अब्राहम कोवूर

डॉ. अब्राहम कोवूर हे अंधश्रद्धा, गूढवाद, सत्य साईबाबासारखे अरिष्ट आणि भारतातील इतर छोट्यामोठ्या बाबाबुवा -माताजींच्या कारवाया यांच्याविरुद्ध सातत्याने लढणारे समाजसुधारक नेते होते. या लोकांना आव्हान देत १९६३ साली जो कोणी लबाडीपासून अलिप्त वैज्ञानिक कसोटीखाली परासामान्य किंवा चमत्काराचे कृत्य करून दाखवील त्याला त्यांनी एक लाख श्रीलंकन रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले. त्यांची दोन पुस्तके-‘बिगॉन गॉडमेन आणि ‘गॉड्स, डेमन्स अँड स्पिरिट्स लोकप्रिय झालेली आहेत.

त्यांचं असं ठाम मत होतं की ‘जे लोक स्वतःमध्ये आत्मिक, अतींद्रीय किंवा पारलौकिक शक्ती असल्याचा दावा करतात ते लबाडी करीत असतात किंवा क्रिप्टेस्थेशिया नावाच्या मानसिक रोगाने पछाडलेले असतात. जगात कोणाही व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती नसते आणि कधीही नव्हती. अशा शक्ती केवळ पुराणांमध्ये आणि सनसनाटी बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रांमधेच असतात.

डॉ. कोवूरांचं ध्येय होतं लोकांना प्रबुद्ध करायचं आणि त्यांना विवेक आणि विज्ञान यांच्या कसोटीवर व्यवहार करण्यास शिकवायचं. केरळ प्रांतातील तिरुवल्ला इथे त्यांचा १० एप्रिल १८९८ रोजी एका ख्रिश्चन कुटुंबामध्ये जन्म झाला. त्यांचे वडील रेव्हरंड कोवूर हे मलबार इथल्या मार थॉमा सिरियन चर्चचे व्हिकार जनरल होते. अब्राहम कोवूर यांचे प्रथमिक शिक्षण केरळाच्या सिरियन ख्रिश्चन सेमिनरीमध्ये झाले. पुढील शिक्षण कलकत्त्याच्या बंगबासी कॉलेजमध्ये झाले. तिथे त्यांनी वनस्पती शास्त्र आणि प्राणिशास्त्राचा या विषयांचा अभ्यास केला. अमेरिकेतल्या अर्न्स्ट हॅकेल इकॉलॉजी सेंटर या संस्थेने आयोजित केलेल्या भारतीय महासागराच्या मोहिमेमध्ये भाग घेणाऱ्या वैज्ञानिकांमध्ये ते एकटेच भारतीय वैज्ञानिक होते. केरळ सोडल्यानंतर ते स्रीलंकेचे नागरिक झाले.

बुद्धाच्या विवेकवादी शिकवणीचा डॉ कोवूर यांच्यावर बराच परिणाम होता कारण बुद्ध हा एक महान भारतीय धार्मिक आणि सामाजिक सुधारणावादी होता; हिंदु कर्मठपणाविरुद्ध त्याने संघर्ष केला आणि इतर कोणाहीपेक्षा जास्त सहिष्णु आणि बुद्धिप्रामाण्यवादी तत्त्वज्ञान त्याने लोकांसमोर मांडलं. स्वतःचा जन्मसिद्ध ख्रिश्चन धर्म आणि धार्मिक आचरण त्यांनी अव्हेरले आणि बायबल म्हणजे सर्वज्ञानी ईश्वराचा संदेश असे मानायला नकार दिला. त्यांचे विचार परिपक्व होत गेले आणि अखेरीस त्यांनी प्रत्यक्ष प्रमाणवादी विचारसरणी (फ्री थिंकर) आणि बुद्धीप्रामाण्यवादी तत्त्वज्ञान अंगिकारले. वयाच्या ८० व्या वर्षी ते १८-९-१९७८ मध्ये कोलंबो येथे पंचतत्त्वांमध्ये विलीन झाले.

