बुवाबाजीचे भयानाक वास्तव

बुवाबाजीचे भयानाक वास्तव

बुवाबाजी म्हणजे काय ?

बुवाबाजीची सोपी आणि साधी व्याख्या आहे , श्रद्धेच्या क्षेत्रातील काळा बाजार.

बुवाबाजीचे प्रामुख्याने दोन प्रकारात विभागणी करता येईल ती अशी,

 1. उघडपणे अलौकिक व चमत्कारिक दावे तसेच अघोरी उपाय करणारी बुवाबाजी.
 2. आध्यात्मिक बुवाबाजी. (यामध्ये प्रामुख्याने खोटी व फसवी आध्यात्मिकता)

यामध्ये आपण पहिल्या भागात उघडपणे चालणार्‍या बुवाबाजीचे काही प्रकार क्रमशा पाहूया.

 1. मंत्र-तंत्र याची भीती घालून केली जाणारी बुवाबाजी.
 2. जंगली जडी बुटी देऊन केली जाणारी बुवाबाजी.
 3. दवा, दुवा देणारी बुवाबाजी.
 4. स्त्री लंपटगिरी करणारी बुवाबाजी.
 5. अघोरी उपाय करून उपचार करणारी बुवाबाजी.
 6. अतींद्रिय शक्ति याद्वारे चालणारी बुवाबाजी.
 7. मानसिक विकलांग व्यक्तीचा उपयोग करून केली जाणारी बुवाबाजी.

वरील बुवाबाजी प्रकारांचे थोडक्यात विश्लेषण आपण क्रमशः पाहूया.

 1. मंत्र-तंत्र याद्वारे भूत पिशाच्य यांना आवाहन करून, किंवा भूत पिशाच्य यांना आवाहन करीन, अशी धमकी देऊन सर्वसामान्य जनतेच्या मनात घबराट निर्माण करणे, एखाद्या व्यक्तिला शाररिक इजा होण्यास भूताचा किंवा अतिन्द्रीय शक्तीचा कोप असल्याचा समज करून देणे, आणि तिला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून , त्याऐवजी तिला अमानुष , अनिष्ट व अघोरी कृत्य वा उपाय करण्यास प्रवृत्त करणे , जादूटोणा अथवा अमानुष कृत्ये करून किंवा तसा आभास निर्माण करून एखाद्या व्यक्तिला मृत्यूची भीती घालणे , शाररिक वेदना करण्याची किंवा तिचे आर्थिक नुकसान करण्याची धमकी देणे यासारखे सर्व प्रकार बुवाबाजी मध्ये मोडतात.
 2. जंगली जडी बुटी देऊन त्यावर मंत्र मारून रोग बरा करणारे तसेच कुत्रा , साप किंवा विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तिला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून , त्याऐवजी मंत्र-तंत्र , गंडेदोरे , किंवा यासारखे उपचार करणे ही देखील बुवाबाजीच असते.
 3. केवळ दवा आणि दुवा देणारीही मंडळी दैवी सामर्थ्याने कोणतीही अडचण,संकट, दूर करण्याचा दावा करतात. अशा केवळ चुकीच्या दवा आणि दुव्यामुळे अनेकांचे प्राण धोक्यात येतात अथवा जीवाला मुकतात सुद्धा.
 4. स्वत:त विशेष अलौकिक शक्ती असल्याचे अथवा कुणाचातरी अवतार असल्याचे वा स्वत:च पवित्र आत्मा असल्याचे भासवून किंवा त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीस पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती व प्रियसी , प्रियकर होता असे सांगून, अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे. तसेच मूल न होणार्‍या स्त्रिला अलौकिक शक्तीद्वारे मूल होण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे. अशा स्वरूपाची कृत्यही बुवाबाजीच असतात.
 5. भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तिला, दोराने किंवा साखळीने बांधून ठेऊन तिला मारहाण करणे , काठीने किंवा चाबकाने मारणे, तिला पादत्राणे भिजवलेले पाणी प्यायला लावणे , मिरचीची धुरी देणे , त्या व्यक्तिला छताला टांगणे , त्याला दोराने किंवा केसांनी बांधणे, किंवा त्या व्यक्तीचे केस उपटणे, व्यक्तीच्या शरीरावर किंवा अवयव यावर तापलेल्या वस्तूंचे चटके देऊन इजा पोहचविणे, व्यक्तिला उघड्यावर लैंगिक कृत्य करण्याची जबरदस्ती करणे, व्यक्तीवर अमानुष कृत्य करणे, व्यक्तीच्या तोंडात जबरदस्तीने मूत्र किंवा विष्ठा घालणे किंवा यासारख्या कोणत्याही कृती करणे तसेच मौल्यवान वस्तू, गुप्तधन आणि जलस्त्रोत यांचा शोध घेण्याच्या बहाण्याने वा तत्सम कारणाने करणी , भानामती या नावाने कोणतेही अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य आणि जादूटोणा करणे, आणि जारणमारण यांच्या नावाने व त्यासारख्या अन्य कारणाने नरबळी देणे किंवा देण्याचा प्रयत्न करणे किंवा अशी अमानुष कृत्ये करण्याचा सल्ला देणे, त्याकरिता प्रवृत करणे , अथवा प्रोत्साहन देणे अशा या अघोरी बाबी बुवाबाजीच असतात.
 6. आपल्या अंगात अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून अथवा एखाद्या व्यक्तीत अतींद्रिय शक्ती संचारली असल्याचा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे , किंवा त्या व्यक्तीचे सांगणे न ऐकल्यास वाईट परिणाम होतील अशी इतरांना धमकी देणे , फसवणे व ठकवणे या सर्व बाबी बुवाबाजीच ठरतात.
 7. एखाद्या मानसिक विकलांग व्यक्तिमध्ये अमानवी शक्ती असल्याचे भासवून त्याद्वारे अन्य व्यक्तीची लुबाडणूक करणे, आर्थिक प्राप्ती करणे ही देखील बुवाबाजीच ठरते.

