पुनर्जन्म

पुनर्जन्म म्हणजे मरणानंतर माणसाच्या शरीराचं विघटन होतं. परंतु त्याचा कोणतातरी अंश पुन्हा नव्या शरीराच्या रूपात जन्माला येतो. आपण ह्या पूर्वीही जन्मलो होतो आणि यानंतरही पुन्हा जन्म घेणार आहोत ही कल्पना म्हणजे पुनर्जन्म. आधीच्या किंवा या पुढच्या जन्मामध्ये आपल्याला मनुश्यरूपच मिळेल असे नव्हे. एखादा आजचा माणूस पूर्वीच्या जन्मामध्ये कुत्रा किंवा पुढच्या जन्मी अगदी छोटा किडा सुद्धा असणे शक्य आहे. काही काही जमातींमध्ये विशिष्ट प्राण्याचे मास खात नाहीत कारण त्यांचा असा समज असतो की त्यांचे पूर्वज ते प्राणी आहेत. एखादा पुरूष त्याची मुलगी जन्माला येण्याअगोदर मरण पावला आणि त्याचा आत्मा त्याचीच मुलगी जन्मल्याबरोबर तिच्यामध्ये प्रवेश करून स्वतःच्या मुलीच्याच रूपात पुन्हा जन्माला येवू शकतो.

पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या श्रद्धा बौद्ध आणि हिंदू लोकांच्यामध्ये असतात. या धर्मांमध्ये पुनर्जन्म होणं ही गोष्ट पुण्यप्रद समजली जात नाही. मोक्षप्राप्ती किंवा निर्वाण म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यांमधून सुटका होणं हे पुण्यप्रद मानलं जातं. पुनर्जन्म मानणाऱ्या प्राचीन धर्मांमध्ये आत्म्याने दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करणं (पुन्हा जन्म घेणं) ही आध्यात्मिक अधोगती समजली जाते. आत्म्यावरील मलीन अपवित्र संस्कार समजले जातात. पुढचा जन्म तुम्हाला कशाचा वा कोणाचा हवा आहे त्यानुसार तुमची या जन्मातील वागणूक चांगली असायला हवी.

संबंधित समस्या: पुनर्जन्माच्या अभिजात कल्पनेनुसार मृत माणसाच्या आत्मभानातील-जाणीवेतील काही अंश दुसऱ्या नव्या शरीरामध्ये प्रवेश करतो. परंतु हे नवे शरीर जसे वाढते तसे एक एकात्म भान सर्वकाल टिकून राहते. पुनर्जन्म संकल्पनेतून काही तात्त्विक मुद्धे उपस्थित होतात. पुनर्जन्मामध्ये पुन्हा जन्माला काय येते? पुन्हा जन्माला येतो तो आत्मा असतो असं मानलं तर आत्मा म्हणजे काय हा प्रश्न उभा राहतो. आत्मा म्हणजे अशरीरी आत्मभान म्हणायचे का?
संमोहनाच्या प्रभावाखाली काही लोकांना त्यांच्या पूर्वजन्मातील प्रसंग आठवतात या गोष्टीचं स्पष्टीकरण पुनर्जन्म ही संकल्पना देवू शकते. असामान्य बुद्धीमत्ता असलेली लहान मुलं या वास्तवाचं स्पष्टीकरण ‘इतर आत्म्यांना पुनर्जन्मामध्ये पुन्हा कोऱ्या पाटीवर सरुवात करावी लागते तशी या असामन्य बुद्धिवन्तांची गोष्ट नसते; त्यांना पूर्वजन्माचं बरंचसं ज्ञान जन्मतःच प्राप्त असतं’ अशा युक्तिवादाने केलं जातं. चांगल्या माणसांच्या आयुष्यात दुःख आणि दुष्टांच्या आयुष्यात सुख असं का असतं याचंही स्पष्टीकरण पुनर्जन्म आणि कर्म या संकल्पना देवू शकतात. अशी ही पुनर्जन्माची कल्पना लोकांची समजूत काढायला उपयोगी पडते.

