पूर्वी ज्याला परलोकविद्या -किंवा मृतव्यक्तीशी संपर्क साधणं किंवा माध्यम असणं म्हणत असंत त्याला आजकाल चॅनलिंग म्हटलं जातं. ह्या प्राचीन कलेचं पुनरुज्जीवन १८४८ मध्ये मार्गारेट आणि केट फॉक्स या ११ आणि ९ वर्षीय मुलींमुळे झालं. न्यूयॉर्कमधील त्यांच्या हाइड्सव्हिल येथील राहत्या घरामध्ये त्यांना आत्म्याने झपाटल्याचा अनुभव आला; धक्के लागले; टेबलखुच्या जागच्या हलू लागल्या; थोडक्यात ज्याला आपण भानामती म्हणतो असे अनुभव येवू लागले. या फॉक्स भगिनींना खूप प्रसिद्धी मिळाली आणि त्या मृत व्यक्तींना आवाहन करण्याचे जाहीर कार्यक्रम करू लागल्या. त्यांच्या समोर बसलेल्या व्यक्तींच्या मृत नातेवाईकांचं त्या थक्क करून सोडेल इतकं तंतोतंत वर्णन करू लागल्या. एडमंड हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, आणि फेन्मोर कूपर हे प्रसिद्ध लेखक यांच्या सारखे लोकही त्यांचे अनुयायी बनले. या प्रात्यक्षिकांनंतर अमेरिका आणि इंग्लंड या दोन्ही देशांमध्ये परलोकविद्येचे पेव फुटले. पण १८८८ साली अखेरीस मार्गारेट फॉक्स हिने एका सार्वजनिक सभेमध्ये कबुली दिली , की तिच्या अंगातील परलोकविद्या आणि आध्यात्मिक शक्ती आणि अनुभव हे सारं अथपासून इतीपर्यंत ढोंग होतं. आणि ज्या प्रभावांचा एवढा गलबला झाला ते ती कसे घडवू शकली त्याचेही तिने प्रात्यक्षिक दाखविले. त्याच वर्षी पुढे तिच्या बहिणीनेही अशीच कबूली दिली. परंतु चॅनलिंग किंवा परलोकविद्येचे आणि मृतात्म्यांशी संपर्क साधू शकणाऱ्या ‘माध्यमांचे’ ढोलताशे वाजतच राहिले. आणि परिस्थिती खालावलेल्या मार्गारेटला इतर माध्यमांनी आपली कबुली परत मागे घ्यायला लावले. आर्थर कोनन डॉयल हा लेखकही मार्गारेटच्या नादी लागला होता. शेरलॉक होम्स लिहिता लिहिता त्याची पतिभा संपली असावी.
हॅरी हौदिनी या जादूगाराला आपल्या मनामध्ये परलोकविद्येबाबत गाढ श्रद्धा जागी व्हावी अशी उत्कंठा लागली होती. त्याच्या मनात त्याच्या आईविषयी नितांत प्रेम होतं आणि त्याचा संपर्क त्याच्या आईशी साधून देणाऱ्या माध्यमाच्या शोधामध्ये त्याने वीस वर्षे घालविली. या माध्यमांची एकानंतर एक ढोंगं उघड होत गेली तसा तो फार संतप्त झाला. आणि दुःखी जीवांची फसवणूक करणाऱ्या या माध्यमांची ढोंगबाजी उघडी पाडण्याचा त्याने चंग बांधला. मरणानंतर परलोकातून आपल्या पत्नीशी संपर्क साधला आहे का याची खात्री करण्यासाठी त्याने तिच्याबरोबर एक परवलीचा संदेश ठरवला. पत्नीनेही त्याच्यासारखाच माध्यमांचा शोध घेतला पण सगळेच ढोंगबाज निघाले!
आजकाल माध्यमांना ‘चॅनलिंग म्हणतात. त्यांचं कामही आता वेगळं असतं. ते वैयक्तिक संपर्क साधत नाहीत तर साऱ्या मानवजातीला कोण्या प्राचीन काळातील ऋषींचा संदेश देण्याचं महान कार्य करतात. ३५००० वर्षांपूर्वीच्या राम्दा नावाच्या एका महान आत्म्याचा संदेश देणाऱ्या चॅनलर श्रीमती नाइट या बाई आहेत. आपल्याला ज्ञात असलेल्या जगामध्ये जवळच्या भविष्यात फार मोठे व भयानक फरक होणार आहेत – उदा: समुद्राच्या पाण्याची पातळी २०० मिटरने वाढेल- अशा तऱ्हेची भाकिते त्या करीत असतात. आणि आपलं दुर्दैव असं की ग्रीन हाउस इफेक्टमुळे समुद्राची पातळी २०० मिटर नव्हे पण जाणवण्याइतकी वाढते नक्कीच आहे. हा मानवनिर्मित निसर्गाचा ऱ्हास आहे. आणि ह्या बाबतीत असल्या भ्रामक विज्ञानांचा शिरकाव झाल्यास खऱ्या समस्येकडून आपलं लक्ष विचलित होईल. वैज्ञानिक सत्य जाणण्याऐवजी जनतेमध्ये गैरसमज पसरतील.