बाबाबुवांचं आध्यात्मिक ढोंग

विवेकवादी चळवळींना अनेक अडचणी आणि आव्हानांना तोंड द्यावे लागते. आध्यात्माचे ढोंग करणारे बाबाबुवा ही एक मोठीच अडचण आहे. यांच्या आध्यात्माचं स्वरूप सामान्य बाबाबुवांच्या पेक्षा वेगळं असतं. ते आधुनिक आणि सुसंस्कृत भाषा वापरतात. काही अपवाद सोडले तर त्यांच्यापैकी बहुतेकजण चमत्कार करून दाखविण्यापासून लांब राहतात. आपल्या भक्तांना ते नैतिक उन्नतीचेआश्वासन देतात. त्यांच्या आध्यात्माला तत्त्वज्ञानाचा पाया असतो आणि आध्यात्माच्या जोडीने ते काहीनाकाही सामजिक सेवाकार्य करीत असतात.

त्यामुळे सकृतदर्शनी आपल्याला असा प्रश्न पडतो ‘या बाबांच्यात काय वाईट आहे?’ या देशातल्या लोकांना आध्यात्म आणि त्या नावाखाली चालणारे सारे उपक्रम आणि कर्मकांडे यांची मोठी मोहिनी आहे. आध्यात्म या संकल्पनेबाबत बरीच मतभिन्नता असली तरी आध्यात्माच्या स्वरूपाबद्दल काहीसं समान आकलन आहे. सर्व आध्यात्मवादी हे मानतात की, ‘‘आध्यात्मिक तत्त्व जडतत्त्वापेक्षा वेगळं आहे; आध्यात्मिक तत्त्व चैतन्यमय असतं; मुळात शुद्ध असलेल्या या तत्त्वावर अज्ञानाची पुटं चढतात आणि ते अशुद्ध होतं; अनेक बंधनात गुंतून पडल्याने ते मलीन होते; परंतु जेव्हा त्याला ‘स्व’ची जाणीव होते, आपण काय आहोत हे उमगते तेव्हा हे तत्व म्हणजे आत्मा याचं परमतत्त्वाशी म्हणजे परमात्म्याशी मीलन होतं आणि त्याला चिरशांती लाभते’’. कल्पना नक्कीच रम्य आहे आणि ती वैज्ञानिक दृष्ट्या सत्त्य आहे का याची शहानिशा आपण इथे करणार नाही.

इथे आपल्याला एवढंच बघायचं आहे की एखादी व्यक्ती आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत झालेली आहे, हे कसं ओळखायचं? याचं एक ठराविक उत्तर असतं. ते असं: अशी व्यक्ती संयमी असते, सद्गुणी असते आणि दुसऱ्याच्या मालकीच्या वस्तूला शिवत नाही. सत्त्य आणि अहिंसा ही त्याची जीवनमूल्ये असतात. दुसऱ्याच्या दुःखाने असा माणूस कळवळतो आणि साऱ्या मानवजातीच्या सुखासाठी झटतो. तो मूर्तिमंत शुचिता आणि पावित्र्य असतो. तो ऐहिक जगात जगत असला तरी त्याच्या जीवनात या जड जगाच्या पलिक डचं मूल्यवान सौख्य असतं. स्वामी विवेकानन्द, गाडगे बाबा, गांधीजी, विनोबा ही सारी अशा उन्नत आध्यात्मिक व्यक्तिमत्वाची उदाहरणे आहेत.

महाराष्ट्रातील अशा आध्यात्मिक विचाराच्या अनेक संतांनी फार मोठं समाजकार्य केलेलं आहे. त्यांनी रचलेल्या साहित्यामध्ये दया, औदार्य, क्षमा, सत्त्य, परोपकार या मूल्यांचं महत्त्व बिंबवलेलं आहे. गाडगे बाबा सांगत असंत ‘देव देवळात नसतो; तो असतो माणसाच्या हृदयामधे.’ आजकाल बाबाबुवांचं जे पीक आलेलं आहे त्याचा विचार संतांनी उभारलेल्या या पाश्वभूमीवर व्हायला हवा. एका बाजूला निःस्वार्थी सेवेचे व्रत घेतलेले अग्रणी, संत गाडगे बाबा, ज्यांच्या मालकीच्या खापराचा तुकडा, एक झाडू आणि अंगावर असलेले कपडे एवढ्याच वस्तू होत्या. ते आध्यात्मावर विद्वत्तापूर्ण प्रवचनं करीत नसंत तर भोळ्याभाबड्या लोकांना समजेल अशा रांगड्या भाषेमध्ये जनजागृती करीत, अंधश्रद्धा निर्मूलन करीत. आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या मालकीचे हेलिकॉप्टर बाळगणारे आध्यात्म वाग्पटु स्वयंघोषित अलौकिक शक्तींचा दावा करणारे आजचे बाबाबुवा!

