अंनिसची अशी खात्री आहे की अज्ञानामुळे लोक अविवेकीपणाने वागतात आणि अंधश्रद्धा बाळगतात. त्यांना योग्य शिक्षण मिळालेलंच नसतं. शाळा-कॉलेजांमधून विज्ञानाचं शिक्षण घेतल्यावर लोक सुबुद्ध होतील आणि त्यांच्यात वैज्ञानिक मनोवृत्ती रुजेल आणि ते वैज्ञानिक, विवेकी आणि तर्कशुद्ध दृष्टीकोनातून आपल्या आयुष्याकडे पाहतील अशी आशा आपण बाळगली होती. परंतु देशाचं शैक्षणिक धोरण ठरविणाऱ्यांनी शिक्षणसंस्थांच्या कार्यामध्ये खीळ घातली आणि यामध्ये ज्यांचे हितसंबंधा गुंतलेले आहेत अशा शिक्षणतज्ञांनी आपली जनता प्रतिगामी बुरसट विचारांमधेच रुतलेली राहील अशी व्यवस्था केली. आपल्या देशात फार उच्च दर्जाचे समजले गेलेले पंडित केवळ इथले लोक ठेंगूच राहिले आहेत म्हणून उंच दिसतात.
जातीव्यवस्थेमध्ये बहुजनांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेल्याने ते अडाणीच राहिले. लिहायला-वाचायला शिकणं म्हणजे पाप आहे असं त्यांच्या मनावर ठसवलं गेलं. अशा तऱ्हेने बहुजनांना शेकडो वर्षे दूर ठेवणाऱ्या या स्वार्थी उच्च वर्णियांमुळे बहुसंख्य भारतीय दरिद्री अवस्थेला पोचलेले आहेत. सुमारे ४०० वर्षांपूर्वी युरोपमध्ये झालेल्या ‘पुनरुज्जीवन’ चळवळीमुळे झालेल्या सामाजिक उत्थानात लोकांच्या विचार करण्याची पद्धतच बदलून गेली; विज्ञान आणि तंत्रविज्ञानामध्ये नवनवीन शोध लागले; सगळं जगंच बदलून गेल; आधुनिक जीवनशैली प्रचलित झाली. परंतु या उलथापालथीमध्ये आपण कुठेच नव्हतो. बहुजनांना अडाणी ठेवणारी समाजाची परिस्थिती अशीच राहिली तर लवकरच आपण जगातील सर्वात मागास देश बनू. काही मूठभर श्रीमंत लोकांनी धर्म, शिक्षण, जमीनमालकी, व्यापार एवढंच नव्हे तर शासनाधिकार सुद्धा आपल्याच मुठीत ठेवले आणि स्वतः गब्बर झाले तर देश समृद्ध होत नाही. गरीबी हटाव म्हणून गरीब लोक नाहीसे करता येणार नाहीत. देशाची अनावस्था दूर होण्यासाठी, देश समृद्ध बनण्यासाठी बहुजन सुशिक्षित आणि विवेकी होणं आवश्यक आहे. संविधानामधल्या आदेशानुसार बहुजनांमधेही वैज्ञानिक मनोवृत्ती, जिज्ञासा आणि मानववाद जोपासला पाहिजे. हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे.
हे कर्तव्य अंनिस कसोशीने बजावत असते. पण हे कार्य बहुव्यापी आणि परिणामकारक होण्यासाठी – सुशिक्षित/अशिक्षित साऱ्या समाज घटकांमध्ये वैज्ञानिक मनोवृत्ती आणि दृष्टीकोन जोपासण्यासाठी- अंनिसला चांगली उपकरणे आणि प्रभावी साधनांची नितांत गरज आहे. या बाबतीत देशातील बहुसंख्यांचं अज्ञान नाहीसं करण्यासाठी एका जागी कायम स्वरुपाचं शैक्षणिक केंद्र उभरण्याऐवजी दूरवरच्या खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा पोचू शकेल असं एक फिरतं युनिट बनवावं असं अंनिसने विचाराअंती ठरवलं. असं युनिट जिथे गरीब व अशिक्षित लोक राहतात, जिथे शिक्षणाची काहीच सोय नसते अशा ठिकाणी पोचू शकेल. यातून विज्ञान बोध वाहिनीची संकल्पना साकारली. हे खास वाहन निर्माण करण्यासाठी अमेरिका आणि जपान या देशातील ‘रोटरी क्लब‘च्या शाखांनी मदत केली. हे वाहन म्हणजे एक चाकं असलेला ‘विज्ञानाचा वर्ग’ आहे. शहरातील झोपडपट्ट्या आणि दूरवरच्या खेड्यापाड्यातील बाल-तरूण-वृद्ध या सर्वांपर्यंत हा विज्ञान वर्ग पोचतो.
वाहिनीमध्ये असलेल्या गोष्टी: १. एक पुस्तकसंग्रहालय. त्यामध्ये प्राथमिक विज्ञान, पर्यावरण, आरोग्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांवरील पुस्तकं आणि पोस्टर्स आहेत. २. दूरदर्शक दुर्बीण (टेलिस्कोप). ३. विज्ञान, अंधश्रद्धा विरोधी मते इत्यादींच्या ऑडियो आणि व्हिडियो सीडीज . ४. ही उपकरणं वापरण्यासाठी लागणारी साधनं-सीडी प्लेअर, अँप्लिफायर, लाउडस्पीकर, मायक्रोफोन इत्यादी. ५. व्हीडियोची साधनं-व्हिडियो सीडी/डीव्हीडी प्लेयर, व्हिडियो प्रोजेक्टर, पडदा इत्यादी.
कार्यक्रमांची कार्यवाही: विज्ञान बोध वाहीनीच्या दौऱ्यातील कार्यक्रमांचे नियोजन बऱ्याच आधी केले जाते. या कार्यक्रमांमध्ये ज्यांना रस आहे अशा शाळांशी व शेड्यांशी संपर्क साधला जातो. ठरलेल्या दिवशी अंनिसचे कार्यकर्ते त्यात्या ठिकाणी जातात. प्रात्यक्षिके, पोस्टर्सचे प्रदर्शन, टेलिस्कोप हाताळण्याचा अनुभव, फिल्म शो, चमत्कारांच्या प्रात्यक्षिकांसमवेत स्पष्टीकरणाचं वक्तव्य इत्यादी माध्यमांमधून अंनिसचे कार्यकर्ते अंधश्रद्धा विरोधी संदेश लोकांपर्यंत पोचवून वैज्ञानिक मनोवृत्ती जोपासतात.