संतांच्या बुरख्यातले ढोंगी

बाबा, महाराज आणि आचार्य: बहुजन समाजातले, शिक्षणाला पारखे असलेले गोरगरीब आपल्या गरीबीतून आणि विपन्नावस्थेतून सुटका व्हावी म्हणून बाबाकडे वळतात. मध्यमवर्गातील सुखवस्तु मंडळी ‘‘जगा आणि जगू द्या’’ असा मंत्र देणाऱ्या महाराजांकडे वळतात तर उच्चविद्या विभूषित उच्चमध्यमवर्गीय मंडळी आचार्यांकडे जावून ‘‘आर्ट ऑफ लिव्हिंग‘‘चे धडे गिरवतात. या ‘बाबा-महाराज-आचार्य-’ यांच्या तिन्ही संस्था व्यक्तीकेन्द्री आहेत. त्यांची सुरुवातच होते ‘‘व्यक्ती बदलली तर समाज बदलेल’’ या वचनाने. त्यानंतर ते श्रोत्यांना स्वतःचा उद्धार आणि प्रगती करण्यास सांगतात. आणि अखेरीस स्वतःच्या साऱ्या विवंचना आचार्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्यावर सोपवून आचार्यांना शरण जाण्याचा सल्ला देतात. या देवमाणसाच्या प्रती संपूर्ण शरणागती पत्करण्यातच आपलं जीवनसाफल्य आणि परमसुख आहे याची त्या भक्तजनांना मनोमन खात्री पटते. आणि या संपूर्ण प्रक्रियेच्या परिणामस्वरूप माणूस समाजापासून अलग होतो.

सत्यसाईबाबा: खूप गाजावाजा करून साईबाबांनी आपला ८० वा वाढदिवस साजरा केला. अर्थातच टीव्ही चॅनल्सनी त्याचं चित्रीकरण लोकांना दाखविलं. वर्तमानपत्रेही मागे राहिली नाहीत. परंतु हिंदुस्थान टाइम्स या वजनदार वर्तमानपत्रामध्ये वीर संघवी या प्रसिद्ध पत्रकाराचा लेख प्रसिद्ध झाला. आपल्या ‘‘द ट्रुथ ऑफ सत्यसाईबाबा’’ या लेखामध्ये त्यांनी अनेक प्रश्न उभे केले आहेत. साईबाबांच्या विकृत समलिंगी कामुकतेचे अनेक पुरावे इन्टेरनेटवर त्यांच्या वासनेचे शिकार झालेल्या त्यांच्या अनुयायांनी लिहिलेले उपलब्ध आहेत. हे सर्व जण एके काळी बाबांचे भक्त होते. त्यंच्यापैकी काही खोटारडे असू शकतील पण सगळेच्या सगळेच खोटे आहेत असे म्हणता येणार नाही. शेकडो तरूण जर बाबांनी त्यांचे लैंगिक शोषण केले अशी तक्रार करीत असले तर सारेच्या सारे खोट का बोलतील? हे बाबा हवेतून सोन्याच्या साखळ्या, अंगठ्या आणि तोंडातून शिवलिंग काढतात आणि हा त्यांच्या अलौकिक दैवी शक्तीचा पुरावा आहे असा ते आणि त्यांचे अनुयायी दावा करतात. पण कोणीही छोटा मोठा जादुगार हे सारे करतोच. आणि हे सारे चमत्कार करण्याआधी बाबा त्यांची तपासणी का करू देत नाहीत? त्यांच्या मुठीत मावणार नाही एवढी मोठी एखदी वस्तू बाबा हवेतून का काढीत नाहीत? आणि ह्या बाबांवर जेव्हा त्यांच्या स्वतःच्याच भक्तांनी हल्ला केला तेव्हा ते बाथरूममध्ये का लपून बसले?

आसाराम बापू: असारामबापू हे आणखी एक बाबा. गुजरात राज्यातील सुरतचे रहिवासी. आध्यात्माच्या ह्या घावूक व्यापाऱ्याने खूप मोठी ४० करोड किंमतीची जमीन केवळ २९ लाख रुपये खर्चून मिळविली. गुजरातच्या उच्च न्यायालयाने त्याप्रित्यर्थ अशी जमीन देणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आणि बापूंच्या संस्थांनी हडपलेली सारी जमीन तीन महिन्यांमध्ये जिल्हधिकारींच्याकडे सुपूर्द करावी असे आदेश दिले. आसाराम बापूंनी मध्यप्रदेश, छत्तिसगढ, बिहार या राज्यांमधेही आश्रम स्थापन केलेले आहेत. पण हेही सारे आश्रम विवादात सापडले आहेत.

नरेन्द्र महाराज: हे आणखी एक महारज. हे उघडपणे हिंदुराष्ट्र निर्मितीची भाषा बोलतात. आणि संविधानालाच थेट आव्हान देतात. त्यांना विरोध करणाऱ्यांचे हातपाय तोडा असा आदेश ते आपल्या शिश्यांना देतात. त्यांनी विमानातून प्रवास करताना आपल्या हातातील दण्ड दूर ठेवण्यास नकार दिला आणि विमानतळावर त्यांच्या चेल्यांनी त्याबाबत हंगामा सुरू केला आणि विमानतळाची नासधूस केली.

अनिरुद्ध बापू: हेही असेच दैवी महाराज आहेत. त्यांचा दावा असा आहे की ते आपल्या सर्व भक्तांचे पूर्वजन्म आणि भविष्यातील जन्म जाणतात तसेच ते आपल्या भक्तांना वेगवेगळ्या देवदेवतांच्या रुपामध्ये वेळोवेळी दर्शन देत असतात.