हे विद्वद्जड आध्यात्मिक बाबा, बुवा (आणि माता, देवी) गरीबी, भूक, अज्ञान, रोगराई, शोषण, निरर्थक कर्मकाण्डं यांच्या बाबत कधी बोलत नाहीत. याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. या प्रश्नांना त्यांनी कधीच हात घातला नाही. किंवा जनसामान्यांच्या मनात असलेला देव-धर्माबाबतचा गोंधळ दूर करण्याचाही प्रयत्न केला नाही (जो गाडगेबाबा आयुष्यभर करीत राहिले होते) गरजू, अगतिक लोकांना मदतीचा हात देण्याऐवजी ते त्यांच्याकडून स्वतःचीच सेवा करून घेतात. निरर्थक कर्मकाण्डांतून लोकांची सुटका करण्याऐवजी ते मोठमोठे यज्ञयाग आणि पूजा-समारंभ घडवून आणतात आणि स्वतःचे अवडंबर माजवतात. स्वतःच्या गळ्यात माळा घालून घेतात. गाडगेबाबांसारखे हातात झाडू घेवून रस्ते झाडणे, गटारी साफ करणे, झोपडीत राहणे, कोणाकडून तरी मिळालेला भाकरीचा तुकडा पाण्याबरोर गिळून त्यावरच समाधान मानणे हे आधुनिक महंतांना कसं जमणार? गाडगे बाबांनी आपलं हे व्रत जन्मभर पाळलं.
या आधी आपण अनेक सुप्रसिद्ध आध्यात्मिक बाबाबुवांच्या काळ्या कारवायांची चर्चा केली आहे; त्यांच्या या कारवाया आणि भ्रष्टाचार उघडकीस येवूनही त्यांचा धंदा भरभराटीमधेच चालू आहे. या बाबाबुवांच्या भूलथापांमुळे जनतेचे लक्ष स्वतःच्या रास्त मागण्या आणि खऱ्याखुऱ्या समस्यांवरून विचलित होतं. आपल्या गरीबीचं, अज्ञानाचं आणि एकूण हालाकीच्या स्थितीचं कारण काय हे समजून घेण्याचेही त्यांना भान राहात नाही, मग समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे तर दूरच.

