जिल्हा आणि प्रमुख शहरांच्या शिक्षण क्षेत्रातील मुख्य अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीने ही शिबिरे भरविण्यात येतात. शिक्षक या संधीचा फायदा घेवू शकतात आणि शिबिरातील हजेरी त्यांच्या कामाचाच दिवस मानली जाते. अंनिसचे कार्यकर्ते आणि त्यात्या क्षेत्रातील तज्ञ हा अभ्यासक्रम, तो पार पाडण्याची पद्धती, त्याचे मूल्यमापन, त्यासाठी लागणारं शैक्षणिक साहित्य इत्यादी सर्व गोष्टींची आखणी करतात. शिक्षक व्याख्यानानंतरच्या चर्चेमध्ये भाग घेवून आपल्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण मिळवतात. अंनिसने अशा नेहमी विचारल्या जाण्याऱ्या प्रश्नांची एक यादीच बनवून ठेवली आहे; ही यादी विद्यार्थ्यांसाठीही उपयोगी आहे. शिक्षकांना या प्रशिक्षण शिबिरांचा फायदा होतोच शिवाय त्यामधून अंनिसला काही नवीन कार्यकर्तेही मिळतात. आतापर्यंत ५०हजार शिक्षक आणि ५लाख विद्यार्थ्यांनी अंनिसच्या अशा शिबिरांचा फायदा घेतला आहे.
मनोवृत्तीतील बदल: शिबिरामध्ये भाग घेणाऱ्यांच्या मनोवृत्तीमध्ये लक्षणीय फरक झाल्याचे आढळून आले आहे. ‘तुमच्या घरातील लोकांच्या तीन अंधश्रद्धांचा उल्लेख करा या प्रश्नाने प्रशिक्षणार्थीच्या मनात जिज्ञासा जागी होते. या बाबतीत मुलं कधीच उदासीन रहात नाहीत. एकदा त्यांची जिज्ञासा जागी झाली म्हणजे ती थेट निर्भिडपणे आपली अंधश्रद्धांबाबतची नापसंती आईवडिलांसमोर व्यक्त करतात. पालकांनाही मग स्वतःमध्ये थोडाफार फरक करावा लागतो. मुलं नव्हे तर पालकच खरी समस्या आहेत असं अनेक शिक्षणतज्ञ म्हणतात ते खरंच आहे. शिबिरातून शिक्षण घेतल्यानंतर आपल्या पालकांच्या अविवेकी आणि अवैज्ञानिक वर्तनाचा विरोध करणाऱ्या मुलांची अनेक उदाहरणे सापडतात.
२१ सेप्टेंबर १९९५ या दिवशी ठिकठिकाणच्या गणेशमूर्ती एकाएकी दुग्धप्राशन करू लागल्या. या थोतांडाचा विरोध सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांनी असाच विरोध ग्रहणाच्या वेळीही केला. शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थिनीही स्त्री-पुरुष भेद करणाऱ्या प्रथा आणि कर्मकाण्डांना विरोध करतात. मुलांसाठी शिबिरे आयोजित करणाऱ्या शिक्षकांच्या मनोवृत्तीतही खूपच फरक जाणवतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या उपास-तापास; फलज्योतिषावरील विश्वास; निरर्थक, खर्चिक आणि जुनाट सणसमारंभ यांना जवळ जवळ सर्वच शिक्षकांनी आपल्या जीवनातून रद्दबातल केले आहे.
थोडक्यात दिसून आलेले फरक असे आहेत: १. बाबा, बुवा आणि माता यांचा पूर्वी असलेला मनावरचा पगडा बराच कमी झाला आहे. २. सुधारणा घडवून आणण्यामध्ये मुलांना गोडी वाटू लागली आहे. ३. चेटुक, भूतबाधा, जादूटोणा, मूठ मारणं, इत्यादी अंधश्रद्धांवर आधारलेल्या गोष्टींचा दंभस्फोट करण्यात विद्यार्थी हिरीरीने भाग घेवू लागले आहेत. ४. मुलीही धीटपणे लिंगभेद वाढविणाऱ्या कर्मकाण्डांना आव्हान देवू लागल्या आहेत. ५. कट्टर श्रद्धावान आणि अंधश्रद्धाळूंच्या बरोबर वादविवाद करतांना प्रशिक्षित मंडळी शिबिरांच्या अभ्यासक्रमातील साहित्य संदर्भासाठी व मार्गदर्शनासाठी वापरू लागली आहेत. ६. प्रशिक्षित विद्यार्थी इतरांना या शिबिरांचा फायदा घेण्यासाठी उद्युक्त करतात. ७. आपल्या परिसरात घडत असलेल्या घटनांबाबत विद्यार्थी जास्त जागृत झाल्याचे व त्यामध्ये रस घेवू लागल्याचे दिसते. ८. स्वतःचे ज्ञान वाढविण्यासाठी विद्यार्थी सतत जास्त माहिती देणारे साहित्य मागत असतात आणि १०. एका मुलाला अशा तऱ्हेने शिक्षित केल्याने त्याचे सर्व कुटुंबच नव्हे तर त्याचे शेजारीपाजारीही शिक्षित होतात.
विज्ञान आणि तंत्रज्ञान थेट तुमच्या उंबरठ्यावर: आतापावेतो अनेक ठिकाणी फारसे यशस्वी न झालेल्या प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या शहरातील मध्यवर्ती जागी बोलवण्यात येते असे दिसून आले आहे. अंनिसने प्रकल्पच विद्यार्थ्यांच्या दारात नेण्याचे ठरविले. असे प्रकल्प केवळ मराठी माणसांसाठी महाराष्ट्रापुरतेच न राहता संपूर्ण देशामध्ये त्याचे अनुकरण व्हायला हवे. त्यासाठी शक्य असेल ती मदत देण्यास अंनिस तयार आहे. देशातीला लाखो विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक मनोवृत्ती जोपासण्यास अशा प्रकल्पांमुळे गती मिळेल.