संस्कार, कर्मकांड आणि सण

२००७ साली अमरनाथ येथील बर्फाचं स्वयंभू शिवलिंग वितळू लागलं. जागतिक तापमानातील वाढ आणि भक्तमंडळींची अतोनात गर्दी शिवालासुद्धा सहन होईना! अशीच आणखी एक समस्या म्हणजे रामसेतु (रामाने लंकेला पोहोचण्यासाठी बांधलेला पूल) पाडून टाकण्याचा प्रस्ताव. निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पहिली घटना घडली तर दुसरी व्यापारी उद्दिष्ट साधण्यासाठी मानवाने आखली. ह्या आणि अशा अनेक गोष्टींनी हिंदु धर्मियांच्या धर्मभावना दुखावतात. ह्याबाबत राजकीय पक्ष काय भूमिका घेतात त्याचा विचार न करता, आता सर्व जनतेने-सर्व धार्मिक/अधार्मिक लोकांनी- एकत्र येवून या असल्या समस्यांबाबत आपण भावनेच्या आहारी न जाता, समाजहिताचाच विचार करून काय कृती करायला पहिजे हे ठरविण्याची वेळ आली आहे. अशा समस्यांमधून आपण काय बोध घ्यायचा, आपल्या श्रद्धा आणि धार्मिकता यांचा आपल्या मनावर आणि बुद्धीवर किती पगडा असू द्यायचा ह्याचा विचार प्रत्येकाने स्वार्थ बाजूला ठेवून, विवेक आणि सदसद्बुद्धीचा वापर करूनच करायला हवा.

आपल्या इतर अनेक समाजाने निर्माण केलेल्या संस्थांप्रमाणे धर्म ही सुद्धा एक संस्था आहे. ही संस्था सर्वात जुनी संस्था असून समाज एकनिनसी व स्थिर राहण्याच्या गरजेतून ती निर्माण झाली आणि त्या त्या समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली. प्रत्येक संस्कृतीचे दोन पैलू असतात. पहिल्या पैलूमुळे समाज प्रबुद्ध होतो तर दुसऱ्यामुळे सामाजिक बर्तणूक निश्चित होते. भारतीय संस्कृतीच्या प्रबुद्धतेचा पाया आमच्या ऋषीमुनींनी घातला. अज्ञानातून ज्ञानाकडे प्रगती करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ‘सत्यं-शिवं-सुंदरं हे त्यांचं अंतिम उद्दिष्ट होतं. ऋत म्हणजे निसर्गाच्या वैश्विक नियमांचा शोध घेताना त्यांनी उपनिषदे आणि दर्शने रचली. त्यांच्यापैकी जे थोडे बंडखोर होते, त्यांनी लोकांच्या गर्दीपासून लांब अरण्यामध्ये वास्तव्य करून ‘अरण्यके लिहिली. या ऋषीमुनींनी चर्चा आणि वादविवाद करून मिळविलेली आणि पुढच्या पिढ्यांकडे सुपूर्द केलेली ज्ञानसंपदा कष्ट करून पोट भरणाऱ्या (आणि विद्वानांचेही पोषण करणाऱ्या) सामान्य जनतेच्या आकलनापलिकडे होती. पण संकृतीचा दुसरा सामाजिक वर्तणुकीचा पैलू काही धूर्त आणि तल्लख लोकांनी आपल्या ताब्यात घेतला. ऋषीमुनींचे उदात्त तत्त्वज्ञान त्यांनी ग़ुंडाळून ठेवले. समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था रहावी म्हणून त्यांनी वर्णाश्रमसंस्थेला बळकटी आणली. वर्णाश्रमसंस्थेमुळे त्या काळी भारतीय उपखंडामध्ये कानाकोपऱ्यात पसरलेल्या आणि स्वतंत्रपणे नांदत असलेल्या अनेक जाती जमातींना एका समाजव्यवस्थेमध्ये बांधणे शक्य झाले. समाज नीतिमान रहावा म्हणून त्यांनी पूजाअर्चा इत्यादी कर्मकाण्ड प्रेरित भक्ती आणि श्रद्धा यांना बळकटी आणली. ब्राह्मणे लिहून सर्व कर्मकांडांना मूर्त स्वरूप दिले. यातून त्यांना भारतातील सर्व जातीजमाती आणि त्यांची दैवते यांना हिंदू धर्मामध्ये स्थान देणं शक्य झालं. स्मृतींची रचना करून त्यांनी सर्व समाज एका सामाजिक-आर्थिक-शासकीय चौकटीमध्ये बंदिस्त केला.