आजची जनता आत्मकेंद्री झाली असल्याने सामाजिक बांधिलकी किंवा विषमता याविषयी विचार करण्याची त्यांना गरज वाटत नाही. त्यांना स्वतःच्या समस्या लवकरात लवकर सोडवायच्या असतात आणि स्वतःच्या ताणतणावापासून त्वरित मुक्ती हवी असते. आधुनिक आध्यात्मातून त्यांना समस्या सोडविता येतील आणि तणावातून मुक्ती मिळेल असे वाटते. त्यामुळे अनेक सुशिक्षित तरूण त्याकडे वळतात आणि मोक्ष नावाच्या मृगजळामागे धावत सुटतात. मोक्ष म्हणजे सर्व अन्वेशक प्रयत्नांची समाप्ती; सामाजिक ताण्याबाण्यांची समाप्ती आणि केवळ आत्मोद्धार! आध्यात्मिक बाबाबुवांनी स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकवून ठेवलेली ही युवाशक्ती प्रगतीशील सामाजिक चळवळींकडे वळवता आली तरच सामाजिक परिवर्तन घडण्याची आशा आहे.
ही झाली सुदशिक्षितांची कथा. बहुजनसमाजाची वंचित जनता गरीबी आणि त्याबरोबर येणाऱ्या सर्व अडचणी आणि संकटे यापासून मुक्ती मिळावी म्हणून बाबाबुवांकडे वळते. लोक आपापल्या कुवतीनुसार व सामाजिक-आर्थिक पातळीनुसार बाबाबुवा, महाराज, आचार्य अशा चढत्या श्रेणीच्या आध्यात्मिक कुबड्यांचा आधार घेतात. या तिन्ही प्रकारच्या आध्यात्मिक गुरूंचे मार्ग आत्मकेंद्री असतात. व्यक्ती बदलली (सुखी झाली) तर समाजही बदलेल हेच त्यांचे आद्यतत्त्व. आपल्या श्रोत्यांना ते आत्मोन्नतीचा उपदेश देतात. आणि अखेरीस श्रोत्यांना आपल्या सर्व व्यथा गुरुजींवर सोपचून निर्धास्त होण्याचा आणि अर्थातच गुरुजींना शरण जाण्याचा सल्ला देतात. गुरुजी स्वतःच्या आध्यात्मिक शक्तीच्या सहाय्याने सर्वांच्या सर्व व्यथांचे निरसन करण्यास समर्थ आहेत असे आश्वासन देतात. गुरुजींना आपलं तन-मन-धन अर्पण करण्यातच आपलं श्रेय आहे ह्याची भक्तांना खात्री पटते. गुरुचरणी लीन झालेला हा आत्मकेण्द्री भक्त समाजापासून मात्र दिवसेंदिवस दूर दूर जातो.

सध्या आपली सर्व ताकत तळागाळातील लोकांच्या अंधश्रद्धा आणि त्यांचे बाबाबुवा-भगत यांचा मुकाबला करण्यात संपत आहे. ‘महाराज’ वर्गातील उघडउघड कोंबडं/बकरी/रक्कम न मागणारे परंतु अंतस्थ हेतू तोच असणारे सुशिक्षित मध्यमवर्गियांचे गुरू आपल्या हाती लागतच नाहीत. आणि आचार्यवर्गाबाबत तर बोलायलाच नको. हे आचार्य व्यक्तिमत्व घडविण्यासाठी मोठमोठ्या कार्यशाळा घेतात; आरोग्यसेवा पुरवतात आणि थोडसं समाजोपयोगी कामही करतात. पण त्याचवेळेस ते लोकांच्यामध्ये प्रगतीशील चळवळी, शासन आणि सामाजिक जीवन यांच्याबाबत औदासिन्य, अलिप्तपणा आणि बेपर्वाई निर्माण करतात. केव्हा केव्हा तर परधर्माविषयी द्वेशही वाढवतात. या सर्वांचा बळी ठरतो तरुणांचा विवेक आणि हे तरूण मग भलत्याच दिशेला भरकटतात. ही समस्या फार भयावह आहे आणि त्यावर काही सहज तोडगा सापडण्यासारखा नाही. आपण या तरुणांना एवढंच सांगू शकतो की तुम्ही स्वतः सारासार विचार करा आणि काय खरं आणि काय करणं योग्य ते ठरवा.

विज्ञानाच्या प्रगतीआधी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे धर्म देत असे. आता ज्ञान मिळविण्याची आणि अन्वेषणाची जबाबदारी वैज्ञानिक ननोवृत्तीवर आलेली आहे आणि हे धर्मालाही मान्य आहे. एवढ्यापुरतीच ही जबाबदारी मर्यादित नाही. तर चांगलं काय आणि वाईट काय, आपण जीवन कसं जगावं, आपल्या जीवनाचं ध्येय काय असावं हेही वैज्ञानिक मनोवृत्तीनेच ठरवायला हवं. आध्यात्मही हे करू शकेल. पण इथे अडचण अशी असते की नीतिमत्तेच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रेशितांच्या आणि गुरूंच्या धार्मिक ग्रंथातले संदेश आणि अनुज्ञा एकमेकापासून अगदी वेगळ्या असतात. यांच्या घोटाळ्यामध्ये नैतिकतेचे पोषक दाणे हरवून जातात आणि हाती राहतात ती केवळ कर्मकाण्डांची फोलपटं. याचा अनुभव आपण रोज घेत असतो.