पुनर्जन्म न मानताही अशा असामान्य बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण मेंदूची रचना आणि त्यामध्ये होणाऱ्या नैसर्गिक प्रक्रिया जास्त संयुक्तिकपणे देवू शकतात. आणि अखेरीस माणसाचा किंवा जन्मलेल्या बालकाचा आत्मा त्याला स्वर्गात नेणार की नरकामध्ये तसंच प्रस्तुत जन्माअगोदर अनेक शरीरांमध्ये फिरलेला आत्मा असलेलं आजचं बालक किंवा असा आत्मा नसलेलं बालक यामध्ये काहीच फरक करता येत नाही आणि आत्मा या संकल्पनेने मानवाच्या जीवनाबाबतही काही विशेष स्पष्ट असं आकलन मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये आत्मा, त्याचं अमरत्व, त्याचं पुन्हा पुन्हा जन्म घेणं आणि त्याचं स्वर्गात, नरकात जाणं किंवा लोंबकळत राहणं या साऱ्या अर्थहीन संकल्पनांची काहीच गरज नाही.

पूर्वजन्मात प्रवेश करण्याची उपचार पद्धती: या पद्धतीमध्ये आजच्या मानसिक समस्यांची कारणं पूर्व जन्मातील अनुभवांमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला जातो. संमोहनाखाली मानसिक रुग्ण पूर्व जन्मातील अनुभव आठवू लागतो. या आठवणी चुकीच्या (काल्पनिक) किंवा या जन्मातीलच असू शकतात. तशाच संमोहन उपचार करणाऱ्या व्यक्तीने कळत न कळत सुचविलेल्याही असू शकतात. कोणाही उपचार करणाऱ्या व्यक्तीला अशा तऱ्हने रुग्णांच्या मनामध्ये भ्रम उत्पन्न करण्यामध्ये किती धोका आहे हे अगदी सामान्य माणसाला सुद्धा उमगायला हवं. काही तथाकथित आठवणी तर त्या व्यक्तीच्या कुटुंबियांशी असलेले प्रेमळ नाते संपुष्टात आणून त्याला उध्वस्त करून टाकतील. संमोहन उपचार करतांना किती काळजी घ्यायला हवी हे उघड आहे.

पूर्वायुष्याचे अनुभव जागविण्यामध्ये दोन फायद्याच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे हा तज्ञ त्याने खर्च केलेल्या वेळेनुसार फी घेत असतो; जेवढा जास्त वेळ लागेल तेवढी जास्त फी मिळणार. दुसरी गोष्ट ही की रुग्ण हव्या त्या भन्नाट कल्पना करू शकतो; खरं खोटं करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सगळं गुप्त! माणसाला आपण पूर्वी हे पाहिलेलं आहे किंवा अनुभवलेलं अही असं वाटतं याचंही स्पष्टीकरण याच जन्मातील अनुभवामध्ये सापडतं; त्यासाठी पूर्वजन्माच्या आठवणींची गरज नसते.

कर्मविपाक सिद्धांत: पूर्वजन्म संकल्पना आणि कर्मविपाक सिद्धांत या दोन्हीचा जोरदार पुरस्कार भगवद्गीतेमध्ये केलेला आहे. हिंदु धर्मामध्ये ‘कर्म’ म्हणजे एक अनुल्लंघनीय कायदा आहे. अनेक विद्वान असा विधिलिखित कायदा अमान्य करतात. या सिद्धांतानुसार आपण करीत असलेलं प्रत्येक काम, ते कितीही क्षुल्लक असलं तरी त्याचं फळ ते कर्म करणाऱ्याला मिळणारच. चांगल्या कामाचं चांगलं फळ तसंच वाईट कामाचं वाईट. हिंदु पुनर्जन्म मानीत असल्याने या कर्मफळाला एका जन्म-मरणाची सीमा राहात नाही. तुम्हाला भोगावं लागणारं बरं-वाईट फळ या जन्मातील कर्माचं असेल वा आधीच्या जन्मांमधल्या कर्माचं. कर्म म्हणजे ‘नैतिक कार्यकारण संबंधाबाबतचा कायदा’. त्यामुळे माणसाला चांगलं काम करण्याची आणि वाईट काम टाळण्याची बुद्धी मिळते, तसेच त्याच्या आयुष्यात त्याला भोगाव्या लागणाऱ्या सुखदुःखाचा कार्यकारण संबंध लावता येतो.

