सर्व संस्कृती व सभ्यतांमध्ये अनंत काळापासून भुतांबाबत बोलबाला होता व आजही आहे, याबद्दल आपले काय मत आहे?

भुतांबाबत सर्व वयाच्या महिला आणि पुरुषांमध्ये फार कुतुहल असतं. एक क्रिकेट सोडलं तर हा एकच असा विषय आहे की ज्यावर प्रत्येकाला काहीतरी सांगायचं असतंच; एखाद्या भयानक प्रसंगाचं वर्णन जणूकाही सांगणारी व्यक्ती तिथे स्वतः हजर होती अशा आविर्भावामध्ये करायचं असतं. खरं तर तुम्ही जास्त खोलात जावून प्रश्न विचारलेत तर समजतं की ती सर्व माहिती पूर्ण ऐकीव आहे. कोणाकडून तरी केव्हातरी ऐकलेली! पण आश्चर्य असं की साऱ्या जगातील भुताखेतांच्या कथांमध्ये कमालीचं साम्य असतं. त्यातील आपल्याला माहीत असतं ते असं की-कोणीतरी मेलेलं असतं-अपघाताने, हृदयविकाराने किंवा म्हातारपणामुळे सुद्धा. मेल्यानंतर आत्मा शरीर सोडून जातो. मृत मनुष्य पुण्यवान असल्यास त्याचा आत्मा स्वर्गात व पापी असल्यास नरकात जातो. परंतु पुरेसे पुण्यवान अगर पापी नसलेले आणि अतृप्त इच्छा राहिलेले अधलेमधले स्वर्ग आणि नरक यामध्ये लोंबकळत राहतात. हे अतृप्त आत्मे म्हणजे भुते. पडकी घरं, जुनाट निर्मनुष्य किल्ले आणि जंगले किंवा पिंपळाच्या झाडावर राहतात. पौर्णिमा-अमावास्येच्या दिवशी त्यांचीही माणसांसारखीच पार्टी असते. ते केवळ रात्रीच जेवतात आणि त्यांच्याही आवडीनिवडी असतात. मटन, चिकन, लिंब, लोणी किंवा वेगवेगळ्या संस्कृतींनुसार त्यांच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात.
एक गोष्ट मात्र सगळीकडे सारखीच असते. आपण सगळेजण असं मानतो की देवाचं नाव घेतलं-रामराम-म्हणत राहिलं की भुतं पळून जातात. प्रत्येकाला १००% खात्री असते की भुतांना चेहरा नसतो, डोळे छातीवर असतात, सावली नसते, त्यांना आरशामध्ये आपले प्रतिबिंब दिसत नाही, त्यांची पावले उलटी असतात याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नसते. (अर्थात संशयवादी सोडून.)