त्यांचे एक सर्वात लोकप्रिय झालेलं वचन असं आहे ‘जो आपला चमत्कार तपासू देण्यास नकार देतो तो माणूस लुच्चा असतो; ज्याच्या अंगी चमत्काराची तपासणी करण्याचं धारिष्ट नसतं तो भोळसट असतो आणि जो काहीही खरेखोटेपणा न तपासता चमत्कारावर विश्वास ठेवतो तो मूर्ख असतो.
स्टिफन जे गूल्ड या उत्क्रान्तीवादी जीवशास्त्रज्ञाने मायकेल शर्मर यांच्या ‘व्हाय पीपल बिलीव्ह विअर्ड थिंग्ज’ (लोक गूढ गोष्टींवर विश्वास का ठेवतात) या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ‘घाण आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या अत्यंत निकृष्ट मानल्या गेलेल्या उघडपणे वाखाणणी करण्यास लायक नसलेल्या परंतु तितकेच अनिवार्य असलेल्या कामाला जी शेलकी चपराक दिली जाते तशीच चपराक संशयवाद किंवा दंभस्फोट यांना देण्यात येते. (थोडक्यात श्रद्धांबाबत संशय घेणे किंवा गौप्यस्फोट करणे म्हणजे गटार साफ करणे समजतात.)

हे विधान अब्राहम कोवूर यांच्या बाबतीत अर्धसत्त्य ठरतं. समाजजीवन सुरक्षित आणि सुजाण राहाण्यासाठी दंभस्फोट करणं अत्यावश्यक आहे हे गूल्ड यांचं म्हणणं बरोबरच आहे परंतु हे काम घृणास्पद मात्र मानलं जात नाही; निदान डॉ कोवूर यांच्या बाबतीत तरी.

सेवानिवृत्तीनंतर संपूर्ण दिवस दंभस्फोट हेच डॉ कोवूर यांनी आपलं आद्य कर्तव्य मानलं. ते भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये खूप लोकप्रिय झाले. त्यावेळच्या स्रीलंकेच्या अध्यक्षा सिरिमाओ बंदारनायके यांच्याशी कोवूर यांचे चांगले संबंध होते. कोवूर यांच्या डायरीतील माहितीवरून त्यांच्या जीवनावर सेथुमाधवन् यांनी ‘पुनर्जन्म’ नावाचा मल्याळं भाषेतील चित्रपट काढला. स्वतःची भूमिका कोवूरांनी स्वतःच वठविली होती. ७०च्या दशकामध्ये हा सिनेमा तुफान गर्दी खेचत होता. त्यामुळे पुढे हाच सिनेमा तमिळ भाषेमध्ये ‘मारु पिरावी‘ या नावाने लोकांसमोर आला. त्यांच्या हयातीमध्ये त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. १.‘बिगॉन गॉडमेन आणि २. ‘देव, दैत्य आणि आत्मे‘. दोन्ही पुस्तके खूप खपली. आणि आता तर ती मिळेनाशीच झाली आहेत. ही पुस्तके तामिळ, कन्नड, हिंदी, पंजाबी या भाषांमधून भाषांतरित करण्यात आली आहेत, सारी भाषान्तरे खूप लोकप्रिय झाली आहेत आणि त्यामुळे डॉ. अब्राहम कोवूर ख्यातनाम (सेलेब्रिटी) बुद्धीप्रामाण्यवादी म्हणून नावाजले! डॉ कोवूर ख्रिश्चन कुटुंबात जन्मले असले तरी तरूणपणी त्यांनी ख्रिश्चन धर्म नाकारला कारण बायबल म्हणजे सर्वज्ञ देवाचेच शब्द आहेत हे त्यांना मान्य नव्हते, म्हणून ते बुद्धिप्रामाण्यवादी किंवा विवेकवादी बनले. ते स्रीलंकेमध्ये गेले आणि तिथले नागरिक झाले कारण स्रीलंकेमधले बहुतेक नागरिक गौतम बुद्धाचे अनुयायी आहेत. इतर कोणत्याही धर्मसंस्थापकापेक्षा गौतमबुद्धाने सांगितलेले तत्त्वज्ञान जास्त बुद्धिप्रामाण्यवादी आणि जास्त सहिष्णु आहे.

