विवेक: यशाचे जीवितकार्य

चला नवी घडी घालूया: व्यक्तीच्या जीवनात नवी पहाट उजाडावी म्हणून मानस रूढ असलेल्या अंधश्रद्धा नष्ट करण्याचा, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा, आणि मूल्याधारित विवेकवाद समाजाच्या सभासदांच्या मनामध्ये qबबवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. काही थोड्या लोकांचा अपवाद सोडल्यास आजच्या खालावत चाललेल्या सामाजिक परिस्थितीमुळे सर्वजण निष्क्रीय झाले आहेत; निमूटपणे सोसतात, इतरांचे वर्चस्व चालू देतात पण क्वचित प्रसंगी त्यांची सहनशीलता संपते. आपण असहाय्य, भेदरट आणि दिशाहीन होत चालले आहोत. जिथे तिथे तडजोड करण्याची आपल्याला सवयच जडली आहे. निर्दयपणे होणारं जागतिकीकरण, जीवनाचं व्यापारीकरण, प्रसारमाध्यमांमुळे फोफावणारा भोगवाद, निष्पाप जीवांना व्यसनी बनविणाऱ्या वस्तूंचा पुरवठा, नैतिक मूल्यांची घसरण इत्यादी गोष्टींनी माणसाचं जगणं दुःखद झालेलं आहे. धूर्त राजकारणी आपल्या मर्जीनुसार धोरणं ठरवतात; आपण सर्व त्यांच्या तावडीत सापडले आहोत. हे सर्व कमी आहे की काय म्हणून आता या राजकारणी मंडळींनी धार्मिक कट्टरपंथियांशी हातमिळवणी केली आहे. आणि दोघं मिळून हिंसा, क्रौर्य वाढविण्यास, मानवी मूल्ये पायदळी तुडविण्यास आणि आपल्या स्वार्थास प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे सामाजातलं चैतन्य आणि उत्साह नाहीसं झालं आहे. सगळे लोक जणू काहीतरी अज्ञात, अनाकलनीय ईप्सिताच्या शोधामध्ये पळत सुटले आहेत.

या परिस्थितीतून बाहेर पडण्याची क्षमता, कुवत आमच्यात आहे याचा आम्हाला विसर पडला आहे. काही थोड्या विवेकवादींच्या भगीरथ प्रयत्नांमुळे ही परिस्थिती बदलू शकेल. लोकांच्यामध्ये आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती जागवायला हवी. विस्तार आणि विकासाच्या या ‘लाँग मार्च’ची मशाल हाती घेण्यासाठी आत्मविश्वास आणि चैतन्य ज्यांच्यात सळसळत आहेत असे तरूण पुढे यायाला पाहिजेत. आपल्यात जे थाडे विवेकवादी आहेत ते या तरुणांना आनंदाने योगदान देतील. समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणायचं सामथ्र्य केवळ तरुणांच्याच अंगी असतं. चला समाजसुधारणेचं पहिलं पावूल उचलू या.

विचार करण्याची आणि ते विचार कृतीत उतरविण्याची ताकद आपल्यामध्ये नक्कीच आहे. ही कुवत मानवाला करोडो वर्षांच्या उत्क्रंतीमधून प्राप्त झालेली आहे. विवेकामुळे प्राप्त झालेल्या आत्मविश्वासाला उद्युक्त करायला आव्हान द्यावं लागतं. म्हणून आम्ही तुम्हाला आव्हान करीत आहोत या निष्क्रीय, नाउमेद करणाऱ्या, उच्छेदक परिस्थितीतून वर उठा. इतिहासाने हे दाखवून दिले आहे की वैज्ञानिक वृत्ती आणि तर्काधारित आचरणाने सर्व समस्या सोडविता येतात आणि परिस्थितीवर मात करता येते. या ‘मिशन’मध्ये सामिल होण्यासाठी अंनिस सर्वाना आवाहन देत आहे.

