ऐसे कैसे झाले भोंदू | कर्म करोनी म्हणती साधू |
अंगा लाऊनिय राख | डोळे झाकून करिती पाप |
दाऊन वैराग्याच्या कळा | भोगी विषयाचा सोहळा |
तुका म्हणे सांगू किती | जळो तयांची संगती |
असा रोखठोक संदेश देणारे संत तुकोबाराय यांच्या विचाराना कृतीशीलतेची जोड देत, बुवाबाजी विरूद्धचा संघर्ष हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चळवळीचा नेहमीच आकर्षण बिन्दू राहिला आहे. मात्र बुवाबाजी या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. कथित बुबा-बाबा, स्वामी, महाराज, मांत्रिक, देवऋषी, काही स्वतःला आध्यात्मिक दैवी शक्ति प्राप्त आहे, असे सांगणारे अध्यात्मिक बुवा-बाबा असे सर्वजण छुपेपणाने व खुलेपणाने प्रसार करत जनतेची मानसिक, आर्थिक व शारीरिक फसवणूक, दिशाभूल करण्याचा धंदा करत असतात. प्रत्येकाची कार्यपद्धती वेगवेगळी असते एवढेच .
भूत उतरवणारा भगत, करणी काढणारा मांत्रिक, हातातील कुंकवाचा बुक्का करणारी, अंगात देवी आलेली बाई, शरीरात नसलेली कुंडली जागृत करणारी माता आणि स्वत्तःला चमत्काराचा अवतार म्हणवून घेणारा एखादा बाबा हे सगळे आपापल्या पातळीवर बुवाबाजीच करीत असतात .
चमत्काराशी जोडलेल्या या बुवाबाजीसोबत संघर्ष करणे तुलनेने सोपे असते. आणि असे अनेक संघर्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गेल्या 30 वर्षात आव्हानाच्या रूपाने तर कधी संघर्षा करून केलेले आहेत. असे चमत्कार घटनेतील वैज्ञानिक दृष्टीकोनाशी विसंगत ठरतात. उघडपणे शोषण व फसवणूक करणार्या अघोरी न अनिष्ट प्रथा यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या 18 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यामुळे अघोरी व अनिष्ट प्रथा यासाठी विशेष असा महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश 2013 हा कायदा महाराष्ट्रात लागू झाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शाखांच्या कार्यकर्त्यांच्या संघटित कामाच्या प्रभावामुळे आजपर्यन्त 600 च्या वर सर्व जाती धर्मातील भोंदूवर गुन्हे दाखल झाले. या कायद्या अंतर्गत पहिला गुन्हा हा नांदेड जिल्ह्यात मुस्लिम बाबावर दाखल झाला. यामुळे हा कायदा केवळ हिंदू धर्मियांसाठी व त्यांच्या विरोधी आहे हा खोडसाळ आरोप निकामी ठरला. या कायद्यांन्वये पहिला ऐतिहासिक निकालही भंडारा जिल्ह्यात 12 फेब्रुवारी 2015 रोजी लागला. त्यानुसार भोंदू बाबाला पाच वर्षे सक्तमजूरी व 50 हजार रुपये दंडही झाला. या दोन्ही घटना या कायद्याच महत्व अधोरेखित करतात. यामुळे ही लढाई थोडी सोपी झाली. पण अशा स्वरूपाचा कायदा नसतानाही उपलब्ध तोडक्या कायद्यांन्वये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अनेक वर्षे हा संघर्ष केला हे वास्तव आहेच.
माणसे बुवाबाजीकडे वळतात याची काही प्रमुख कारणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कामाच्या अनुभवातून शोधून काढली. त्यातील काही प्रमुख कारणे अशी, 1. अदृश्य दैवी शक्तीची भीती – जीवनात पुढे काय होणार ? याची मनातील चिंता. 2. मनातील अतृप्त कामनांची पूर्तता न होण – मनात असलेल्या असंख्य कामना पूर्ण होण्याची शक्यता नाही. यासाठी बाबाची दैवी शक्ती उपयोगी पडेल असा अंधविश्वास. 3. आरोग्य विषयक सुविधांचा समाजात असलेला अभाव – अनेक आजार त्यावरील महागडे उपचार यामुळे सोपा व कमी खर्चाचा मार्गं म्हणून दैवी शक्तीचा घेतलेला आधार. 4. मानसिक आजार – मानसिक आजाराबद्दल समाजात असलेल्या गैरसमजूती, त्याबाबत असलेले अज्ञान, त्यामुळे मानसिक आजाराला इतर आजाराप्रमाणेच आजार म्हणून समाजात नसलेली मान्यता, आणि लोकसंखेच्या प्रमाणात मानसिक आजारावर उपचार करणार्या तज्ञ डॉक्टर यांची कमतरता. 5.मनोकाईक आजार – आजार मनाचेच असतात पण व्यक्त होताना ते शरीरामार्फत होतात. जसे की देवीचे अंगात येऊन घुमणे. 6. वैफल्यग्रस्त स्त्रियांची मानसिकता – मनाला आधार देण्यासाठी पुरुष प्रधान संस्कृतीमुळे अनेक बाबतीत झालेले अन्याय. देव, धर्म, पूजापाठ, सत्संग यातून आधार घेता येतो कारण याला सामाजिक अनुमती असते ही भावना. 