प्रोफेसर कोवूर अनेक दशके, आपल्या सेवाकालात सुद्धा अतींद्रिय (पॅरानॉर्मल) अनुभवाच्या दाव्यांची तपासणी करीत होते. परंतु १९५८ साली सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी बाबाबुवा आणि अतींद्रिय अनुभवांच्या दावेदारांना अगदी उघडपणे आव्हान द्यायला सुरुवात केली. हे आश्चर्यकारक आहे; कारण बहुतेक जण जे तरूण वयात कट्टर निरीश्वरवादी, माक्र्सवादी, सामाजिक क्रांतीचे पुरस्कर्ते वगैरे असतात ते उतार वयात तरूणपणी त्यांनी स्वतःच झिडकारलेल्या आस्तिक, धार्मिक मतांकडे वळतात. याउलट तरुण वयात नास्तिक झालेले कोवूर निवृत्तीनंतर कट्टर बुद्धिप्रामाण्यवादी झाले आणि तळमळीने प्रबोधनाचे काम करू लागले.

कोवूरांचे आव्हान: सुरुवातीच्या कृतिशील दिवसांमधेच कोवूरांच्या लक्षात आले की ते ज्या बाबाबुवा, ज्योतिषी, साधू, योगी इत्यादींचा दंभस्फोट करू बघत आहेत त्यांच्यावर त्यांच्या स्वतःच्या लिखाणाचा आणि व्याख्यानातून प्रचार करण्याचा काही परिणाम होत नाही. म्हणून कोवूरांनी या लोकांना आव्हान देण्याचे ठरविले. त्यांनी दिलेलं पहिलं आव्हान १९६३ साली ’सिलोन डेली मिरर’मध्ये १७-६-६३ ला छापून आलं. एका पाकिटामध्ये सीलबंद केलेल्या दहा रुपयांच्या नोटेवरचा नंबर स्वतःची अतींद्रीय शक्ती वापरून ओळखायचा. जो कोणी हे करून दाखवील त्याला कोवूरांनी २५००० रुपयांचं बक्षीस जाहीर केलं.
जाहीर केलेल्या बक्षिसाची रक्कम पुढे एक लाखापर्यंत वाढविली तसेच आव्हान दिलेले सारे चमत्कार सामावण्यासाठी चमत्कारांच्या प्रकारांची संख्याही २३ पर्यंत वाढविण्यात आली. हे आव्हान १९७८ साली त्यांच्या मृत्यूनंतर संपुष्टात आलं. परंतु तो पावेतो प्रोफेसर कोवूरांना एक पैसाही खर्चावा लागला नाही. उलट काही भोळसट अनुयायांनी उत्साहाने आणि आपले गुरू जिंकतील या खात्रीने बयाणाची (अर्नेस्ट मनी) रक्कम भरून आव्हान स्वीकारले. ठरलेल्या वेळी गुरू आलेच नाहीत. आणि अशा काही प्रसंगातून कोवूरांच्या आव्हानासाठी राखून ठेवलेल्या पैशामध्ये भर पडली.

