विश्वव्यापी अंधश्रद्धा

आपला देश अंधश्रद्धांमध्ये आकंठ बुडालेला आहे. लहानपणापासून आपल्या मनावर हे केले पाहिजे आणि ते करता कामा नये अशी अनंत विवेकशून्य बंधनं घातली जातात. आणि आपल्याला ही बंधने आहेत याची जाणीवही नसते. सकाळी उठल्याबरोबर आज कोणता दिवस आहे हा विचार आपल्या मनात येतो. शनिवार असेल तर आज कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करायची नाही कारण शनीवारी सुरू केलेले काम हमखास अयशस्वी ठरते; रविवार असेल तर स्त्रियांनी आज डोके धुवू नये कारण रवीवारी न्हायल्यास भाऊ मरतो; मंगळ हा ग्रह दाहक आहे त्यामुळे नवा कपडा प्रथम मंगळवारी घातल्यास तो पेट घेतो; वगैरे वगैरे. काहीही करायचं असलं तरी आपल्याला चांगला मुहूर्त पहावा लागतो आणि तो येण्याची वाट पहावी लागते. सर्व क्षुल्लक बाबींसाठी सुद्धा आपण देवाला शरण जातो आणि त्याची इच्छा शिरसावंद्य मानतो. आणि ही ईश्वर शरणता जणू पुरेशी नाही म्हणून आपण बाबाबुवा, गुरू, माता, देवी यांच्या कडे त्यांनी सर्वशक्तिमान देवात आणि आपल्यात मध्यस्थी करावी म्हणून आशेने पाहातो. हे झाले हिंदूधर्मियांबाबत. इतर धर्मीय ही त्यांनी काय करावे अगर करू नये हे सांगण्यासाठी असेच मध्यस्थ शोधत असतात. पुजारी, पुरोहित, धर्मोपदेशक, मौलवी आणि अशीच अनेक बांडगुळं तर आपल्याला या जीवनसंघार्षामध्ये तरून जाण्यासाठी सल्ले द्यायला टपलेलीच असतात. ही देवाची माणसे, त्यांच्या अलौकिक शक्ती आणि त्यांची मिठास आणि मनावर फुंकर घालणारी वाणी या सर्व गोष्टींनी आपल्या मनाला भुरळ पडते. आपली बुद्धी आणि तारतम्य, आपली चिकित्सक आणि अन्वेशक वृत्ती आपण त्यांच्याकडे आनंदाने गहाण ठेवतो. ही झाली तुमची माझी, सामान्य लोकांची कथा.

सत्ताधारी लोक: पण ज्यांनी आपल्या देशाचं भवितव्य घडविणाऱ्या तरुणांचं चारित्र्य घडवायचं, त्या सत्ताधाऱ्यांचं काय? आपले एक माजी राष्ट्रपती राष्ट्रपतीपदाची निवडणूक होण्याअगोदर सर्व जागृत दैवतांना साकडं घालायला गेले आणि तिथे प्रत्येक देवापुढे राष्ट्रपती झाल्यावर पुन्हा तुमच्या दर्सनास येईन असा नवस केला. ते या दैवतांच्या कृपेने निवडून आले आणि दिल्या शब्दाला जागून पुन्हा एकदा (सरकारी खर्चाने ) ते सपत्निक सर्व देवांच्या भेटीस जावून आले. अलौकिक शक्तीवाल्या बाबाबुवांच्या वाढदिवस समारंभामध्ये आपले अनेक मंत्री न चुकता हजेरी लावतात. काळ्या पैशाचा पांढरा पैसा करण्यास या अलौकिक शक्तीचा बराच उपयोग होतो असे म्हणतात. या महान सत्ताधारींच्या अंधश्रद्धाळुपणाबाबत अनेक सुरस कथा ऐकू येतात. राजकारण करणाऱ्या सत्ताधारींकडून आपण आपल्या समाजाचे आधारस्तंभ असलेल्या विद्वानांकडे वळू.

आपली विश्वविद्यालये: आपल्या काही विश्वविद्यालयांनी (सर्वच विश्वविद्यालयांनी नाही हे आपलं नशीब) फलज्योतिष हा नवा अभ्यास विषय पदव्यूत्तर अभ्यासक्रमामध्ये समाविष्टकेला आहे. पौरोहित्य हाही विषय सुरू करायचे घाटत होते. आपली प्राचीन वेदिक संस्कृती, परंपरा आणि प्राचीन कर्मकांडे यांचं ज्ञान सर्व जगाला व्हावं हा या चालीमागचा उदात्त हेतु होता. वैदिक गणित आणि वास्तुशास्त्र ही दोन शास्त्रे आपली वर्णी यामध्ये कधी लागते याची वाट पहात आहेत. इतर अशीच रेकी, अनुभवातीत ध्यानसाधना (ट्रान्सिंडेण्टल मेडिटेशन), जीवनकला (आर्ट ऑफ लिव्हिंग), अनंत योगिक उपचार पद्धती इत्यादी दुर्बोध शास्त्रे आजकाल चर्चेत आलेली आहेत आनि त्यांचे महत्त्व वाढत आहे. या प्रत्येक छंदाचा स्वतंत्रपणे ऊहापोह करणे इथे शक्य नाही. परंतु जिथे तिथे आड येणाऱ्या वास्तु शास्त्राचा इथे थोडक्यात विचार करू.