रामदेवबाबा: या बाबांची वेबसाइट आहे. त्यावर ते कर्करोग, एड्स, पक्षाघात, अशा मोठमोठ्या असाध्य रोगांची नावे देतात आणि हे सारे रोग त्यांच्या आयुर्वेदिक औषधांनी आणि नियमीतपणे प्राणायाम करून बरे करण्याचा दावा करतात. याबाबत केन्द्रीय आरोग्य मंत्रालयाने त्यांना नोटीस पाठविली आहे. ते सध्या पतंजली योगपीठ उभारण्याच्या खटपटीत आहेत. त्यासाठी १०० कोटी रुपये खर्व होणार आहेत. आयुर्वेदिक औषधे बनविण्याच्या त्यांच्या कारखान्यातील कामगारांना मात्र ते किमान वेतन द्यायलासुद्धा तयार नाहीत आणि त्यात ते काही शोषण करतात असं त्यांना वाटत नाही.

इतर कनिष्ठ बाबाबुवा: ह्या सुप्रसिद्ध बाबाबुवांखेरीज लहानमोठे अगणित बाबाबुवा आहेत जे भोळ्या भाभड्या लोकांना आरोग्य, धनसंपत्ती, आणि मनःशांती मिळवून देण्याची वचनं देतात आणि त्यांच्या श्रद्धांचा गैरफायदा घेतात, त्यांचा पैसा लुबाडतात आणि प्रसंगी त्यांचे लैंगिक शोषणही करतात. लोकांना हातचलाखी करून ‘दैवी चमत्कार’ दाखवतात आणि श्रद्धाळूंना आपल्या जाळ्यात ओढतात. हे दैवी चमत्कार चौरस्त्यावर उभे राहून जादू दाखवून पोट भरणाऱ्या लोकांच्या हातचलाखीच्या प्रयोगांसारखे असतात. या क्षेत्रातही आता स्त्रिया मागे राहिलेल्या नाहीत. रोज दैवी शक्ती असलेल्या नवनवीन माता, देवी, इत्यादी बाबाबुवावर्गातील स्त्रिया या धंद्यामध्ये आपले बस्तान बसवू लागल्या आहेत.

या छोट्या बाबा-बुवा-माता यांचं प्रत्येकाचं इतरांपासून वेगळं असं एखादं विशिष्ट दैवत किंवा प्रतिमा किंवा चिन्ह असं काहीतरी असतं. या प्रतिमेच्या सहाय्याने ते स्वतःच्या सामथ्र्याचा बोलबाला आसपास पसरवितात. सर्व प्रसिद्धी तोंडोतोंडीच होत असल्याने त्यामध्ये काही फसवाफसवी आहे असा लोकांना संशय येत नाही. यांच्या दैवताची पूजाअर्चा एखाद्या दूरवरच्या वर्दळ नसलेल्या जागी एका विशिष्ट दिवशी केली जाते. आणि विशिष्ट दिवशीच ते आपल्या अनुयायांना आशिर्वाद/प्रसाद देतात किंवा समस्येवर तोडगा सुचवतात. त्यांच्या पुढ्यामध्ये लोकांनी ठेवलेल्या पैशाचा हिशोब त्यांचे चेले ठेवतात आणि गुरू व चेले दोघेही पाहता पाहता श्रीमंत होतात.

अंनिसच्या कार्यकर्त्यांद्वारा बाबाबुवांचा पर्दाफास: महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून पसरलेले अंनिसचे कार्यकर्ते या ढोंगी बाबा-बुवा-माताजी-देवी यांच्यावर सतत नजर ठेवतात. त्यांची कार्यपद्धती आणि त्यांच्या चेल्यांच्या उचापती यांचा कार्यकर्ते कसून तपास करतात. त्यांचा बुरखा लोकांसमोर उतरविण्याआधी ते पोलिसचौकीमध्ये याबाबतची खबर देतात. त्यानंतर एकदोन कार्यकर्ते अडचणीत सापडलेले गरीब भाविक बनून बाबाकडे जातात. बाबा त्यांना संकट निवारण्याची खात्री देवून पुन्हा विशिष्ट वेळी भेटण्यास व येताना काही वस्तू व रक्कम आणण्यास सांगतो. ठरलेल्या वेळी कार्यकर्ते पोलिसांना आणि स्वखुशीने येणाऱ्या वार्ताहारांना घेवून येतात आणि बाबांच्या पुढे त्यांनी मागितलेली रक्कम ठेवतात. त्यानंतर कार्यकर्ते बाबांना त्यांच्या इलाजाबाबत आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनांबाबत प्रश्न विचारतात. बाबांना अर्थातच प्रश्नांची समर्पक उत्तरे देता येत नाहीत. त्यानंतर पोलिस आपल्या कारवाईची सुरुवात करतात. बहुतेक वेळा अशा तऱ्हेने उघडे पडलेले बाबा बहुधा आपल्या काळ्या कृत्याची कबुली देतात. त्यांनी पुन्हा अशी कृत्ये करणार नाही अशी कबूली दिल्यावर अंनिसचे कार्यकर्ते त्यांना सोडून देतात. अशा हजारो ढोंगी बाबांचा पर्दाफाश कार्यकर्त्यांनी गेल्या तीस वर्षांमध्ये केलेला आहे.