आध्यात्मिक बुवाबाजी.

आध्यात्मिक बुवाबाजीचे प्रामुख्याने दोन गट आहेत.

अ] खरी आध्यात्मिकता व ब] फसवी आध्यात्मिकता

] खरी आध्यात्मिकता :- जी व्यक्ती जगत असताना आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या सर्व घटनांची जाणीव ठेवते व त्यासाठी धाऊन जाते. वेळप्रसंगी स्वत:ला पडेल ती तोशीस लाऊन घेते व जीवन प्रामाणिकपणे जनसेवेसाठी व्यतीत करते अशी व्यक्ती. उदा:- संत गाडगे बाबा,संत कबीर, कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादी. जो समाजातील दु:ख, दैना, अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा परंपरा, विषमता यावर प्रहार करून त्यांना घालविण्यासाठी झटतो अशी व्यक्ती खरी आध्यात्मिक असते. त्यासाठी त्यांना काम, क्रोध,मद, मत्सर, लोभ यावर मात करणे गरजेचे आहे.

] फसवी आध्यात्मिकता:- खरे तर आध्यात्मिकता फसवी कधी नसते. आध्यात्मिक तोच जो कर्तव्याशी प्रामाणिक असतो. परंतु काही लोकांचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे असतात. अशी मंडळी ही केवळ नावाला धर्माचे/आध्यात्मिकतेचे रूप घावयाचे व वर्तन मात्र लोकांना लुटायचे/ फसवायचे व स्वत:चा धंदा भरभराटीला जाईल तेवढेच पहायचे. असेही काही लोक आज आध्यात्मिकतेची दुकाने उघडून बसली आहेत. हा सर्वात मोठा धोका आहे.

फसव्या आध्यात्मिकतेची काही प्रमुख हत्यारे पुढील प्रमाणे सांगता येतील.

1] धार्मिक उपचार पद्धती.