या सर्व क्लुप्त्या, डावपेच आणि योजना यांच्या मदतीने त्यांनी समाजामध्ये एक अशी मानसिकता रुजविली की त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संशय, चिकित्सा आणि तक्रारीला थारा उरला नाही. त्यांच्या वाट्याला आलेल्या हालअपेष्टा आणि कष्ट ते मुकाट्याने काही तक्रार न करता आपले ‘प्राक्तन’ म्हणून सोसू लागले. आपण सर्वच या दैववादी मानसिकतेच्या कमीजास्त प्रमाणात आहारी गेलेलो आहोत. समाजामध्ये आपल्याला मिळालेली भूमिका आपण मुकाट्याने पार पाडतो; त्यामध्ये काही बरा बदल होण्याची शक्यता आहे का याचा विचारही करीत नाही आणि परंपरागत आपल्यापर्यंत पोचविल्या गेलेल्या साऱ्या रूढी, सारी कर्मकांडे जशीच्या तशी आचरतो. त्याबाबत कोणी काही अडथळा आणला किंवा साशंकता दाखविली तर आपल्याला राग येतो. सगळ्या सांस्कृतिक चालीरीती आचरताना त्यांच्या प्रयोजनाबाबत आपण स्वतंत्र विचार करायला हवा आणि आपल्या बुद्धीचं आपल्या आचरणावर नियंत्रण हवं असं आपल्या मनात कधी येतच नाही. बुद्धीचा वचक नसलेली निःसंशय श्रद्धा आणि या श्रद्धेपोटी घडत असलेलं वर्तन यांच्यामुळे समाजामध्ये अशांती निर्माण होते. श्रद्धांचं व्यापारीकरण होतं आणि धार्मिक बंधनांपेक्षा आपल्या सदसद्विवेक बुद्धीवर अवलंबून असणाऱ्या नीतिमूल्यांना आणि नैतिक वर्तनाला वाव राहात नाही.

पाश्चिमात्य परिप्रेक्ष यापेक्षा थोडं वेगळं आहे कारण तिथले बुद्धिवंत गणित, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यांच्या अभ्यासाकडे आणि संशोधनाकडे वळले. त्यांच्या प्रयत्नांमुळे पाश्चिमात्य संस्कृतीमधला टीका न करता केवळ दृढ श्रद्धेला महत्त्व दिल्यामुळे आलेला साचलेपणा नाहीसा झाला आणि त्यांची संस्कृती प्रगतीशील झाली. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे त्यांचं जगणं इहवादी झालं. भारतातही अनेक खगोलशास्त्र, गणित, भौतिक शास्त्र जाणणारे वैज्ञानिक होवून गेले. शल्यविषारदही होवून गेले. परंतु स्मृती आणि ब्राह्मणे रचणाऱ्या धूर्त ब्राह्मणांनी ह्या वैज्ञानिकांचे विज्ञान आणि संस्कृती तळागाळातील गरीब जनतेपर्यंत पोचूच दिले नाही. थोडेसे ज्ञान मिळताच त्यांची ज्ञानपीपासा आणि पर्यायाने शहाणपणही वाढेल अशी त्यांना भीती होती. धर्माने त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं आणि धार्मिक कर्मकांडं, पूजाअर्चा, उपासतापास, जपजाप्य, यात्रा, सण, नवस, इत्यादींमध्ये अडकवून सतत परलोकावर, पुढील जन्मावर डोळे लावून ठेवायला शिकवलं. संविधानामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाचा शिक्षणाचा हक्क मान्य केलेला असताना अजूनही कित्येक नागरिक शिक्षणापासून वंचित आहेत; अजूनही आपला हा निष्क्रीय पारलौकिक दृष्टिकोन आणि चिकित्सा न करता श्रद्धा बाळगण्यातील बौद्धिक आळस कायम आहे.
ही निष्क्रीयता आणि हा आळस आपल्याला झटकून टाकायला हवा; आणि आपल्या प्रथा आणि कर्मकांडं, विशेषतः आपल्या महिलांवर त्यांना घरात डांबून ठेवण्यासाठी लादलेली कर्मकांडे आणि व्रतवैकल्ये याचा नव्याने विचार करायला हवा. जे जे मानवाच्या प्रतिष्ठेचा अवमान करणारे असेल ते सर्व ताबडतोब टाकून दिले पाहिजे. आणि मानसिक-भावनिक उन्नतीसाठी आवश्यक असलेले तेवढेच आचार अंगिकारले पाहिजेत. आपल्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आपण किती वेळ देतो आणि धार्मिक कर्मकांडासाठी किती वेळ देतो ह्याचा हिशोब ठेवण्यास शिकले पाहिजे.