या सिद्धांतानुसार जे काही बरं वाईट घडतं; जो काही अन्याय होतो, ज्या काही आपत्ती कोसळतात ते सारं कर्मविपाकातून घडतं. त्या त्या व्यक्तीच्या पूर्वकर्मानुसार योग्य ते फळ त्याला मिळत असतं. एखाद्या व्यसनी माणसाने एखाद्या बालकाचा अमानुष छळ केला तर ते त्या बालकाच्या कर्माचं फळ असतं आणि असा छळ होणं अपरिहार्य असतं. नाझींनी लाखो ज्यूंचा संहार केला ते ज्यूंच्या पूर्वजन्मीच्या दुष्कृत्याचं फळ त्यांना मिळणं अपरिहार्य होतं म्हणून. एखादा गुलाम मालकाच्या मारहाणीने मेला तर ते त्याचे कर्मफळ या जन्मीचं नाहीतर आधीच्या जन्मांमधलं.

एटीएम मध्ये शिरून एखाद्या माणसाने तेथून पैसे काढणाऱ्या माणसाचा खून केला तर त्याचा कार्यकारण संबंध दोन तऱ्हेचा असू शकतो. एकतर ज्याने खून केला तो सर्वस्वी स्वतःच्या इच्छेने केला असेल किंवा हा एक ‘कार्मिक’ प्रसंग असू शकेल ज्यामध्ये ज्याचा खून झाला त्याला त्याच्या (या जन्मातील अगर पूर्वजन्मातील) अशाच दुष्कृत्याचं फळ मिळणं आवश्यक होतं. हिंदू केव्हा केव्हा असा युक्तिवाद करतात: माणूस जेव्हा एखादे दुष्कृत्य करतो तेव्हा तो ते स्वेच्छेने करतो आणि जेव्हा त्याला दुःख भोगावं लागतं तेव्हा ते त्याने स्वेच्छेने पूर्वजन्मामध्ये केलेल्या दुष्कृत्याचं फळ असतं. कर्मसिद्धांत मानला तर कोणीही माणूस चांगला किंवा वाईट नसतो; जो तो आपापले कर्मफळ भोगत असतो. तो जे काही करतो त्याला तो जबाबदार नसून आपण सर्वच विधिलिखिताच्या हातातली प्यादी आहोत! हा सिद्धान्त खरा मानायचा म्हणजे आपली गुन्हेगारीसंबंधीची दंडव्यवस्था आणि समाजाची नैतिक व्यवस्था मोडीत काढायला हवी.
कर्मफळाचं हे इतकं अनैतिक तत्त्व हे ह्या माणसाबाबत बेपर्वा असलेल्या विश्वाचा न्याय म्हणून का मिरवलं जातं? कारण या सिद्धांतानुसार आपण सारे या पृथ्वीतलावर धडे गिरवण्यासाठी आलेलो आहोत. ही आपली शाळा आहे. आपली उन्नती व्हावी म्हणून आपल्याला काही धडे शिकणं अत्यावश्यक आहे. हे आपल्या पापक्षालनाचे ठिकाण आहे. इथे आपल्याला आपल्या कर्मांचा अंत करायचा आहे आणि आपल्या आत्म्याची उन्नती करायची आहे असं सांगितलं जातं.

कर्म हा दासांचा कायदा आहे: सर्वगुणसंपन्न सर्वशक्तिमान ईश्वराने निर्माण केलेल्या या जगामध्ये इतकं दुःख का असावं, इतकं दुष्कर्म का घडावं याची कारणं देण्यासाठी या पोकळ युक्तिवादाचा उपयोग केला जातो. कर्म म्हणजे एका अधिभौतिक कायद्याचा अमल असं मानल्याने जीवन नगण्य, ठरतं; नीतिमत्ता आणि जबाबदारी यांना अर्थच उरत नाही. माणसं जणू अमानवी पशूच समजली जातात. एका निरर्थक व्यवस्थेमधाल्या निरंतर घडणाऱ्या घटना, कारणं आणि परिणाम! तुमच्या कर्मांमुळेच तुमच्यावर आपत्ती कोसळतात; तुम्ही स्वतःला निरपराधी मानू शकत नाही.