आपआपल्या धर्माच्या आधारे प्राचीन काळापासून आलेल्या उपचार पद्धती वापरून लोकांना पुन्हा जुन्या जमान्यात न्यायचे. जुनी बाबीनाच नव्याने लेबल लाऊन लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा करायचा. त्यातूनच हस्तस्पर्श [रेकी] चुंबक चिकीत्सा, आशीर्वाद पद्धती, अंगारे, धुपारे, मंत्र-तंत्र , वास्तुदोष , फेंगशुई, इत्यादी गोष्टींद्वारे फसवणूक करण्याची पद्धती असते. अनेक रोगांमधे कधी कधी माणसांची रोग प्रतीकारक शक्ती कार्यान्वित होते व पेशंटला फायदा होतो.

2] योगआयुर्वेद याचा आधार.

काही तथागत बाबा सध्या योगाचे व आयुर्वेद याचे मार्केटिंग करतात. योगाद्वारे शरीर स्वास्थ मिळते हे जरी बरोबर असले तरी अनेक आजार बरे होतात असे दावे केले जातात. जाहीरपणे त्याचे मेळावे भरविणे व दूरचित्रवाणीवरून हजारो लोकांच्या कवायती दाखवून लोकांना भजनी लावणे ही बुवाबाजीच होय.

3] कर्म विपाकाचा सिद्धांत.

समय से पहले और नसीब से जादा कभी किसिको कूछ नही मिलता” असे म्हणून जणू परमेश्वराने तुमच्या आयुष्याचा आलेख काढून ठेवला आहे. आणि हे जे काही आज घडते आहे ते गेल्या जन्माची पाप-पुण्याची बँक बॅलन्स आणि त्याचा इंटरेस्ट लॉस प्रॉफिट मामला आहे. ते तुमच्या हातात आता काहीच नाही. आता फक्त पुढच्या जन्मा करिता जे काही करायचे ते करा बस ..

ठेविले अनंते तैसेच रहावे |

चित्ती असू द्यावे समाधान |

न मिळो खावया , न मिळू ल्यावया |

तरी कृपा करे नारायण |

अशा मनोवृतीमुळे प्रयत्नवाद मारण्याचा प्रकार होतो.

4] लोकांना मनुवादी वृतीला बांधून ठेवणे.

प्रारब्ध, नशीब असे काय-काय सांगून माणसांना सतत पाप पुण्याचा हिशेब मांडायला लावायचे व त्यांच्याकडून अनेक कर्मकांडांद्वारे त्यांची लूटमार करायचे कारस्थान करणे. येथे आर्थिक दृष्टया भक्ताला लुटण्याचे कारस्थान असते.

5] गुरु महात्म्य वाढवणे.

गुरु महात्म्य वाढवून लोकांना भजनी लावण्याचे तंत्र असते. सतत भक्त्ताला स्वत:ला कमी लेखून गुरूला शरण जावे. ती बुद्धीची शरणागती नसून आनंदाची अनुभूती आहे असे भासविणे. स्वतंत्र बुद्धीने विचार करावयाचा नाही. संघर्ष करायचा नाही. का ? म्हणून विचाराचे नाही. बाबा वाक्यंम प्रमाणंम मानून सतत गुरु भजनी रंगून जायचे. त्याचेच गोडवे गायचे. त्यांचे फोटो असलेले ब्याच छातीवर , फोटो असलेले पेन खिशाला लटकावयाचे व सुरक्षा कवच म्हणून मिरवावयाचे.

6] संत साहित्याचा सोयीने वापर.

सतत बोलताना मात्र संतांचे अभंग, त्यांची सोयीची उदाहरणे देऊन व त्यांचा महिमा गाऊन, आपण जणू काय त्याच तोडीचे आहोत, साक्षात परमेश्वरच आपल्या मुखातून उद्दगारतो आहे. अशी वातावरण निर्मिती केली जाते.

