विवेकवादाच्या काळातील श्रद्धा

ही हसन सुरूर यांनी लंडनहून दिलेली बातमी आहे, ‘ती खरोखरच चमत्काराने बरी झाली का?’ (द हिंदू, ऑगस्ट २०). हसन आपल्या लेखामध्ये धर्म आणि अडमुठेपणा (इर्रॅशनॅलिटी) यांच्यातील नातेसंबंधांचे अनेक मुद्दे उपस्थित करतात आणि ज्ञानाच्या प्रगतीबरोबर धर्माची अधोगती होत असते या पारंपरिक शहाणपणाचं खंडन करतात. या अहवालाची पाळंमुळं सर्व छोट्यामोठ्या धर्मांपर्यंत पोचत असल्याने या लेखाची पार्श्वभूमी थोडी समजावी म्हणून अहवालाबाबत थोडीशी माहिती देणे आवश्यक आहे.

व्हॅटिकनने कोणालाही संत म्हणून जाहीर करण्यासाठी त्या व्यक्तीने काही तरी चमत्कार करून दाखविल्याचा पुरावा आवश्यक असतो. मदर थेरेसा यांच्या नावावर असलेल्या चमत्काराचा पुरावा किती तकलादू होता ते पहा. एका ३० वर्षाच्या अशिक्षित मोनिका बेसरा नावाच्या बंगाली महिलेने हा चमत्काराचा पुरावा सादर केला होता. बेसराला एका असाध्य कर्करोगाच्या गाठीने पछाडले होते. मदर थेरेसा यांनी तिला त्यांच्या मृत्यूनंतर दिलेल्या आशिर्वादाने तिचा रोग चमत्काराने नाहीसा झाला आणि ती ठणठणीत बरी झाली. ह्यातील तीन महत्त्वाचे दावे ‘चमत्काराने’, ‘असाध्य‘ आणि ‘मरणोत्तर आशिर्वाद’ यांची छाननी करणं आवश्यक आहे. त्याची अधिकृत माहिती अशी: मे १९९८ मध्ये तिच्या पोटामध्ये प्रचंड मोठी कर्करोगाची गाठ असल्याचे निदान झाले होते. दोन महिने तिचे पोट इतके दुखत होते की ती उभी राहू शकत नव्हती. एक दिवस ती रखडत रखडत मदर थेरेसा यांच्या रायगंज येथील डेस्टिट्यूट होममध्ये पोचली. तिथल्या सिस्टर्सनी तिला औषध दिलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग त्यांनी मदर थेरेसाचा धावा करण्याचे ठरवले. हे काम मदर थेरेसाच्या पहिल्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे सेप्टेंबर ५, १९९८ ला केले. त्या दिवशी त्यांनी मदर थेरेसाच्या मृत देहावर जे चांदीचे पदक ठेवले होते ते बेसराच्या पोटावर बांधले. ते बांधल्यावर बेसरा गाढ झोपी गेली. ती जेव्हा जागी झाली तेव्हा कर्करोगाच्या गाठीचा थांगपत्ता राहिला नव्हता. अहवालानुसार बेसराचा दावा असा होता, ‘माझं फुगलेलं पोट खपाटी जावू लागलं आणि तीन दिवसात ते पूर्ण बरं झालं. मला खात्री आहे की मदर थेरेसानेच मला बरे केले.’

ह्या तिच्या दाव्याला लोकांनी आव्हान दिले. संडे टाइम्स या ब्रिटिश वृत्तपत्रात त्याला ‘मदर थेरेसाच्या संतपणाला भक्कम पाठिंबा देणारा तथाकथित जबरदस्त चमत्कार’ असं म्हटलं. अर्थात पुढील मजकुरात भर होता ‘तथाकथित’पणावर. ऑब्झर्वरने सरळ सरळ त्याबद्दल शंका व्यक्त केली. त्यांनी लोकांच्या नजरेस आणून दिलं की ही बेसरा कोण होती हेही अधिकृतपणे उघड केलेलं नाही. या सर्व प्रकरणात सिस्टर निर्मला आणि त्यांच्या पंथाने इतकी गोपनीयता बाळगली आहे की त्यामुळेच या बाबतीत अनेक शंका उपस्थित होतात; शिवाय बेसराच्या सांगण्यामध्ये बरीच विसंगती आहे. ऑब्झर्वरच्या रायगंज येथील वार्ताहाराने लिहिले आहे, ‘‘हेन्री डिसूझा या कलकत्त्याच्या आर्चबिशपने ‘नामांकित डॉक्टरांनी ट्यूमर खरोखरच नाहीसा झाल्याचे आणि हा चमत्कारच असल्याचे मान्य केले आहे’ असा दावा केला; परंतु त्याबाबत एका डॉक्टरने शंका उपस्थित केली आहे.