‘कर्म’ हा कायदा सर्वकाही मुकाट्याने सोसणाऱ्या, कुरकुर न करणाऱ्या (करता न येणाऱ्या) मेंढ्यांचा कायदा आहे. मग मेंढपाळांनी (शेफर्ड) त्याचा प्रचार करावा यात आश्चर्य कसलं? हा कायदा आहे निष्क्रीय, आहे त्या स्थितीमध्ये व्यत्यय न आणणाऱ्या आणि इतरांच्यामुळे वाट्याला आलेले सर्व भोग स्वाभाविक आणि अटळ समजून मुकाट्याने सोसणाऱ्या माणसांसाठी; म्हणजेच गुलामांसाठी; पराजितांसाठी. जो कोणी जीव पृथ्वीवर पहिल्यांदा जन्माला आला त्याचं पूर्वकर्म काय असणार? त्याला भोगावे लागणारे सुखदुःख कोणत्या कायद्यानुसार? असा विचार एखाद्या हिंदूच्या मनामध्ये कधी येतो का?

पुनरावतार: नास्तिक मत: बौद्ध आणि हिंदू धर्मांसारख्या पौर्वात्य धर्मांमध्ये पुनर्जन्माच्या संकल्पनेवर श्रद्धा असते. परंतु अलिकडे डायानेटिक्स आणि चॅनलिंग सारख्या पुनर्जन्मकेन्द्रित गूढवादाचा बराच गवगवा पाश्चात्य जगतातही दिसतो. न्यू एज नावाच्या नवीन धर्मामध्ये तर पुनर्जन्म होणं हे एक विकृत ध्येयच बनलं आहे. पूर्वजन्मांवर विश्वास असण्याने नवयुगातील गतकालात जात जात पूर्वजन्मातील आठवणीं जागृत करण्याची उपचारपद्धती वापरता येते. या जन्मातील मानसिक असंतुलनाची कारणे या उपचारपद्धतीने मागील जन्मातील अनुभवामध्ये शोधली जातात.

डायनेटिक्स आणि सायंटॉलॉजीचा निर्माता, रॉन हब्बर्ड याने स्वतःच्या नव्या धर्मात त्याने पुनर्जन्म ही संकल्पना एका नव्याच स्वरूपात मांडली आहे. एखाद्याच्या समस्यांचं कारण शोधायला त्याच्या पूर्व जन्मांचा हिशोब मांडावा लागतो. काही सायंटॉलॉजिस्ट त्यांच्या पूर्वजन्मांमध्ये कुत्रे किंवा तसेच इतर प्राणी होते. (संदर्भ: ‘अ नोट ऑन पास्ट लाइव्हज’ इन ‘द रीडिस्कव्हरी ऑफ द ह्यूमन सोल’) हब्बर्डच्या मते मरणाची यंत्रणा काय आहे हे केवळ सायंटॉलॉजीमुळे कळू शकतं. मरणाच्या प्रक्रियेत जे होतं ते असं: थेटन (म्हणजे स्पिरिट किंवा आत्मा) शरीरातून मोकळा झालेला असतो आणि तो दुसऱ्या एका नव्या शरीराच्या शोधामध्ये फिरू लागतो. असे आत्मे लोकांच्या आवतीभोवती फिरत असतात. एखादी गर्भवती स्त्री सापडली की ते तिच्या मागे मागे राहतात. प्रसूती होताच दोन तीन मिनिटांमध्ये ते नवजात बालकामध्ये शिरतात. नवजात बालक साधारणतः जेव्हा पहिला श्वास घेते त्यावेळेस असा आत्म्याचा प्रवेश होतो. हब्बर्डला हे सारं कसं उमगलं हे त्याने कधीच उघड केले नाही.