वास्तविक संतांनी मानवतेचा व करुणेचा मार्ग सांगितला. व तो प्रत्यक्ष जीवनात आचरून दाखवला. मोह-माया, काम-वासना यापासून दूर परंतु आत्ताचे तथागत बाबा स्वत:मध्ये विलक्षण गुंतलेले असतात. या बाबाना विरोध केल्यास प्रचंड वादावादी करून दुर्जनांचा नाश करण्यासाठी कडवा सैनिक भक्त रूपाने तयार असतोच. कुठे कालचे संत आणि कुठे आजचे हे तथागत आध्यात्मिक संत ?

7] समाजाला बौद्धिक गुलाम बनवण्याची यंत्रणा.

हे जग मिथ्या आहे, मोह माया आहे , आयुष्य क्षणभंगुर आहे. सतत स्वतंत्र प्रज्ञेला सोडचिठ्ठी द्यायची, जिज्ञासा मारायची व दैववाद वाढवायचा. समाजाला आळशी करायचं व प्रपंच, समाज व राष्ट्र सगळ्यानाच उदासीन बनवत असलेल्या, तत्वज्ञानाची पेरणी विज्ञानाच्या आधारे करून, परंपरागत गुलामीत ठेवण्यासाठी नव्या युक्त्या वापरण्याचे तंत्र अवगत केले जाते. याला माणसे आहारी जातात व कायमची बौद्धिक गुलामी स्वीकारतात आणि आपल आयुष्य जगतात.

8] फ्रेंडली फॅसिझम.

व्यवस्था परिवर्तनाबद्दल भक्तांना कधीच सांगायचे नाही. खरा शत्रू कोण हे न सांगता काल्पनिक हितशत्रू म्हणून दूसरा उभा करायचा आणि मग त्यातून सुटण्यासाठी सोपे तत्वज्ञान साखरपेरणी करून मांडायचे. पुर्णपणे हुकुमशाही यंत्रणा स्वत:च्या आध्यात्मिक मंडळात उभी करायची. संपूर्ण साधन सुचिता मोडीत काढायची आणि काल्पनिक भूलभुलैयामागे लोकांची बुद्धी पांगळी करून स्वत:ला शरण येण्यासाठी सतत भक्ताला वेठीला धरायचे. व त्यातच मुक्ती आहे, बाबा वाक्यंम प्रमाणम मानायला भाग पाडायचे.

9] अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाचा फायदा घेणे.

गेल्या दशकात जागतिकीकरण, उदारीकरण, व खाजगीकरण या दुष्ट चक्रातून प्रचंड महागाई, भष्टाचार व बेकारी यांचे चटके सुरू झाले. त्यातून परीक्षा पेपर फूटी, बोगस मतदान, शुल्लक कारणासाठी जातीय व धार्मिक दंगे, नैसर्गिक आपत्ती, बॉम्बस्फोट अतिरेकी कारवाया, अपघात , प्रचंड व्यसनाधीनता बोकाळलेली आहे, या सर्व धामधुमीत समाज परिवर्तनाचा लढा देऊन काही मार्ग निघेल अशी आशा सामान्य माणसाला राहिली नाही. तो पुर्णपणे अगतिक बनला आहे.त्याची ही अगतिकता बुवा बाबांच्या पाथ्यावर पडली. समाजाला स्वकल्याणासाठी हाच बुवाबाजीचा मार्ग सोपा वाटू लागला. उगीच मोर्चे, लढा, धरणे, उपोषणे करण्यापेक्षा धार्मिक संस्कृती परंपरेतून आलेला बिनसंघर्षाचा मार्ग हवाहवासा वाटला तर नवल काय ?

10] जातीयता व धार्मिकता याला खतपाणी घालणे व त्यातून दंगे निर्माण करणे.

