स्त्रियांच्या आरोग्यावर आणि पोषणावर अंधश्रद्धांचा परिणाम

स्त्रिया सर्व कुटुंबासाठी आपापल्या कुवतीनुसार चांगलं जेवण बनविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. परंतु त्यांना आरोग्य आणि चांगला आहार यांचं प्रशिक्षण दिलंच जात नाही. परंपरागत अन्न शिजविण्याच्या पद्धती स्त्री आपल्या आईकडून शिकते. क्वचित, परवडत असेल तर ती काही आवडीचे अनोखे पदार्थ करून पाहते. परंतु अन्नाचे घटक, त्यांची पोषणमूल्ये, कुटुंबातील व्यक्तीनुसार गरज असलेले वेगवेगळे आहार इत्यादींबद्दल तिला काहीच माहिती उपलब्ध नसते, मग प्रशिक्षण तर दूरच. त्यातून सामान्य भारतीय कुटुंबाची क्रयशक्ती इतकी माफक असते की सर्व कुटुंबियांना पुरेसा आहार मिळणे जवळजवळ अशक्य असते. याचा सर्वात वाईट परिणाम होतो तो गृहिणीवर. कारण आपली संस्कृती स्त्री तिचा नवरा आणि त्याचं कुटुंब यांच्यासाठीच जगते असं सांगत असते. सर्वांची जेवणं झाल्यावर जेवढे उरेल तेवढेच अन्न स्त्री खाते. आईप्रमाणेच घरातील मुली सुद्धा कुपोषित आणि अशक्त असतात. शरीराची पूर्ण वाढ होण्याआधीच या मुलींची लग्ने लावली जातात आणि त्यांना लवकरच मुलगा झाला नाही तर नवरा सोडून देतो. मुलगा न होण्यास किंवा मूलच न होण्यास जबाबदार नवरा असू शकतो हे कोणालाच पटत नाही. आणि त्याबाबतीत डॉक्टरचा सल्ला न घेता मुलींना मंत्र-तंत्र करणाऱ्या बाबाकडे नेले जाते.
बहुतेक कुटुंबांमध्ये स्त्र्रीकडे तिच्या बाळंतपणामध्ये लक्षच दिले जात नाही. ती आजारी पडून काही काम करू शकेनाशी झाली म्हणजे तिला थोडी सहानुभूती दाखवली जाते. या दुर्लक्षित असण्याचा आणि कुपोषणाचा परिणाम बऱ्याच प्रकारांनी होतो. रक्त वाढण्यासाठी शासनाकडून विनामूल्य गोळ्या दिल्या जातात. परंतु अशा गोळ्या वाटण्या ऐवजी जर गर्भवती स्त्रीला, जी कुटुंबासाठी जेवणही बनवत असते, तिला कुटुंबातील सर्वांना योग्य पोषण मिळेल असा आहार बनविण्याचे प्रशिक्षण दिले तर ते जास्त उपयोगी ठरेल. अर्थात ह्या सर्व समस्यांचं गरीबी हे मूळ आहेच. पण तेच एकमेव कारण मात्र नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

मासिक पाळी सुरू झाल्यावर सुमारे ४ ते ५ वर्षांनंतर मुलीच्या शरीराची वाढ पूर्ण होते. साधारणपणे १२ व्या वा१३व्या वर्षी पाळी सुरू होते म्हणजे तिचे १८व्या वर्षी लग्न होवू शकते. पण १५-१६व्या वर्षीच, विषेशतः खेड्यांमध्ये लग्न झाल्याने मूल आणि बाळंतपण फार लवकर होते. तिच्या गर्भाशयाची पूर्ण वाढ झालेली नसते, आहार अपुरा असतो, त्यामुळे तिला होणारे मूल खुजे राहते. ३०%नवजात शिशूंचे वजन २.५ किलोपेक्षा कमी असते. इतर प्रगतीशील देशांच्या तुलनेमधेही भारतातील अर्भकांच्या मृत्यूचं प्रमाण दहापटीने जास्त आहे. प्रगत देशांशी तर तुलनाच करायला नको. बाळंतपणात मरणाऱ्या स्त्रियांची संख्या भारतात एक लाखात पाचशे एवढी आहे; इतर प्रगतीशील देशामध्ये ही संख्या केवळ २० एवढी आहे.