या मिशनचा कार्यक्रम चार आघाड्यांवर राबवायचा आहे. त्या चार आघाड्या अशा:
१. परंपरागत चालत आलेल्या अंधश्रद्धांमध्ये कर्मकांड आणि अनेक आचार असे असतात की त्यापायी माणसाचा कष्टाने मिळविलेला पैसा, त्याचा किंमती वेळ आणि त्याचे कष्ट यांचा अपव्यय होतो. त्यामध्ये समाजचेही नुकसान होतच असते. आजच्या जमान्यामध्ये असा अपव्यय परवडण्यासारखा नाही. अंधश्रद्धांमुळे गरीब आणि दुबळे लोक गरीब-दुबळेच राहतात आणि त्यांना त्या असहाय्य परिस्थितीतून वर उठायला काही वावच राहिलेला नसतो. असा अपव्यय करणाऱ्या अंधश्रद्धांना सामूहिक बळाच्या सहाय्याने नष्ट करण्याची आपण शपथ घेवू या. कर भरणाऱ्यांचा पैसा जे सत्ताधीश सणसमारंभ, कुंभमेळा, देवळं-मशिदी-चर्च इत्यादींच्या डागडुजीसाठी तसेच स्थानिक उत्सवांसाठी वापरतात त्यांना आपण जोरदार विरोध करू या आणि हा पैसा पाणी, वीज, दळणवळण, आरोग्य, प्राथमिक शिक्षण आणि इतर जनकल्याण आणि विकासाच्या कार्यक्रमांसाठी वापरण्यास भाग पाडू या.

२. माणूस विवेकी नसला तर तो मनाने अंधश्रद्धांना आणि आचरणाने व्यसनांना बळी पडतो. व्यसनांमुळे त्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडतं, यातना सहन कराव्या लागतात आणि आयुष्य कमी होतं. वैयक्तिक पातळीवर आपण स्वतः कोणत्याही व्यसनांना बळी न पडण्याची व्यसनी पदार्थांना स्पर्शही न करण्याची शपथ घेवू या. व्यसनाधीनता ही आता राष्ट्रीय समस्या झाली आहे. महाराष्ट्र शासनाने तर कर मिळविण्यासाठी जागोजागी दारू मिळण्याची सोय केली आहे तसेच दारू बनविण्याचे परवाने आणि सुविधा दिल्या आहेत. यातून नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे. व्यसनमुक्तीसाठी शासनाच्या तात्कालीन व दीर्घकालीन योजना काय आहेत हे लोकांना कळावे म्हणून राज्यकत्र्यांनी तात्काळ एक श्वेतपत्रिका प्रसृत करावी असा आपण आग्रह धरू या.

३. एकूणच असहिष्णुता वाढल्याने अल्पसंख्याक समाज अस्वस्थ होत आहे. यातून हिंसक वृत्ती बळावते आणि कायदा व सुव्यवस्थेला धोक्यात आणणाऱ्या घातपाती कृत्यांना प्रोत्साहन मिळते. कुठेही दंगा झाला तरी त्याचे बळी दारिद्र्यात खितपत पडलेले दलित वर्गाचे लोकच असतात. त्यामुळे वैयक्तिक तसेच सामाजिक शांततामय सहजीवनाला धोका उत्पन्न होतो. अशांतता पुरुषी वर्चस्वामुळेही वाढते. त्यामुळे त्रस्त व निराश झालेल्या स्त्रिया आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त होतात. तेव्हा आपण आणखी एक शपथ घेवू या की आम्ही धर्म, जाती, प्रदेश, भाषा किंवा लिंग यांविषयी काहीही अहंकार किंवा श्रेष्ठत्वाची भावना मनामध्ये बाळगणार नाही; हिंसेचा कधीही गौरव करणार नाही; जे कोणी हिंसा करीत असतील, दंभ बाळगत असतील त्यांना शासनाने दंड द्यावा असा आम्ही आग्रह धरू.

४. एड्स हा आजकाल बोकाळलेला रोग समाजाला घातक ठरला आहे. नवविवाहित तरुणी या रोगाला हकनाक बळी पडतात आणि त्यामध्ये त्यांचे सर्वस्व लुटले जाते. हा रोग टाळण्यासाठी आपण विवाहबाह्य संबंध ठेवता कामा नये. आपला नवरा ‘एच आय व्ही पॉझिटिव्ह’ आहे हे लग्न झाल्यावरच मुलींना समजते. लग्नाआधी हा संसर्ग नसल्याचे प्रमाणपत्र नवरामुलगा देण्यास तयार नसतो. विवाहाच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून नोंदणी करताना असे प्रमाणपत्र देण्याची सक्ती व्हायला हवी. त्यामुळे प्रमाणपत्र मागणं आणि खबरदारी घेणं शक्य होईल. आणि भविष्यातील अडचणी टाळता येतील.
हे सारे कायमस्वरूपी बदल आपण घडवून आणू या. मान्स प्रत्येकाला या मोहिमेत तनमनधन अर्पण करून सामील होण्याचे आवाहन करीत आहे. ज्यांना या मोहिमेत सामील होण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांच्या जवळ असलेल्या अंनिसच्या शाखेशी संपर्क साधून माहिती मिळवावी.