याच्याशी संबंधित आणखी एक गोष्ट, ‘धाडसी दावा: देव मानवी रूप घेतो’ या मथळ्या खाली रॉबर्ट एम् प्राइस म्हणतात, ‘‘पहिल्या शतकातील ख्रिश्चॅनिटीमधली केंद्रवर्ती व्यक्ती स्वतः ख्रिश्चन नव्हती. सायमन बद्दलच प्रेषितांपेक्षा जास्त लिहिलं गेलं आहे. सायमन स्वतःला एकमेव खऱ्या देवाचा अवतार मानत असे. सायमनची चमत्कार करण्याची ख्याती आणि स्वयंघोषित देवत्व यातूनच जीजस ख्राइस्ट हा ईश्वराचा अवतार असल्याची कल्पना जन्माला आली असं काही विद्वान मानतात. चमत्कारांमुळे सायमनला प्रसिद्धी मिळाली. त्याने रोमन बादशहा नीरो (इ.स. ३७-६८) याच्यावरही तथाकथित हवेतून उडण्याच्या चमत्काराने छाप पाडली होती. जस्टिन मार्टिनच्या रिपोर्टप्रमाणे इ.स.१७५ च्या सुमारास रोम आणि समारियामध्ये सायमनचीच पूजा होत होती. सायमनच्या देवत्वाच्या दाव्याचं महत्त्व ओळखून माटरने जीजस मधेच देवाचं मन समाविष्ट आहे असा जोरदार युक्तिवाद केला. ‘स्कूल ऑफ अलेक्झांड्रियाचे हे मुख्य तत्त्व बनले. याच इजिप्तमधल्या शहरात दुसऱ्या शतकाच्या मध्यावर ख्रिश्चन उच्च शिक्षणाची ही पहिली संस्था उभी राहिली. परंतु कॅथोलिक चर्चने जीजस हा देवाचा अवतार आहे असे मान्य करायला पुढील ३०० वर्षांचा काळ वादावादीमध्ये जावा लागला. त्याचा अर्थ असा झाला की जीजस हा खुद्द देवाचा अवतार आणि देवाचा पुत्रही मानला गेला.

वरील परिच्छेदातील कळीचे शब्द-चमत्कार करणे, देवत्व, पूजा, अवतार, देवाचा पुत्र, आणि देव-विशेष लक्षात घ्यायला हवेत. ह्यांच्यापैकी एकाही शब्दाचा अर्थ आजपर्यंत स्पष्ट झाला नसला तरी आजही ते सारे शब्द धर्म, धार्मिक संस्था, रूढी, आचार यांना आधार देवून वैधता आणण्यासाठी तुमच्या तोंडावर येताजाता फेकले जातात. प्राइसच्या या निवेदनाशेजारी सरूरचा ‘द हिंदूमध्ये प्रसिद्ध झालेला रिपोर्ट ठेवून बघा. तुमच्या लक्षात येईल २००० वर्षांपूर्वी उदयाला आलेला ख्रिश्चन धर्म आजही बदललेला नाही.

मदर थेरेसा, जिने आपल्या हळुवार जखमा भरून आणणाऱ्या स्पर्शाने कित्येकांना आधार दिला, जगातील दारिद्र्याने त्रस्त असलेल्यांसाठी जिने आपले आयुश्य वेचले, इत्यादी इत्यादी ती मदर आधीच जगामध्ये कीर्तीच्या आणि सन्मानाच्या शिखरावर पोचलेली आहे. अशा आणखी ‘मदर’ असत्या तर जग नक्कीच जास्त सुखी झालं असतं. देवमाणसांच्या मांदियाळीमध्ये किंवा मानवताधर्मामध्ये तिला अत्युच्च स्थान मिळालेलं आहे. परंतु तिच्या मृत्यूनंतर तिच्या संतत्वाबाबत उभे केलेले वादाचे मुद्दे मात्र चेटक्यांच्या तंत्रमंत्रासारखे वाटतात.

धर्मांमध्ये आणि विशेषतः प्रेशितप्रस्थापित धर्मांमध्ये चमत्कारांचं (जादू या अर्थी यातुधर्मांमध्ये असतं तसं) केन्द्रस्थानी असणं सर्वांनाच जाणवतं. चमत्कारांच्या जागी किंवा चमत्कारांसमवेत हिदू धर्मासारख्या ज्यांचे संस्थापक नाहीत अशा धर्मांमध्ये पुष्टी देणारी मिथके असतात. चमत्कार आणि मिथके हीच धर्माची जीवनदायी सुधा आणि धर्मांना तारून नेणारी नौका असतात आणि त्यांच्याविना धर्म शक्तिहीन होतील आणि रसातळाला जातील.

प्राचीन आणि मध्ययुगीन समाजामध्ये या गोष्टी असणं आपण समजू शकतो पण आधुनिक समाजामधे, २१व्या शतकात जागतिकीकरण होत असताना आणि सारं जग संकोच पावत एक खेडं होत असताना चमत्कार आणि मिथके केवळ कालविसंगतच नव्हेत तर विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विकासामध्ये आणि प्रसारामध्ये अडथळे बनत आहेत. आणि विशेषतः अनेक संस्कृती, धर्म आणि इतर वैविध्य असलेल्या समाजांमध्ये जिथे एकमेकांना विसंगत असलेल्या श्रद्धाप्रणालींना सहजीवन जगणे अनिवार्य असते अशा समाजांच्या मानवाच्या विकासामधेही अडचणी उत्पन्न करीत आहेत.