वास्तुशास्त्र: हे घरबांधणीचे शास्त्र आहे. वास्तुशास्त्री असा दावा करतात की त्यांनी सुचविलेल्या इमारतीमध्ये छोटेमोठे बदल करण्याच्या उपायांनी त्यांच्या अशीलाला आरोग्य, धन आणि सौख्य हमखास मिळते. अनेक प्रसिद्ध वैज्ञानिक आणि तंत्रवैज्ञानिक, उद्योगपती आणि व्यापारी, मनोवैज्ञानिक आणि शल्यविषारद, अभियंते आणि खुद्द वास्तुविशारद (आर्किटेक्ट) या भ्रामक शास्त्राला भुलतात. ते त्यांच्या कार्यालयामधे, औद्योगिक इमारतीमध्ये आणि कारखान्यांमध्ये तसेच हॉटेल्स व राहत्या घरांमध्ये अनेक वेळा असे अव्यवहार्य बदल करतात की त्यामुळे अडचणी तर होतातच पण कधी कधी इमारतीला धोका उत्पन्न होतो. असे बदल केल्याने ते पुढे कायमचे सुखी राहू शकतील अशी त्यांना आशा असते. खरं तर बदल केल्यानंतर जे यशस्वी होतात ते त्यांचं कौशल्य, नैपुण्य, विषेश ज्ञान, आणि कष्ट यांच्या बळावर; पण ते गोडवे गातात प्राचीन वास्तुशास्त्राचे. जे अपयशी ठरतात ते गप्प राहातात; वास्तुशास्त्राला दोष देत नाहीत. त्यांच्यामते त्यांनी वास्तुशास्त्राचे पालन अर्धवट केले तंतोतंत केले नाही म्हणून ते अपयशी ठरले. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार बदल करण्याने अनेक चांगल्या इमारतींना धोका पोचलेला आहे असे म्हणतात. आणि बदल करण्यासाठी होणारा अनाठायी खर्च आणि बदलांमुळे होणाऱ्या गैरसोयी यांचा तर हिशोबच नसतो.

आमचे साहित्यिक: आपल्याकडच्या सधन आणि सशक्त (रिच अँड पॉवरफुल) मंडळींच्या गोटामध्ये साहित्यातील दिग्गज येत नाहीत. परंतु परंपराजतनाच्या नावाने अंधश्रद्धा आणि विवेकशून्य आचरण यांच्याबाबतीत ते सधन-सशक्त गटाच्या मुळीच मागे राहात नाहीत. एका साहित्यसंमेलनाच्या यशस्वी आणि निर्विघ्न सांगतेसाठी रेडा बळी देण्यात आला आणि संमेलनाच्या अध्यक्ष महाराजांनी या कृत्याचं हिरीरीने समर्थन कसं केल हे जरा आठवा. आणि मग ग्रामीण भागातील अशिक्षित भाविकांनी मांढरदेवीच्या जत्रेमध्ये लाखोच्या संख्येने बकरे कापले तर तुम्हाला खेद वाटणार नाही. अलिकडे मात्र या जत्रेमध्ये घडून आलेल्या भीषण मनुष्य हानीनंतर शासनाने यावर बंधी आणली आहे हे आपले भाग्य म्हणायला हवे.