तेव्हा नैतिक दृष्टीनेसुद्धा ‘चांगले जीवन’ म्हणजे काय हे बारकाईने आणि निःपक्षपातीपणे भावनांच्या आहारी न जाता विवेकालाच ठरवावे लागेल. आणि ते प्रत्यक्ष व्यवहारात आणताना प्रत्येक विवेकवादीस आत्मविश्वास डगमगू न देण्याची हिंमत बाळगावी लागेल. आयुष्यभर मानववादी पवित्रा ठेवूनच जगण्यामध्ये मानवी जीवनाची प्रतिष्ठा आहे. आपला आंतरिक प्रामाणिकपणा आणि त्यासाठी लागणारी हिंमत हेच आपले गुरू आहेत. विवेकबुद्धीच आपल्याला आपल्या समस्यांची ओळख, आकलन आणि जागरुकता देवू शकेल. या आंतरिक गुरूच्या मार्गदर्शनाने जगणं हे जीवनाचं सार आहे. हे आपली आध्यात्मिक बुवाबाजीच्या तावडीतून सुटका करतील आणि एका सुदृढ समाजाचा पाया रोवतील.

जडवाद आणि चैतन्यवाद: जडवाद आणि चैतन्यवाद या केवळ दोन विश्वाच्या स्वरूपाबाबतच्या परस्परविरोधी अमूर्त उपपत्ती किंवा सिद्धान्त नाहीत की ज्यांच्याकडे सामान्य माणसाला दुर्लक्ष करून चालेल. प्रत्येक समस्येचं अर्थबोधन आणि आकलन करण्याचे ते दोन परस्परविरोधी मार्ग आहेत; परस्परविरोधी व्यावहारिक दृष्टिकोन आहेत आणि त्यामुळे त्यांनी काढलेले निष्कर्ष, व त्यानुसार घडणारे आचार आणि कृती हे सर्वच अगदी वेगळं असत. जडवाद आणि चैतन्यवाद यांच्या व्याख्या करण्याआधी या दोन परस्पर विरोधी विचारधारांनुसार रोजच्या समस्यांना सामोरे जाण्याच्या मार्गांचा विचार करू या. यातूनच आपल्याला त्यांच्यातील तफावतीचं महत्त्व लक्षात येईल.

एक बहुतेकांनी अनुभवलेली प्रचंड वादळाची नैसर्गिक घटनाच उदाहरणार्थ घेऊ या. असं वादळ कशामुळे होतं? चैतन्यवादी म्हणेल, ‘हा देवाचा प्रकोप आहे. देव संतापाने मानवांवर कडकडाट करणाऱ्या विजेच्या लोळांचा मारा करतो. याउलट जडवादी वादळ ही निसर्गशक्तींच्यामुळे घडून येणारी घटना मानतील आणि त्यानुसार वादळ का घडतंयाचं स्पष्टीकरण देईल. फार पूर्वीच्या काळीसुद्धा जडवादींनी त्याचा संबंध देवाच्या रागाशी जोडला नाही. त्यांच्यामते ढगामध्ये असलेले कण एकमेकावर आदळल्याने वादळ निर्माण होत. हे स्पष्टीकरण बरोबर आहे की नाही हा इथे मुद्दा नाही. मुद्दा आहे जडवादी स्पष्टीकरण शोधण्याच्या प्रयत्नाचा. चैतन्यवादींच्याप्रमाणे घटनांची उत्पत्ती देवाच्या राग-लोभावर सोडून न देण्याचा. निसर्गशक्तींचा बराच अभ्यास झालेला असल्यामुळे आजच्या जमान्यात वादळ केव्हा, कुठे व किती तीव्रतेचे होणार आहे ह्याचंही अनुमान आणि कारणासह स्पष्टीकरण मिळतं. त्यानुसार केलेलं हवामानाचं भाकीत तंतोतंत नसलं तरी बऱ्याच अंशी खरं असतं. ज्ञान कितीही मिळवलं तरी ते नेहमी अपूर्णच असतं. पण कोणत्याही प्रसंगी त्यावेळी प्राप्त असलेल्या ज्ञानाच्या आधारावर जडवादी स्पष्टीकरण देणंच संयुक्तिक व हितावह असतं हे वारंवार सिद्ध झाल्याने चैतन्यवादी स्पष्टीकरणं मान्य होत नाहीत. बहुतेक सुशिक्षित लोक -चैतन्यवादी असले तरीही- घटनांमधला जडवादी कार्यकारण संबंधच ग्राह्य मानतात.

