विज्ञान आणि तंत्रविज्ञान यांचा प्रभाव प्रत्येकाला आपल्या दैनंदिन जीवनात चांगलाच जाणवतो. परंतु वैज्ञानिक दृष्टीने साक्षर असलेला मनुष्य आणि अगदी सामान्य माणूस यांच्या वैज्ञानिक प्रवृत्ती आणि वैज्ञानिक जाणीव यांमध्ये फार मोठी तफावत असते. सुशिक्षित अभिजनांमध्ये (एलिट) सुद्धा किती जणांमध्ये खऱ्या अर्थाने वैज्ञानिक प्रवृत्ती आणि जाणीव बाणवलेली असते याबद्दल शंका आहे. संविधानाने जरी वैज्ञानिक प्रवृत्ती आणि वैज्ञानिक स्वभावधर्म (टेंपरॅमेण्ट) जोपासणे आणि त्याचा प्रसार करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य मानले असले तरी त्याचे पालन मात्र गोगलगायीच्या गतीने होत आहे आणि काही वेळा तर ते त्यात गुंतलेल्या हितसंबंधामुळे उलट्या दिशेने चालले आहे. अंधश्रद्धांचे निर्मूलन करणारी वैज्ञानिक प्रवृत्ती समाजामध्ये रुजविण्याच्या योजनेमध्ये अंनिसला शाळेत जाणाऱ्या मुलांवर लक्ष केंद्रित करणं जास्त संयुक्तिक वाटतं. बालवयामध्ये मुलांच्या मनात ही प्रवृत्ती रुजवली तर त्याचं महत्व आणि फायदा त्यांना आयुष्यभर जाणवेल. परंतु सध्याच्या प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील औपचारिक शिक्षणामध्ये या बाबतीत काहीच तरतूद केलेली नाही. ही तूट भरून काढण्यासाठी अंनिसने अनौपचारिक शिक्षणामधून मुलांना अंधश्रद्धांचा घातकपणा आणि त्यामागे दडलेले शोषण, तसेच चमत्कारांच्या मागचा कार्यकारण संबंध शिकविण्याची योजना आखली.
वैज्ञनिक जाणीवेचा अभ्यासक्रम: केवळ व्याख्याने आणि प्रात्यक्षिके यातून आपले उद्दिष्ट साध्य होणार नाही तर ज्ञान आत्मसात करण्यासाठी व्याख्यानांबरोबर स्वयंअध्ययन, मित्र आणि शिक्षकांबरोबर चर्चा, आणि चाचण्यांमधून काय आणि किती समजलं याचं मूल्यांकन याचीही गरज आहे याची अंनिसला जाणीव झाली. योजना यशस्वी करण्यासाठी कळीची भूमिका शिक्षकांची असते. म्हणून वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी योग्य अशा विविध विषयांच्या अभ्यासक्रमासमवेत शिक्षक प्रशिक्षणाचा अभ्यासक्रमही आखण्यात आला. शाळेच्या वेळेबाहेर आणि सुट्टीच्या दिवशी वैज्ञानिक प्रवृत्ती जोपासण्याचे शिक्षण कसे द्यायचे याचे शिक्षकांना प्रशिक्षण देणं या अभ्यासक्रमात आहे. तसेच विद्यार्थ्यांची ज्ञान मिळविण्याची व आत्मसात कराण्याची क्षमता जाणून घेण्यासाठी व मूल्यांकनासाठी चाचण्या घेण्याचे कामही शिक्षकांकडे सोपविण्यात आले आहे.
अभ्यासक्रमाचे तीन स्तरांमध्ये विभाजन केलेले आहे:
१. वैज्ञानिक जाणिवा परिचय-
चवथी ते सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी. यामध्ये विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेची मूळं आणि वैज्ञानिक प्रवृत्तीची वैशिष्ट्ये यांची ओळख करून दिली जाते.
२. वैज्ञानिक जाणीवेचा शोध-
आठवी, नववी आणि दहावी या वर्गातील मुलांसाठी. या काळात अभ्यासक्रमातील विविध विषयांचा सखोल अभ्यास करून घेण्यात येईल.
३. सत्यशोध प्रबोध:
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी . यामध्ये विवेकवाद, इहवाद हे तात्विक विषय व मानसिक आजार हा विषय यांचा समावेश आहे.
प्रत्येकी ३० मिनिटांच्या दहा कालावधींमध्ये कार्यक्रम पुरा होईल अशा दृष्टीने अभ्यासक्रम आखलेला आहे. या ३० मिनिटांच्या कालावधीत सुमारे २०मिनिटे दिलेल्या विषयांचं स्पष्टीकरण देण्यासाठी-अध्यापनासाठी आणि १० मिनिटे प्रश्नोत्तरांसाठी आणि चर्चेसाठी दिली जातील. अभ्यासक्रमांत समाविष्ट असलेले विषय असे:
१. वैज्ञानिक प्रवृत्ती
२. श्रद्धा आणि अंधश्रद्धा
३. मानसिक आजार आणि त्यावर उपलब्ध असलेले उपचार
४. खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र
५. सर्पविज्ञानाचा अभ्यास आणि सर्पदंशावरील उपाय
६. चमत्कार, भानामती आणि संमोहन यांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण
७. दैवी शक्तीचा दावा करणारे, बाबा, बुवा आणि माताजी यासारख्यांचा पडदाफाश
८. भानामती
९. समाजसुधारकांचं कार्य
१०. विवेकवाद
११. व्यसनमुक्ती
वरील प्रत्येक विषयामध्ये अनेक पोटविषय आणि मुद्दे आहेत. उदा: ‘वैज्ञानिक प्रवृत्ती या विषयामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज, विज्ञान साक्षरता आणि वैज्ञानिक प्रवृत्ती यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये; पुरावे तपासण्याची पद्धती; स्वातंत्र्य, निर्भयता, आणि नम्रता जोपासणारी वैज्ञानिक विचारप्रक्रिया; महान व्यक्तींचे विभूतीकरण करण्यातील धोके; रूढ झालेले आचार, परंपरा आणि कर्मकांडे यांचे उगम आणि अर्थ; नैतिक मूल्ये आणि वैज्ञानिक प्रवृत्ती इत्यादी.