अत्यंत कुशल विज्ञान शिक्षक: या आव्हानामुळे कोवूरांची कीर्ती वाढली. परंतु त्यांच्या दिगंत कीर्तीचे आव्हान हे एकमेव कारण नव्हते. त्यांच्या बिनतोड आणि कठोर वैज्ञानिक विश्लेषणाने ओतप्रोत असलेले त्यांचे लेख आणि त्यांची व्याख्याने हीही त्यांच्या लोकप्रीयतेला आणि दिगंत कीर्तीला तितकीच कारणीभूत आहेत. अलौकिकतेचा व्यापर करणाऱ्यांच्या पसंतीच्या मरणोत्तर जीवन, पुनर्जन्म आणि पुनरावतार या विषयांवरील कोवूर यांचे लेख म्हणजे विज्ञान-शिक्षणकौशल्याचा असा नमुना आहे की ज्याला तोड नाही.

‘मेल्यानंतर आपण जिवंत असतो का या त्यांच्या लेखांमध्ये ते म्हणतात, ‘माझा जीव माझ्या शरीराच्या एका विशिष्ट भागातच असतो असं मी मानत नाही. माझ्या शरीराच्या सर्व जिवंत पेशींमध्ये प्राण (लाइफ) निर्माण होतो आणि त्या पेशींमध्ये होत असलेल्या ऑक्सिडीकरणाच्या रासायनिक प्रक्रियेमुळे जिवंत राहतो. ही रासायनिक प्रक्रिया माझ्या श्वासोश्वासामुळे आणि रक्ताभिसरणामुळे सतत चालू राहाते. तेवत असलेल्या मेणबत्तीमध्ये जसा हायड्रोकार्बन जळतो आणि त्या प्रक्रियेतून उष्णता आणि प्रकाश या उर्जा निर्माण होतात; अगदी तसंच ज्वलन माझ्या शरीरात होत असतं. मेणबत्ती विझवली की तिच्यातून उष्णता आणि प्रकाश बाहेर पडणं थांबतं आणि पुन्हा पेटविली की पुन्हा सुरू होतं. (मृत्यू) ही एक केवळ रासायनिक क्रिया बंद पडून उर्जानिर्मिती थांबण्याची घटना आहे. तसंच श्वसन आणि रक्ताभिसरण थांबल्यामुळे माझं शरीर मेल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासारखं काहीच नसतं. आणि समजा काही आधुनिक तंत्रज्ञानामुळे माझं शरीर पुन्हा जिवंत करता आलं तरी त्यामध्ये ‘निघून गेलेली जीव किंवा आत्मा’ जिवंत झालेल्या शरीरात पुन्हा शिरला असं समजायचं काही कारण नाही.

तसंच एका विशिष्ट क्षणी एकाएकी माझा मृत्यू होणार नाही. सुमारे ७० वर्षापूर्वीच मी मरायला लागलेलो आहे. माझ्या आईच्या पोटात एक परोपजीवी प्राणी म्हणून मी जीवनाची सुरुवात केली. ज्या वेळेला मी हे या परोपजीवी जगण्याचं थांबवलं त्यावेळेला नाळ आणि वार यांच्या रूपात असलेला माझ्या शरीराचा १/८ हिस्सा मेला. आणि त्या दिवसापासून मी मरतो पण आहे आणि वाढतो पण आहे. प्रत्येक दिवशी माझ्या शरीरातील खूपशा पेशी मरत असतात आणि तशाच खूपशा नवीन पेशी जन्म. घेतात. केस कापण्याने, दाढी करण्याने नखं कापण्याने, दात पडण्याने आणि सुकलेले पापुद्रे शरीरापासून सुटण्याने अनंत मेलेल्या पेशी माझं शरीर सोडून जात आहेत. शरीराच्या आतील मेलेल्या पेशी लघवी, घाम इत्यादी क्रियांमधून बाहेर फेकल्या जात आहेत. जोपावेतो नवीन पेशींना जन्माला घालायला काही पेशी शिल्लक आहेत तो पर्यंत हे पेशींचं सातत्याने मरणं चालूच राहणार. शरीरातील सगळ्या पेशी मेल्यानंतरसुद्धा माझ्या डोळ्यातील कॉर्निया कोण्या अनोळखी माणसाच्या डोळ्यामध्ये जिवंत राहील.