आपलं भारतीय मन हिंदूंच्या ३३कोटी देवसंख्येवर तृप्त होत नाही. इतर एकेश्वरी धर्मांचे आकाशातील देव सुद्धा आपण पुजतोच. एवढ्याने भागत नाही म्हणून आपण नद्या, पर्वत, दगड, जनावरं, झाडं, मृतात्मे, भुतं, संत, फकीर आणखी बऱ्याच काही गोष्टींमध्ये देवत्व स्थापन करतो. ह्या साऱ्या नद्या, पर्वत, ही झाडे-जनावरे यांचं संधारण व संरक्षण करण्याऐवजी धर्माच्या नावाखाली आपण त्यांचा ऱ्हास चालविला आहे. आणि सर्वात निंद्य गोष्ट म्हणजे अनंत देव ‘अस्तित्वात‘ असूनसुद्धा एकाएकी शेंदूर फासलेला दगड स्वयंभू मारुती नाहीतर गणपती किंवा आणखी कोणीतरी म्हणून उपटतो आणि बघताबघता त्याच्या भवती देवूळ उभं राहतं. श्रद्धाळू लगेच त्याची पूजा करायला लागतात; दक्षिणा, प्रसाद, फुलं, नारळ वगैरे जमू लागतं आणि पुजाऱ्याला ऐतं उपजीविकेचं साधन लाभतं. इतरत्र कुठेतरी एखाद्या रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या थडग्यावर कुणीतरी हिरवी चादर अंथरतं. त्या थडग्याचा पीर बनतो आणि नवसाला पावू लागतो. हा पसारा पुरेसा नाही म्हणून की काय, प्रत्येक धर्मामध्ये बाबाबुवा, भगवान, अवलिया जिवंत असताना अगर मेल्यावरही आपल्या अलौकिक शक्तीने लोकांवर भुरळ घालीत असतात. या बाबाबुवांचा धर्म कोणताही असो प्रत्येक भारतीय त्याच्यावर निःसंशय श्रद्धा ठेवतो. राष्ट्रीय एकात्मतेचा हा एकमेव पुरावा आहे. एरवी परधर्मियांचे गळे घोटणारे धार्मिक मूलतत्त्ववादी सर्व धर्माच्या बाबाबुवांकडे सांत्वनासाठी आशेने बघत असतात; एकमेकांच्या चमत्कारिक आणि विचित्र धार्मिक आचारांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतात आणि एकमेकांच्या देवदेवतांना आपल्या धर्मात स्थान देतात. जे लोक आपला स्वतःचा मूळचा शुद्ध धर्म जसाच्या तसाच जतन करण्याचा अट्टाहास करतात ते या परधर्माच्या देवदेवतांची, बाबाबुवांची आणि कर्मकांडांची स्वतःच्या धर्मात होणारी लुडबुड का सहन करतात? या उलट शासानाने जर एखाद्या कायदा आणि सुव्यवस्थेला धोका आणणाऱ्या कर्मकांडावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला तर हेच लोक लगेच त्याविरुद्ध दंगे घडवून आणतात. नारळ आणि इतर पूजासाहित्यामध्ये स्फोटक द्रव्य असण्याची शक्यता लक्षात घेवून शासनाने जेव्हा सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये पूजासाहित्य नेवू न देण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा विरोधी पक्षाच्या लोकांनी त्याविरुद्ध खूप आरडाओरडा केला. सत्तेत असलेल्या शासनाने पायउतार व्हावे अशीही मागणी केली. अखेर प्रस्ताव मागे घेण्यात आला. सरकारचा राजिनामा मागणारे हे राजकारणी सिद्धिविनायकाच्या रांगेत तासंतास कधी थांबले आहेत का?

सर्व प्रकारचा अपव्यय करणाऱ्या आणि भोळ्या नागरिकांना धार्मिकतेच्या नशेमध्ये बुडवून ठेवणाऱ्या या निरर्थक धार्मिक संकल्पनांची प्रत्येकाने चिकित्सकपणे तपासणी करायला हवी. आपल्या धार्मिकतेकडे आपण विवेकवादी दृष्टिकोनातून पहायला पाहिजे कारण कर्मठ परंपरावादी धर्माचरणाच्या गर्तेमध्ये अनेक पिढ्या अडकून पडलेल्या स्त्रियांना त्यातून बाहेर काढण्याचा हाच एक मार्ग आहे.
सुमन ओक