जन्म नक्षत्र आणि जन्म राशीचा डोलारा

प्रत्येक व्यक्तीला एक जन्म नक्षत्र आणि जन्म रास असल्यामुळे ज्योतिषरत्नवाल्यांनी नवरत्न बहाल केलेली आहेत. स्वाभाविकच जन्म नक्षत्र आणि जन्म राशीचं गणित कसा आहे हे समजण महत्त्वाचं आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी जवळपास सत्तावीस दिवस लागतात. त्यामुळे भारतीयांनी आकाशाचे सत्तावीस भाग नक्षत्रांच्या रूपाने निर्माण केले. याचा अर्थ चंद्र रोज एका नक्षत्रात असतो. अर्थात चंद्राचा आणि नक्षत्राचा बिलकूल संबंध नाही. चंद्र आहे जवळपास चार लाख किलोमीटर अंतरावर, तर पाठीमागील ताऱ्यांनी निर्माण केलेलं नक्षत्र ५,२००,०००,०००,०००,००० किलोमीटर अंतरावर. आकडा वाचताना डोळे फिरतात. एवढ्या दूरच्या नक्षत्रांशी नातं जुळवायला निघालोय आपण, आपल्या महनीय ज्योतिषांच्या साथीने. अशा आंधळेपणाला नेमकं काय म्हणायचं? कॅलेंडरमध्ये रोज एका नक्षत्राचे नाव लिहिलेले असते. उदा. अश्विनी, भरणी, कृत्तीका….. याचा अर्थ त्या दिवशीचा चंद्र त्या नक्षत्रात असतो. व्यक्तीच्या जन्मावेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते त्याचे जन्म नक्षत्र. ते नक्षत्र ज्या राशीमध्ये असते, ती सदर व्यक्तीची रास. एवढं सोपं गणित आहे, रास आणि नक्षत्रांच. पण समजून घेतलं तर…
नावरस नाव हा एक ज्योतिषांनी प्रचलित केलेला त्यांच्या सोयीसाठीचा अतिरिक्त प्रकार आहे. प्रत्येक नक्षत्रासाठी त्यांनी काही अक्षरं नेमून दिलेली आहेत. मघा नक्षत्रासाठी मा, मी, मू, मे तर अनुराधा नक्षत्रासाठी ना, नी, नू, ने ही अक्षरं वाट्याला आलेली आहेत. हीच अक्षरं का? असा भाबडा प्रश्न विचारणं गैर ठरेल. मघा नक्षत्रावर एखाद्याचा जन्म झाला असेल तर मा, मी, मू, मे या अद्याक्षरांनी नावरस नाव ठेवणे. म्हणजे नक्षत्रावरून नावरस नांव ठेवता येते किंवा नावरस नाव सांगतले तर ज्योतिषी लगेच नक्षत्र सांगतो आणि आपण अचंबित होतो. यात अचंबित होण्यासारखं काय आहे? ज्योतिषानेच जर नक्षत्रांना अद्याक्षर दिली असतील, तर बाराखडी शिकलेला कोणताही मुलगा नक्षत्र सांगणारच.
नावरस नावाच्या सिद्धांतानुसार मघा नक्षत्रावर जन्मलेल्या दीपालीची रास सिंह आणि नावरस नांव मीना होते. तर अनुराधा नक्षत्रावर जन्मलेल्या सुनीलची रास वृश्चिक आणि नावरस नाव निलेश होते. व्यक्तीच्या कोणकोणत्या गोष्टींमध्ये ज्योतिषी घुसतील याचा अजिबात नेम नाही. आपल्या मुलामुलीचं नांव ठेवण्याचा अधिकार जन्मदात्यांनासुद्धा त्यांनी ठेवलेला नाही. रास कुठं! नक्षत्र कुठं! चंद्र कुठं! दीपाली कुठं! काही आहे का ताळमेळ. पण आकाशातील चंद्र, नक्षत्र आणि राशींचा संबंध दीपालीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी ज्योतिषांनी लावला आणि आमचा विश्वास बसला. कारण आम्हाला रास आणि नक्षत्र म्हणजे काय हेच माहीत नाही. मघा नक्षत्र आणि सिंह रास असलेल्या दीपालीच्या जन्माच्या वेळची आकाशातील स्थिती सोबतच्या चित्रामध्ये दाखवलेली आहे.

जन्म नक्षत्र मघा आणि सिंह राशीच्यावेळची आकाशातील स्थिती

अधिक माहितीसाठी खालील पुस्तके वाचा. संपर्क (९८६०४३८२०८)
१. सफर विश्वाची, डॉ. नितीन शिंदे, नाग नालंदा प्रकाशन, इस्लामपूर
२. पत्रिका जुळवताना, डॉ. नितीन शिंदे, नाग नालंदा प्रकाशन, इस्लामपूर