माझा अखेरचा श्वास माझ्या आत्ताच्या श्वासांहून काही वेगळा असणार नाही. आत्तासारखेच त्या वेळेलाही माझ्या श्वासातून कार्बनडायऑक्साईड आणि बाष्पच बाहेर पडेल. मला असं मुळीच वाटत नाही की माझ्यामध्ये आत्मा किंवा जीव आहे जे मी मेल्यांनंतर अस्तित्वात असेल आणि स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये जाईल, किंवा भूत बनून भटकत राहील किंवा नवीन जन्म घेईल. आत्मानामक जर काही अस्तित्वात असेल तर माझ्या शरीरातील इतर मृत हिस्सा जसा हळू हळू माझं शरीर सोडून गेला तसाच त्या आत्म्याचा बराचसा भाग आधीच निघून गेलेला असला पाहिजे. आणि आता अस्तित्वात असलेल्या १२५ पाउंड पेशी मेल्यावरसुद्धा आत्म्याचा सूक्ष्म हिस्सा दुसऱ्या माणसाच्या कॉर्नियामध्ये जिवंत असेल.

दैवी चमत्कारांच्या गैप्यस्फोटाची मोहीम: डॉ. कोवूर यांनी भारतामध्ये १९६० ते १९७० च्या दशकामध्ये जी दैवी चमत्कारांच्या गौप्यस्फोटाची मोहीम काढली होती तिला तोड नाही. आपल्या टीमच्या सदस्यांसमवेत ते थेट नावाजलेल्या बाबाबुवांच्या आड्ड्यावरच धडक देत असत. अनेक दशके लोकांना भुरळ पाडून लुबाडणारे भारतातील एक नंबरचे ठक सत्यसाईबाबा यांना कोवूरांनी दिलेली धडक भेट केवळ अविस्मरणीय आहे. कोवूरांनी आपल्याला भेट मिळावी म्हणून त्यांना अनेक पत्रे लिहिली, पण साईबाबांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. मग त्यांनी बाबांना सांगितलं की ते त्यांना बंगलोरच्या व्हाईट फील्ड येथे भेटायला येतील. कोवूर तिथे पोचायच्या आत बाबा तिथून पळाले आणि आपल्या पुट्टपार्थीच्या आश्रमात जावून लपले.

कोवूर यांच्या मोहिमांमुळे भारतातील बुद्धिप्रामाण्यवादी चळवळींच्यात नवा उत्साह संचरला. देशाच्या विविध भागांमध्ये अनेक संशयवादी संघ निर्माण झाले. भारतातील बुद्धिप्रामाण्यवादी, संशयवादी आणि विवेकवादी चळवळी कोवूर यांना त्यांच्या मोहिमा, चळवळी, व्याख्यानं आणि लेख यासाठी सदैव ऋणी राहतील .