चमत्कार: आपण बराच गाजावाजा करीत २१ व्या शतकाचं स्वागत केलं. आपण अवकाशामध्ये उपग्रह स्थापन केले आणि आपल्या दळणवळणाच्या सुविधा अनेक पटींनी वाढल्या, कित्येक टीव्ही वाहिन्या आणि त्यांच्यावरील कर्मणुकीचे, प्रबोधनाचे आणि बातम्या व हवामानाच्या संदेश प्रसारणाचे उपक्रम उपलब्ध झाले. मोबाइल टेलिफोन ज्याच्या त्याच्या हातात दिसू लागले. एक नवीन संपर्कपद्धती हाती आली. आपण संपूर्णपणे भारतीय बनावटीची क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्रेही बनविली आणि स्वसंरक्षणासाठी पूर्णपणे स्वावलंबी झालो. मोठमोठे पूल, महामार्ग आणि छोटी शहरं आणि खेड्यांपर्यंत पोचण्यासाठी रस्ते बांधले. आपल्याकडे अनेक कुशल डॉक्टर्स, इंजिनिअर्स, टेक्नोक्रॅट्स, मॅनेजमेन्ट एक्सपर्ट्स, इकॉनॉमिस्ट्स, इत्यादी आहेत. ईटी क्षेत्रामध्ये तर अमेरिकेसारख्या देशांनी आपल्या प्रगतीची धास्ती घेतली आहे. या यादीला अंतच नाही. नवीन शतकामध्ये पदार्पण करताना आपल्या अशा अनेक उपलब्धींसाठी आपण स्वतःची पाठ थोपटली. पण दुसरी बाजू तितकीच खेदजनक आहे. सर्व प्रकारच्या चमत्कारांवर आपण विश्वास ठेवतो. बाबा हवेत हात फिरवून हिऱ्याच्या अंगठ्या, स्विस घड्याळं अशा किंमती वस्तू उत्पन्न करतात आणि त्या आपल्या ‘रिच अँड पॉवरफुल भक्तांनाच देतात याबाबत आपल्याला काही शंका येत नाही. ख्रिश्चन फादर आपल्या दैवी सामर्थ्याने लुळ्या लंगड्यांना चालण्याची ताकद देतात, आंधळ्याला दृष्टी देतात, बहिऱ्यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याची कुवत देतात; अलौकिक शक्ती असलेले लोक कोणत्याही साधनाशिवाय, भूल नदेता केवळ आपल्या कुशल बोटांनी कर्करोगाच्या गाठी शरीरातून बाहेर काढून रोग्याला ठणठणीत बरा करतात. वर यादीमध्ये दिलेल्या आपल्या सर्व उपलब्धींची जाणीव असतांना आपण या चमत्कारबाज बाबाबुवांवर विश्वास ठेवतो आणि भोळ्या माणसांना लुबाडण्याची त्यांची कारस्थाने चालू देण्यात त्यांना प्रोत्साहन देतो हाच सर्वात मोठा चक्रावून टाकणारा चमत्कार आहे. ह्यामुळेच भारत अजूनही मागास राहिला आहे. पुढे, भविष्याकडे पाहण्याऐवजी आपण कोणत्याही कार्याच्या समर्थनासाठी आणि मंजुरीसाठी आपल्या तथाकथित ‘उज्वल’ भूतकाळाकडे पाहातो.

जादूटोणा आणि अघोरी उपायांच्या निर्मूलनाचे विधेयक: आता आपण अलिकडेच विधानसभेने संमत केलेल्या ‘जादूटोणा आणि अघोरी उपचार आणि रूढींच्या निर्मूलनाचा कायदा २००५’ ह्या विधेयकाकडे वळू. या विधेयकाचा हेतू आहे जादुटोण्याची कृती, प्रसार आणि प्रचार यांच्यावर बंदी घालणे. जादुटोण्याच्या ‘कृती’च्या सर्वसमावेषक व्याख्येमध्ये अघोरी उपाय, रूढी इत्यादी तर येतातच शिवाय अनधिकृत आणि बेकायदेशीर औषधांचा वापर तसेच ढोंगी वैद्य, वैदू किंवा अलौकिक शक्तीचा दावा करणाऱ्या स्वयंघोषित दैवी व्यक्ती यांचे उपचार या सर्वांचा समावेष आहे. या कायद्याखाली या सर्व कृती कायद्याने ‘जामीन देण्यास अपात्र गुन्हा समजल्या जातात आणि त्या बंद व्हाव्यात म्हणून त्याविरुद्ध कडक शिक्षा आणि दंड यांची योजना केली आहे.
या विधेयकामध्ये गुन्हे उघडकीस आणण्यासाठी, पुरावा गोळा करण्यासाठी आणि गुन्ह्यांचा प्रतिबंध करण्यासाठी दक्षता अधिकारी नेमण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे परिणामकारक कायदेशीर कारवाई करता येईल. विधेयकामध्ये सामाजिक कार्याला वाहिलेल्या संस्थांना मान्यता दिलेली आहे. या दुष्ट पद्धतींचं निर्मूलन करण्यामध्ये आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये त्यांनी योगदान द्यावं अशी अपेक्षा आहे. न्यायालयांना या कायद्याखाली गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला दोषी ठरवून शिक्षा करण्याचा अधिकार दिलेला आहे.

अनेक लोक असं मानतात की कायदे करण्याने अंधश्रद्धा आणि भोळ्या गरीब जनतेचं शोषण नाहीसं करणं शक्य नाही. खरी गरज आहे लोकांना सजग आणि सुशिक्षित करण्याची, आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याची. हे सगळं करण्याची गरज आहेच, ती कोणीच नाकारीत नाही. आणि हे काम अनेक संस्थांमार्फत चालूही आहे. पण हे तर कुणालाही कबूल करावंच लागेल की ही प्रक्रिया अत्यंत धिम्या गतीने होत असते आणि लोक शहाणे होईपर्यंतच्या मध्यंतरीच्या प्रदीर्घ काळामध्ये स्वार्थी आणि नीतीची चाड नसलेले वैदू आणि बाबाबुवा आपला धंदा आनंदात चालू ठेवतील. त्यांच्या कारवायांना लवकरात लवकर आळा घालण्यासाठी आणि त्यांना कायद्याचा बडगा दाखवून त्यापासून परावृत्त करण्यासाठी कायद्याची नितान्त गरज आहे. अंधश्रद्धांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या संघटनांना आणि चळवळींना त्यामुळे बरेच बळ मिळेल.
डॉ नरेन्द्र दाभोलकर