धर्माशी विसंगत आहे.

याबाबत पी झेड मायर्स आपल्या ‘फॅरिंगुला’ ब्लॉगमध्ये म्हणतात, ‘धर्म म्हणजे एक उत्तरांचा साठा आहे; आणि त्याहि पेक्षा वाईट म्हणजे धर्म निरुपयोगी कर्मकांडांचा संच आहे. आणि हेच तर आमच्या ‘धर्म आणि विज्ञान विसंगत आहेत’ ह्या प्रतिपादनाचं मूळ आहे.

‘धर्म वेगवेगळी उत्तरं देत राहतो. अगदी असंबद्ध उत्तरं! ती सगळीच बरोबर असणं शक्य नाही. आणि भरीला कोणतेही दोन वेगळे धर्म प्रश्नाचं तेच एकमेव उत्तर देत नाहीत. प्रश्न तोच असला तरी प्रत्येक धर्माचं उत्तर वेगळं. पण विज्ञानात मात्र कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरावर साधारणतः एकमत होत असतं. आणि ते उत्तरही वारंवार बदलणारं नसतं. त्यामुळे धार्मिक आणि वैज्ञानिक उत्तरांमधलं कोणतं बरोबर हे मी नीट जाणतो. मग धर्म सरळ सरळ खोटा ठरतो.

विज्ञान आणि ईश्वर यांच्यामधल्या विसंगतीविषयी आपल्याला एवढी चिंता कशाका करायला हवी? करायला हवी, कारण हे जग जर श्रद्धेऐवजी विवेकावर अवलंबून चाललं तर जीवन जगणं सुकर होईल. लेखाच्या अखेरीस क्रॉस म्हणतात, ‘सध्या इराणमध्ये उत्पन्न झालेल्या पेचप्रसंगामुळे विवेकाधारित जग आणि कर्मठधर्माधारित जग यांच्यातील ढळढळीत विसंगती उघड झाली आहे.

‘मानवी व्यवहारामध्ये तसेच इतर भौतिक जगामध्ये विवेकच योग्य मार्गदर्शक आहे हे सूर्यप्रकाशाएवढं स्वच्छ सत्य सांगणं हेच विज्ञान आणि धार्मिक तत्त्वप्रणाली यांच्यातील विसंगतीच्या निःपक्षपाती मूल्यमापनाचं योगदान असावं!
लॉरेन्स क्रॉस