या देशामध्ये स्त्रीचं आरोग्य अत्यंत उपेक्षित राहिलं आहे हे तर खरेच आहे परंतु इथे मुद्दा हा आहे की या सर्व गोष्टींमुळे स्त्री अत्यंत असहाय्य होते आणि अंधश्रद्धांना बळी पडते. आपल्या शरीराचे आणि मनाचे क्लेश कमी व्हावेत म्हणून ती व्रतवैकल्यांकडे वळते. पण तिच्या क्लेशाचं खरं कारण असतं कुपोषण आणि दुर्लक्ष. त्यामुळे वारंवार येणाऱ्या तिच्या आजारासाठी तिला बाहेरची बाधा झाली आहे असे समजून देवऋषी आणि तांत्रिकमांत्रिकाकडे नेण्यात येते आणि त्यांच्यावर पैसा, वेळ अणि यातायात केली जाते. तिच्या अपरिपक्व शरीरावर आणि मनावर संसाराची जबाबदारी येवून पडते. बाळंतपणात ती किंवा तिचे बाळ दगावण्याची भीती तिचे मन खात असते. या सर्वांमुळे तिला सौम्य वा तीव्र मानसिक आजार होतो आणि अर्थात तिला भुताने पछाडले आहे असे समजून तिच्यावर नेहमीचे भूत उतरविण्याचे उपाय करण्यात येतात. स्त्रीच्या अंधश्रद्ध मानसिकतेचा भौतिक पाया म्हणजे तिच्या जगण्याचं हे वास्तव.
अनेक कारणांमुळे बहुतेक स्त्रिया कुठल्यातरी मानसिक दबावाखाली असतात; नवऱ्याचे बायकोवर प्रेम नसते; सासू छळ करते; कुटुंबीय तिला मान आणि किंमत देत नाहीत; कुटुंबामध्ये एकोपा नसतो; लैंगिक सुख मिळत नाही इत्यादी अनेक कारणे असतात. त्यामुळे स्त्रीचे व्यक्तिमत्व दुभंगते, याचा संबंध विशिष्ट काळ, स्थळ आणि व्यक्तीशी असतो. उदा: अंबाबाई आणि दत्तात्रेय यांच्या देवळात अनेक स्त्रियांच्या अंगात येतं. हे ढोंग नसतं. ती सखोल स्वसंमोहनाची अवस्था असते किंवा सौम्य मानसिक आजार असतो. त्याला हिस्टेरिया म्हणतात. हिस्टेरिया हा प्रसंगोपात्त विकार. रुग्णाच्या छातीत धडधडते, त्याला हुडहुडी भरते, शरीराला आचके येतात, गळा किंवा छाती आवळल्यासारखी वाटते. ही सर्व मानसिक विकृतीची लक्षणं आहेत. रुग्णाला थोड्या वेळाने त्याची सवय होते मग ही लक्षणे थांबतात. पण काही कालावधीनंतर पुन्हा हाच त्रास सुरू होतो. औषधे देवूनही हा आजार पूर्ण बरा होत नाही कारण आजार नाहीसा होण्यास औषधापेक्षा जास्त गरज असते ती ज्या परिस्थितीमुळे तो उद्भवला ती परिस्थिती नाहीशी होण्याची. जर सासूचा छळ किंवा नवऱ्याचं पिणं पूर्वीसारखंच चालू राहिलं तर आजार सुद्धा चालूच राहातो. केव्हा केव्हा रुग्ण एकाएकी बरा होतो किंवा मांत्रिकाने दिलेल्या विधायक सूचनांचा परिणाम झाल्याने बरा होतो. तेव्हा सर्वांचीच खात्री होते की भूतानेच पछाडले होते. आणखी काही लक्षणं- हातपाय गळून जाणं, उत्तम दृष्टी असून दिसेनासं होणं, स्वरयंत्र दुरुस्त असतांना बोलता न येणं इत्यादी- असल्यास त्याला हिस्टेरिकल झटके म्हणतात. औषधोपचाराविना असे आजार बरे झाल्यास त्याचा परिणाम अलौकिक शक्तींच्या अस्तित्वावरचा विश्वास वाढण्यामध्ये होतो. परंपरेची मान्यता, भावनिक उद्रेक आणि स्वसंमोहन यामुळे एखाद्या स्त्रीच्या अंगात येतं आणि ती घुमू लागते. कधी कधी हे घुमणे तासन्तास चालते आणि घुमणाऱ्या स्त्रीला शारीरिक वेदनांचंही भान राहात नाही आणि कधी कधी तर ती एखादी विचित्र भाषा बोलू लागते. या सर्व घटनांना करणीभूत असलेल्या वैज्ञानिक कारणांच्या अज्ञानामुळे त्यातील गूढता वाढते आणि अंधश्रद्धा बळावतात.

अज्ञान आणि गरीबी या दुरवस्थांच्या जोडीने आजार आणि अंधश्रद्धा येतातच. ह्या दुर्दैवी कुपोषित महिला आणि त्यांचे कुटुंबीय अनेक सहज टाळता येणाऱ्या रोगांना बळी पडतात. अस्वच्छतेमुळे त्वचेचे रोग होतात; हे रोग ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. नऊ महिने पुरे होण्याअगोदरच प्रसूती होणे, बालमृत्यू, बाळंतपणात अगर गर्भारपणी स्त्रीचा मृत्यू, असे अनेक रोग ग्रामीण भागात नित्याचे आहेत. श्रीलंका आणि बांगलादेश या दोन छोट्याशा देशांमध्ये सुद्धा हे प्रमाण भारतापेक्षा कमी आहे. कुपोषण, लहानपणी झालेली हेळसांड, अज्ञान, पौगंडावस्थेतच गर्भारपण, आरोग्यसुविधांशिवाय बाळंतपण, स्वतःच्या मुलांच्या खस्ता खाणं, कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय जबाबदाऱ्या पेलणं, अशा अनंत आपत्तींनी घेरलेल्या या स्त्रिया अंधश्रद्धांना बळी पडतात. स्त्रियांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या जाहीरनाम्यामध्ये या सर्व संबंधित अडचणींचा विचार व्हायला हवा.