समाज एकसंध होताच कामा नये म्हणून त्याला सतत जाती-जाती, धर्मा-धर्मात विभागून ते तसेच राहतील व आपापसात कसे लढतील याची एक खेळी धर्मा-धर्मात उभी करून बुवाबाबा सतत समाजात संघर्ष निर्माण करतात. उघड-उघड हे दिसले नाही तरी खोलात जाऊन अभ्यास केला तर त्यांच्या संपूर्ण मांडणीची दिशा ही माझा धर्म श्रेष्ठ , इतरांचा कनिष्ट अशीच असते. त्यासाठी धार्मिक मेळावे भरविणे, जाती-जातीची संमेलने भरविणे व तेथे हजेरी लावणे व भावना भडकवणारी खोटी संतवाणी सांगून लोकांना वेठीस धरले जाते. यातूनच समाज तुकड्या-तुकड्यात विभागून ठेवण्याची मनुवादी वृती दिसून येते.

11] राजकीय ताकद जाणीवपूर्वक उभी करणे.

एकाच धर्माच्या लोकांना एकत्र करून, त्यांना जे राजकीय पक्ष त्यांच्या धर्माची मशाल घेऊन राजकारण करतात, त्यांच्या पाठीशी फळी उभी करण्यासाठी भक्तांना सतत संस्कारित केले जाते. व त्यातून राजकीय ताकद उभी केली जाते.

12] धनदांडग्याना / भांडवलदार यांना रान मोकळे करून देणे.

आजचे तथागत स्वयंघोषित बाबा लाखो रुपये उभे करून लाखो भक्तांना एकाच मंडपाखाली जमा करतात. कोट्यावधीची माया जमा करतात कशी ? तर यामागे असतो धनदांडगे व भांडवलदार यांचा हात. मग हीच मंडळी त्यांच्या व्यासपीठावर उपस्थित राहून स्व:तचे गोडवे महाराजांच्या मुखातून गाऊन घेतात. त्यामुळे लोक या लुटारू भांडवलदाराना आपले तारणहार मानतात व त्यांना पुन्हा लूटमार करायला रान मोकळे होते. अशी ही बदमाशांची साखळी आहे.ती सामान्य जनाना समजून घेणे अवघड असले, तरी ती समजून घेतली पाहिजे.

तथाकथित स्वयंघोषित आध्यात्मिक बाबा बुवांची आपल्या स्वयंघोषित, मधुर परंतु फसवी साखर पेरणीची काही वाक्य समाजाला कशी मोहिनी घालतात याचे काही नमुने पाहूया.

 • अ] भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
 • ब] तूच आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
 • क] तू आणि मी एक झाल्यास, या विश्वात काहीच कमी नाही.
 • ड] तुम्ही जगा, आणि दुसर्‍याला जगावा.
 • इ] तू मला भक्ती दे, मी तुला शक्ति देईन.
 • ई] माणसाला फळ मिळत नाही, तोपर्यंत सेवा करीत रहा.
 • उ] नामस्मरण करण्याची उत्तम जागा – शोचालाय.
 • ऊ] कुंडलिनी जागृतीतून जीवनाचे कोटकल्याण सहज साध्य.

प्रयत्नवाद संपवण्यासाठी आणि फसवा आनंद देण्यासाठी अजून बरेच काही शब्दफेक उदाहरना दाखल पुढीप्रमाणे असतात.

 • 1] जेथे विज्ञान संपते, तेथे अध्यात्म सुरू होते.
 • 2] ब्रम्ह-परब्रम्ह एकमेकाना भेटणे, म्हणजे जीवा-शिवाची भेट.
 • 3] समय से पहले, और नसीब से ज्यादा, किसी को कुछ नही मिळता.
 • 4] आनंदाचे डोही, आनंद तरंग.
 • 5] चराचरात तो भिनला आहे. सर्व गोष्टीत तोच जाणतो.
 • 6] जग मिथ्या आहे. माया क्षणभंगूर आहे. परमेश्वर तेवढाच सत्य आहे.

हे आणि असेच बरेच काही सारी बाष्कळ बडबड असते.

ही सारी बुवाबाजीची वास्तव भयानकता समजून घेऊया आणि त्यापासून स्वत:ला व समाजाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करूया.