दुसरं उदाहरण सामाजिक जीवनातलं घेवू या. काही लोक श्रीमंत आणि काही गरीब असं का असतं? अनेक जणांना, विशेषतः गरीबांना हा प्रश्न नेहमी पडतो. चैतन्यवादी लगेच म्हणतील, ‘कारण देवानेच त्यांना गरीब बनवलं आहे. देवाच्या मर्जीप्रमाणे काही जण श्रीमंत होतात तर काही गरीब. याउलट जडवादी गरीबीची कारणे समाजजीवनाच्या भौतिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये शोधतील. समाजामध्ये काहींच्या मालकीची जमीन असते, उत्पादनाची साधनं असतात तर काहींच्याकडे जमीनही नसते आणि उत्पादनसाधनंही नसतात. या दुसऱ्या वर्गाला पहिल्या वर्गासाठी काम करावं लागतं वगैरे वगैरे. अशा प्रश्नांच्या बाबतीत जडवादी आणि चैतन्यवादी आकलनांमधील तफावत लक्षात घेणं केवळ सैद्धांतिक पातळीवर नव्हे तर प्रत्यक्ष व्यवहाच्या दृष्टीनेही फार म्हत्त्वाचं असतं. वादळ या नैसर्गिक घटनेच्या जडवादी आकलनामुळे आकाशातून कोसळणाऱ्या विजेपासून आपलं संरक्षण करण्यासाठी घरावर तडित् संवाहक (परिचित भाषेमध्ये लायट्निंग कंडक्टर) बसवतो. परंतु चैतन्यवादी केवळ देवाची प्रार्थना करू शकतात. (त्यांच्या घरालाही व्यवहरवादी वास्तुतंत्रज्ञ तडित् संवाहक बसवून टाकतातच म्हणून वीजेचा धोका नसतो.) आणि वीज पडली नाही म्हणून देवाचे आभार मानतात.

चैतन्यवाद आणि अलौकिकशक्तिवाद: चैतवादानुसार कोणत्याही स्पष्टीकरणामध्ये आरंभी किंवा प्रथम चैतन्य आणि त्यानंतर जड वस्तूचा विचार येतो. जडसृष्टीतील सर्व काही अवलंबून आणि नियंत्रित असतं चैतन्यामुळे. याउलट जडवादांत जडाला प्रथमिकता असते आणि चैतन्यही जडावर अवलंबून आणि जडाने नियंत्रित असते. ही तफावत विश्वाच्या आणि पृथ्वीवर घडणाऱ्या घटना आणि अस्तित्वात असलेल्या जडवस्तूंच्या व्यावहारिक आणि सैद्धांतिक पातळीवरील आकलनांमधेही स्पष्ट दिसून येते.