चॅनेलिंगही ह्याच तत्त्वावर आधरित आहे पण ते मागे मागे जात पूर्वजन्माच्या आठवणींमध्ये शिरण्यापेक्षा वेगळे आहे. मरणाने अस्तित्त्वाचं संपूर्ण विसर्जन होणं हे चॅनलिंग या संकल्पनेत अमान्य आहे. अभिजात पुनर्जन्म सिद्धान्तामध्ये मृत व्यक्तीच्या जाणीवेतला काही भाग नवीन शरीरामध्ये शिरतो परंतु ती नवी व्यक्ती जशी जशी मोठी होत जाईल तशी एक एकात्म जाणीवच निर्माण होते. यामध्ये पूर्व जन्मातील जाणीवेचं तात्पुरतं आक्रमण म्हणाजे चॅनलिंग म्हणता येईल. ही जाणीव या जन्मातील स्वसंवेद्यतेच्या जाणीवेपासून अगदी अलग असते. उदा: जे.झेड नाइट यांनी असा दावा केला आहे की १९७७ मध्ये (हजारो वर्षांपूर्वी) अॅटलॅन्टिसमध्ये राहत असलेल्या एका क्रोमॅग्नन (एक मानववंश) माणसाच्या आत्म्याने त्यांच्या शरीराचा ताबा घेतला. अनेक शतकांमध्ये गोळा केलेलं शहाणपण त्या आत्म्याला त्यांच्यापर्यंत पोचवायचं होतं. नाइट यांच्यासारखे दावे करणारे अनेक जण आहेत. चॅनलिंग म्हणजे सगळा सावळा गोंधळ वाटतो. वेगवेगळे गतकाळातले आत्मे जर कोणाच्याही शरीरामध्ये केव्हाही, त्या व्यक्तीचं आत्ताचं अस्तित्व अबाधित ठेवून शिरू शकत असतील, तर जेव्हा एखादा माणूस आपल्या पूर्वजन्माच्या आठवणी सांगतो तेव्हा त्या आठवणी त्याच्या पूर्वजन्माच्याच असतील असं नाही. त्या भलत्याच कोणाच्या तरी आत्म्याने त्याच्यामाधे केलेल्या संचारामुळे त्या माणसाच्या किंवा प्राण्याच्या असू शकतील.

एखाद्या आपण पूर्वी कधीच न पाहिलेल्या जागी गेलेलो असताना असं वाटतं की आपण पूर्वी ते पाहिलं आहे. अशा अनुभवांना पूर्वजन्मीची आठवण समजलं जातं. स्वप्नांना सुद्धा आत्म्याचा प्रवास वा आठवण समजतात. पण या सर्वांचं स्पष्टीकरण याच जन्मातील अनुभवातूनच जास्त चांगलं होवू शकतं. पूर्व जन्मातील आठवणींचा आधार घेण्याची गरज नाही. स्वप्न आणि असामान्य प्रज्ञा असलेली मुलं या दोन्हींचं स्पष्टीकरण मेंदूची रचना आणि जनुकांमुळे प्राप्त होणारे अनुवंशिक गुण आणि क्रिया यांच्या सहाय्याने सहज करता येते. तसेच वाईट लोकांच्या वाट्याला वाईट तशाच चांगल्या गोष्टी येतात आणि चांगल्या लोकांच्या बाबतीतही तसेच घडते त्याअर्थी या चांगल्या अथवा वाईट गोष्टींच वाटप काही पूर्वनियोजित पद्धतीने होत नसते हेच सारासार बुद्धीला पटण्याजोगे आहे.

बाळपणी ऐकलेल्या गोष्टीमध्ये कैक वेळा पूर्वजन्मी मिळालेल्या ज्ञानाचा दावा केलेला असतो. अयान स्टिव्हन्सन या मानसोपचार तज्ञाने अशा अनेक गोष्टींचा संग्रह केला. या गोष्टी म्हणजे त्यांच्या मते पुनर्जन्म या संकल्पनेस दुजोरा देणारा एक थोडासा वैज्ञानिक पुरावा आहे.

धार्मिक मूलतत्त्ववादी उत्क्रांतीवाद नाकारतात आणि डार्विनच्या सिद्धांताचा पुरस्कार करणाऱ्यांची थट्टा करतात. पण उत्क्रातींवादाच्या परिणामाचा साकल्याने विचार केल्यास असं दिसून येतं की डार्विनप्रणित उत्क्रांतीवाद हे एक सत्य आहे. पण भौतिक स्तरावरील ही उत्क्रांती म्हणजे आंतरिक सत्याचं केवळ प्रतिबिंब आहे. असंही काही जण मानतात.