हे लक्षात घेता आधुनिक संदर्भामध्ये व्हॅटिकन सुद्धा एका डगमगणाऱ्या पायावर लटपटत आहे. मदर थेरेसाला संत ठरविणं किंवा तिला सद्गती मिळाली असं जाहीर करणं वेगळं; ती निःसंशय निसर्गाने निर्माण केलीली सर्वात महान उदात्त मानव होती. परंतु अशा व्यक्तीला संतपद बहाल करण्यासाठी, तिच्या मरणानंतर, कुणाला तरी ती चमत्कार करीत असे आणि अजूनही करते हे सिद्ध करायला लागावं हे वेगळं. मदरला न्याय देताना तिने कधीच चमत्कार करण्याच्या शक्तीचा दावा केला नव्हता हे मान्य करायला हवं. मला संतपद द्या असंही ती कधी म्हणाली नाव्हती त्यामुळे तिच्या मरणानंतर जे काही घडतं आहे त्याला ती मुळीच जबाबदार नाही. तिने जे निःस्वार्थीपणे काम केलं ते बघता हजारो बेसरा तिच्या चमत्काराचे पुरावे सादर करायला पुढे सरसावतील.
जगामध्ये कुठेही चमत्काराच्या घटना स्वतः पाहणारा साक्षीदार किंवा अनुभवसिद्ध पुरावा किंवा पडताळा पाहता येईल असा चमत्काराचा पुरावा उपलब्ध नाही. ज्याला चमत्कार मानण्यात येतं ते केवळ जादू, हातचलाखी किंवा सांगोवांगीच्या कथा असतं. या अर्थाने त्या चमत्कार करणाऱ्या पदकाचा आणि त्यातील चमत्कार करण्याच्या शक्तीचा दावा, ज्यावर इतरांनी विश्वास ठेवावा असं त्या नन्सना वाटतं ते सर्व गोंधळात टाकणारं, किंबहुना कपोलकल्पित आहे. अपरिहार्यतेच्या नियमातील (लॉ ऑफ द इनएव्हिटेबल) सम्भवनीयतेच्या घटकाचा (प्रॉबॅबिलिटि फॅक्टर) परिणाम म्हणून जरी याकडे पाहिलं तरी हा चमत्कार किंवा देवत्व ठरू शकत नाही.

जर त्या पदकाला मदरच्या आशिर्वादाने किंवा आशिर्वादाविना असाध्य रोग बरे करता येत असतील तर ‘सिस्टर्स ऑफ चॅरिटीने’ अशी लाखो पदके बनवावीत आणि जगातील सर्व रोग आणि व्याधी नष्ट कराव्यात. एका प्रसंगात मदर थेरेसा त्यांच्या हाकेला धावून आली तर ती पुन्हा दुःखनिवारणासाठी येणार नाही अशी शक्यता नाही. डॉक्टर्सनीही बेसराच्या रोगमुक्त होण्याला चमत्कार मानले असा नन्सनी केलेला दावा म्हणजे एखादीने आपण विमानापघातातून कसे आश्चर्यकारकपणे वाचलो हे सांगण्यासारखे आहे.

व्हॅटिकनचे हे चमत्काराचा पुरवठा करणे कदाचित त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी, टिकाव लागण्यासाठी आणि भोळ्या भाबड्या ख्रिश्चनांसाठी उपयोगी असेल; आणि विशेषतः जेव्हा पाश्चिमात्य जगात ब्रह्मचर्य, लैगिकता, प्रीस्टहुड बाबत मोठा ऊहापोह चालू आहे अशा वेळेस.

जर वैज्ञानिकांनी असं सिद्ध केलं की मदरने जे काही केलं ते जरी उदात्त असलं तरी सामान्य होतं, ऐहिक होतं. आणि तिला मरणोत्तर अलौकिकता बहाल करणं मान्य करता येणार नाही. व्हॅटिकन आधीच्या संतत्व बहाल करण्याच्या प्रसंगांचा विचार करून पारलैकिकातून ऐहिक आणि दैवत्वातून मानवी वेगळे करील का? त्यामुळे हिंदु आणि इस्लाम सारख्या इतर धर्मांनाही धडा शिकता येईल. सर्व जनतेच्या हितासाठी एवढेच नव्हे, जगाच्या कल्याणासाठी या मुद्यांचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. त्यामुळे जगातील गूढता, अविवेक, मूलतत्त्ववाद, तालिबानवाद, बुद्धाच्या मूर्तींचा विनाश आणि अशाच इतर कटु गोष्टी हळूहळू कमी होत जातील.

अखेरीस व्होल्टेअरने म्हटले होते, ‘माणसे कधीच स्वतंत्र होणार नाहीत जोपर्यंत शेवटच्या राजाला शेवटच्या प्रीस्टच्या आतड्यांनी गळफास केला जात नाही तोपर्यंत. पण जर राजा आणि प्रीस्ट एकवटले तर? व्हॅटिकनच्या पुढ्यात हाच तर पेचप्रसंग आहे.

पी राधाकृष्णन्
(‘द हिंदूच्या सौजन्याने)