चैतन्यवादाचा पाया आहे धर्म आणि ईश्वरविद्या (थिऑलॉजी). काही चैतन्यवादी सिद्धांतांनी आपली धार्मिक कात टकून दिली असली तरी कोणत्याही समस्येला भिडताना चैतन्यवादी धर्माचीच री ओढतात. श्रद्धा, तसेच गूढ, अज्ञात आणि अलौकिक यांच्यावरील विश्वास यांच्यापासून चैतन्यवाद अलग करताच येणार नाही. धर्माची आणि कोणत्याही चैतन्यवादी आकलनाची मुळं एकच असतात. या उलट जडवादी प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण या जडसृष्टीमधेच शोधतो. ती गोष्ट अगर घटना घडून येण्यास जे जे घटक जबाबदार असतील ते निश्चित करणं, त्यांचं आकलन व नियंत्रण करणं यासाठी प्रयत्न करतो.
माणसाच्या डोक्यामध्ये धार्मिक आणि अलौकिक या संकल्पना प्रथम उत्पन्न झाल्या त्याच्या निसर्गशक्तींबाबतच्या अज्ञानातून आणि त्यांच्यापुढे त्याला पत्कराव्या लागलेल्या अगतिकतेतून. ज्या निसर्गशक्तींचं माणसाला आकलन झालं नाही त्यांना त्याने मूर्तरूप दिलं आणि घडून येणाऱ्या साऱ्या आकलनापलिकडच्या गोष्टींना त्या मूर्तरूप अलौकिक शक्तीच्या कारवाया मानलं. पण जेव्हा समाजामध्ये वर्गव्यवस्था उभी राहिली आणि त्यातून निर्माण झालेल्या परस्पर नातेसंबंधांमुळे व्यक्तीच्या आचरणाचं नियंत्रण होवू लागलं तेव्हा ते त्यांच्या आकलनापलिकडे गेलं आणि या परिस्थितीत माणसांनी अलौकिक शक्तींच्या संकल्पनांतून वास्तवसमाजाची एक प्रतिकृती निर्माण केली. त्यामध्ये पृथ्वीवरील राजे आणि सरंजामदारांसारखे पण मानवापेक्षा कैक पटीने श्रेष्ठ अशा देवांची निर्मिती केली. सर्व धर्म आणि चैतन्यवाद यांचा गाभा म्हणजे जडसृष्टीचे प्रतिबिंब असते. आणि त्यांच्या मते हे प्रतिबिंब चैतन्यमय असते आणि खरं अस्तित्व असलेल्या मानवांवर वर्चस्व गाजवते.

चैतन्यवादाचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्यामध्ये गृहित धरलेली द्वंद्वे. उदा: आत्मा-देह, देव-मानव, स्वर्ग-इहलोक (आणि नर्क), बुद्धीगम्य आकार आणि कल्पना-जडरुपी अस्तित्व असलेलं इंद्रियगोचर जग इत्यादी. चैतन्यवादानुसार जड जगतापलिकडे एक शाश्वत, जास्त सत्य, पुरातन आणि उच्च असं जग असतं. हे शाश्वत जगच या इंद्रीयगोचर जगाचं उगमस्थान आणि कारण आहे आणि त्यावर सत्ता गाजवतं. जडवादाला केवळ एकच जग मान्य आहे आणि ते म्हणजे हे इन्द्रियगोचर जग (आणि त्याभोवतालचं अज्ञात परंतु आकलनीय विश्व.)

गेली ३०० वर्षे एक व्यक्तिनिष्ठ चैतन्यवाद नावाचा सिद्धांत मांडण्यात येत आहे. या सिद्धांतानुसार जड सृष्टी अस्तित्वातच नसते. सारं काही भासतं ते असतं केवळ इंद्रियांचं संवेदन आणि मनाच्या कल्पना; या संवेदन आणि कल्पनांना समरूप अशी जड स्वरुपातील बाह्यसृष्टी नसते. ज्ञान आणि ज्ञानप्रप्तीला हा सिद्धांत लागू केला म्हणजे आपल्या स्वतःच्या बाहेरील जड सृष्टीचे ज्ञान होणे अशक्य आहे. आणि आपण जे ज्ञान म्हणतो ते केवळ भास असतात त्या खऱ्या गोष्टी (थिंगज् इन देम्सेल्व्हज) नसतात. या स्वरूपाचा चैतन्यवाद आजकाल फार बोकाळला आहे. याचे पुरस्कर्ते या वादाला अत्यंत वैज्ञानिक अशा स्वरूपाचा सिद्धांत मानतात. त्यांच्या मते सत्य जग मानवाला आकलन होण्याजोगे नसते आणि गूढ शक्तींचा प्रदेश पूर्णपणे आपल्या आकलन शक्तीच्या बाहेरच राहतो. असल्या कल्पनाविलासाची ही नवी फॅशन म्हणजे समाजाला कीड लागल्याचे लक्षण आहे.