अब्राहम कोवूर यांचे आव्हान: मी अब्राहम कोवूर, राहणार -‘तिरुवल्ला’, पामणकडा लेन, कोलंबो ६, असं जाहीर करतो की मी, जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला जो कोणी इसम वैज्ञानिक कसोटीच्या सर्व अटी पाळून आपल्या अलौकिक किंवा चमत्कार पूर्ण शक्तीचं प्रात्यक्षिक करून दाखवील त्या कोणालाही १००,००० श्रीलंकन रुपये बक्षीस म्हणून द्यायला तयार आहे. हे इनाम मी हयात असेपर्यंत किंवा मला पहिला विजेता सापडेपर्यंत राखून ठेवले जाईल. जे बाबाबुवा, साधुसंत, योगी, सिद्धपुरूष आपल्याला आध्यात्मिक तपस्येतून अलौकिक शक्ती प्रापत झाली असल्याचा आणि दैवी कृपा असल्याचा दावा करतात त्यांनी खालीलपैकी कोणताही चमत्कार करून बक्षीस मिळवावे.
१. एका सीलबंद पाकिटात ठेवलेल्या करन्सी नोटवरील नंबर बिनचुक सांगणे.
२. एका करन्सी नोटची हुबेहुब प्रतिकृती बनवणे.
३ पायाच्या तळव्याला फोड न येता धगधगत्या निखाऱ्यावर अर्धा मिनिट निश्चल उभे राहून दाखविणे.
४. मी सांगेन ती वस्तू हवेतून काढून दाखविणे.
५. सायकोकायनेटिक पॉवरचा वापर करून एखादी घन वस्तू हलवून अगर वाकवून दाखविणे.
६. टेलिपथीचा उपयोग करून दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखणं.
७. प्रार्थना, श्रद्धा, अलौकिक शक्ती, मंतरलेलं पाणी, विभूती इत्यादीच्या सहाय्याने शरिराच्या कापून टाकलेल्या अवयवाची एक इंच एवढी तरी वाढ करून दाखविणे.
८. योगिक शक्तीचा वापर करून स्वतःचं शरीर जमीनीपासून वर अधांतरी ठेवून डाखविणे.
९. योगिक शक्तीने हृदयाचे ठोके पाच मिनिटांपर्यंत थांबविणे.
१०. योगिक शक्तीने श्वासोश्वास अर्धा तास थांबविणे.
११. पाण्यावर चालणे.
१२. भविष्यातील एखाद्या घटनेचे भाकित करणे.
१३. शरीर एका जागी सोडून दुसऱ्या ठिकाणी प्रकट होणे.
१४. सर्जनशील प्रज्ञा विकसित करणे किंवा ट्रान्सिंडेंटल/योगिक मेडिटेशनने प्रबुद्ध बनणे
१५. पुनर्जन्मामुळे माहीत नसलेली परदेशी भाषा बोलणे किंवा अंगामध्ये भूत किंवा देवी आणून दाखविणे.
१६. फोटो काढता येईल असे भूत अगर आत्मा आणून दाखविणे.
१७. फोटो काढल्यानंतर फोटोच्या निगेटिव्हमधून नाहिसे होवून दाखविणे.
१८. कुलूप घालून बंद केलेल्या खोलीतून अलौकिक शक्तीच्या सहाय्याने बाहेर येवून दाखविणे.
१९. अलौकिक शक्ती वापरून एखाद्या वस्तूव्या वजनामध्ये वाढ करून दाखविणे.
२०. लपवून ठेवलेली वस्तू ओळखणे.
२१. पाण्याचे पेट्रोल अगर वाईनमध्ये रूपान्तर करणे.
२२. वाईनचे रक्तामध्ये रूपान्तर करणे.

ज्योतिष आणि हस्तसामुद्रिक ही दोन्ही शास्त्रे पूर्णपणे वैज्ञानिक आहेत असे सांगून भोळ्या लोकांना फसविणारे ज्योतोषी आणि हस्तपरीक्षा करणारे सुद्धा जर ते काही दिलेल्या बिनचुक पत्रिकांवरून अगर हस्तमुद्रांच्या ठशांवरून त्या स्त्री/पुरुषाच्या तसेच मृत/जिवंत व्यक्तीच्या आहेत हे (केवळ ५% पेक्षा कमी चुका करून) ओळखू शकले तर हे बक्षीस जिंकू शकतात.

चमत्कार करून दाखविणाऱ्या सत्यसाईबाबा सारख्या अनेक अलौकिक व्यक्तिमत्व असलेल्या योगी मंडळींना, तसेच ज्यांनी आता पाश्चात्य देशांमध्ये भोळ्याच पण जास्त पैसेवाल्या लोकांच्यामध्ये आपले बस्तान बसविले आहे अशा व्यक्तींनाही हे आव्हान देत आहे. त्यांनी माझ्यासारख्या संशयवादीचे हे आव्हान स्वीकारून आपण लबाड नाही हे दाखवून द्यावे.