व्यवहारातील जडवाद आणि चैतन्यवाद: चैतन्यवाद आपल्याला विज्ञानावर फार विसंबू नये असे सांगतो. याचं कारण असं की अत्यंत महत्त्वाची सत्त्ये विज्ञानाच्या आवाक्याच्या पलिकडे असतात. म्हणजेच ते आपल्याला पुरावा, अनुभव आणि सराव यांच्या आधाराने कशावर विश्वास ठेवण्याऐवजी ज्यांनी ज्ञानप्राप्तीच्या या सामान्य आधारापेक्षा जास्त श्रेष्ठ असे ज्ञानाचे स्रोत आत्मसात केले आहेत (म्हणजे असा जे दावा करतात) त्यांचा शब्द माना. तुमच्या आत्म्याचं आंतरिक जीवन सर्वात महत्त्वाचं आहे. काहीतरी आंतरिक पुनर्जनन (इनर रिजनरेशन) झाल्याशिवाय आपल्या मानवी समस्यांचं निराकरण होणं अशक्य आहे. चैतन्यवादाची मुळं आपल्या विचारप्रक्रियेमध्ये फार खोलवर रुजलेली आहेत त्यामुळे लोक आपल्या विचारांना आणि आकांक्षांना चैतन्यवाचा मुलामा चढवतात. पण त्यामुळे सत्य सांगण्यामध्ये अडथळे येतात आणि गोंधळ आणि त्रुटी निर्माण होतात.

प्रत्येक बाबतीत आपण चैतन्यवादाऐवजी जडवादाचीच कास धरायला हवी. कारण आपण सर्वजण हे जाणतो की जडवादामध्ये वस्तू जशा असतात तशाच अभ्यासिल्या जातात; त्यासाठी त्यांच्याबद्दल चैतन्यवादी कल्पनाविलास करून चालत नाही. याच वैचारिक मार्गाने आपल्याला नैसर्गिक आणि सामाजिक शक्तींचे आकलन शक्य होते. जडवादी मार्गानेच आपल्याला निसर्गाच्या शक्तींवर (पूर्ण नाही पण बऱ्याच अंशी) ताबा मिळवता येतो आणि त्यांचा समाजाच्या हितासाठी व प्रगतीसाठी उपयोग करता येतो. जडवादामुळे आपला आपल्यावरील व आपल्या समाजावरील विश्वास वाढतो; आपल्या आकलनापलिकडच्या गूढ अशा काही गोष्टी नसतात याची खात्री वाटते; ईश्वराची इच्छा म्हणून कोणताही अन्याय किंवा अविवेक सहन न करता त्याला विरोध कराण्याची तसेच श्रेष्ठ असल्याचा, अधिकारीपणाचा दावा करणाऱ्यांची शिकवण नाकारण्याची हिंमत येते; आणि आपण स्वतःला, निसर्गशक्तींना आणि समाजाला समजू शकतो आणि त्यांच्यात बदल घडवून आणू शकतो असं आत्मबळ पण येतं. चैतन्यवादाला आपण थारा देता कामा नये कारण तो मोठे मोठे शब्द वापरून माणसामाणसातील उच्चनीचता आणि गुलामगिरीला प्रोत्साहन देतो आणि मानवी सामर्थ्याला कमी लेखतो. याबाबत मॅक्झीम गॉर्की म्हणतात, ‘मी माणसाच्या पलिकडे असणारी कोणतीही कल्पना करू शकत नाही. माझ्यासाठी मानव आणि फक्त मानवच चमत्कार घडवून आणू शकतो आणि तोच साऱ्या नैसर्गिक शक्तींचा भविष्यकाळातील मालक आहे. जगातील सर्वात सुंदर गोष्टी मानवाच्या श्रमातून, त्याच्या हातातील कौशल्याने साकारलेल्या आहेत आणि आपल्या सर्व कल्पनाही श्रमप्रक्रियेतूनच निर्माण होतात.

‘आणि जर काही पवित्र गोष्टीबद्दल बोलण्याची वेळ आलीच तर ती गोष्ट म्हणजे मानवाचं स्वतःबाबतचं, स्वतःच्या कर्तृत्वाबाबतचं असमाधान आणि सतत स्वतःमध्ये सुधारणा करीत राहण्याचे प्रयत्न. पवित्र आहे स्वतःच निर्माण केलेल्या क्षुल्लक आणि निरर्थक गोष्टींची त्याला वाटणारी घृणा. पवित्र आहे त्याची लालसा, हेवा, रोगराई, मानवामानवातील युद्ध, अशा दुर्गुणांचे निर्मूलन करण्याची जिद्द आणि पवित्र आहेत त्याचे श्रम.