7. प्रारब्ध, नीयती , दैव या कल्पनांचा मनातील घट्ट पगडा – स्वत:च्या जीवनातील या बाबी बदलण्याचे सामर्थ्य कथित बाबात असते हा प्रचंड विश्वास. 8. आत्मा, परमात्मा, ब्रम्ह, परब्रम्ह, मोक्ष, मुक्ती यावरची श्रद्धा – अशा शब्दांचा बहूसंख्य समाजमनावर प्रभाव असल्याने बाबा-बुवा जवळचा वाटतो. 9. चमत्कारापुढे नमस्कार – दैवी शक्ती असल्याचे सांगून रिकाम्या हातातून एखादी वस्तू आपोआप निर्माण करणे उदा :- सोन्याची चेन , विभूती इत्यादी . 10. गुरु परंपरेला मान्यता – माझा गुरु जे सांगेल ते अंतिम सत्य, त्याच्यावरील अपार श्रद्धा यामुळे त्यांची चिकिस्सा रुचत व पचत नाही. 11. अगतिकता, अस्थिरता व अपराधी भावना – अचानक येणार्या नैसर्गिक अथवा कृत्रिम अशा कोणत्याही संकटामुळे येणारी अनामिक भीती. सध्याच्या कोविड 19 मुळे उद्भवलेली परिस्थिती हे याचे ताजे उदाहरण आहे. 12. विश्वाचे नियंत्रण करणारी कोणीतरी दैवी शक्ती व अवतारवाद – नियंत्रण करणारी कोणी तरी शक्ती अथवा अवतारवादी बाबा, अथवा देवाचा अवतार अशा समजुती. 13. धूर्तता व शक्यता अशक्यतेचा सिद्धान्त – धूर्त, कावेबाज , चाणाक्षपणे उत्तरे देणारे व मधुर बोलणारे बाबा यांना भुलणारी समाज मानसिकता. 14. सांस्कृतिक दृष्ट्या व्यक्त होण्याची गरज – आपल्याकडील ग्रामीण भाग व शहरातील अपार्टमेंट संस्कृती यामुळे सांस्कृतिक मोठे कार्यक्रम यांची कमतरता. ही गरज बाबा, स्वामी, भगत पूर्ण करतात. जसे की मोठे प्रवचन व सत्संग चे कार्यक्रम घेणे. 15. अचिकित्सक सामाजिक मन – खर काय, खोट काय ? इष्ट काय – अनिष्ट काय ? याबाबत विचार केला जात नाही. आंधळेपणाने विश्वास ठेवला जातो. 16. पैसा, सत्ता, प्रसार माध्यमे, गुंड यांची दहशत – बाबा-बुवा यांचा धंदा बरकतीला येणे व तो खुलेआम सुरू राहणे याला कारणीभूत आहे पैशाचे मोठे व्यवहार, त्या जोरावर पाळलेले गुंड, आणि राजकीय वरदहस्त. तसेच केवळ नफा मिळवण्यासाठी प्रसारमाध्यमाची साथ. 17. दैवी दहशत – करणी, भानामती यावर प्रचंड असलेला विश्वास आपले काही तरी वाईट करेल ही भीतीतून निर्माण झालेली दहशत व मानसिक दडपण. 18. सुसज्ज यंत्रणा – आधुनिक सर्व यंत्रणा वापरुन व भुरळ पडेल अशी सर्व रचना व निर्मिती असलेले बाबा बुवांचे दरबार. 19.धंद्याचे जाळे –अशा भोंदूगिरीचे मोठे जाळे असते. त्यांचा एकमेकांशी आर्थिक संबंध असतो. एकमेका सहाय्य करू आणि फसवू सर्व जनास असे जणू त्यांचे ब्रीदच असते. 20. राजमान्यता व लोकमान्यता – सर्वात महत्वाच म्हणजे अशा बाबा-बुवा यांना राजमान्यता तर असतेच कारण त्यांना जनमान्यता असते. मतांच्या राजकारणात जनप्रवाह ज्या बाजूला तिकडे राजसत्ता झुकतेच हे वास्तव आहे.
अशी अनेक कारणे बाबा-बुवांची जमीन सुपीक करण्यासाठी कारणीभूत आहेत. त्यातील या कारणांचा व त्यावरील उपायांचा समाजात प्रचार, प्रसार प्रबोधनाच्या व संघर्षाच्या पातळीवर गेल्या 30 वर्षात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने करत आहे. यामुळेच अशा स्वरूपाचे स्वंयसेवी काम करणारी ही महाराष्ट्रातील महत्वाची चळवळ ठरली आहे. व जनमानसात आज सर्वमान्य व विश्वासार्य बनली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीगेल्या 30 वर्षात केलेल्या या कृतीशील संघर्षाचा लेखी दस्तऐवज अनेक पुस्तकाच्या तसेच डिजिटल माध्यमाच्या रूपात जनमानसास वाचण्यास उपलब्ध आहेच .
शेवटी मंगेश पाडगावकर यांची बुवाशक्ती निरूपण यामधील काही ओळी समाजाचं अचूक वर्णन करतात त्या अशा ,
माणसे खपाट खंगलेली, आतून आतून भंगलेली
अदृश्य दहशतीने तंगलेली… आधार नाही,
प्रत्येकास येथे हवा, कोणीतरी जबरी बुवा
जो काढील सार्या उवा, मनातील चिंतेच्या
आधी म्हणायचे जय साई , मगचि अधिकारी लाच खाई
अजून पकडला गेला नाही, कृपा मानी बाबांची
आपण शोधायचे नाही, आपण लढाईचे नाही
आपण भिडायचे नाही आयुष्याला…..
कणा झिजून गेला पार, शिरजोरी पुढे सर्व लाचार …
बुवा नाम जपाचा उच्चार … नशा देई …..
या काव्यातील वस्तूस्थिला समाजातून बदलायचे असेल तर या लढ्यात आप-आपल्या पातळीवर शक्य तो सहभाग देणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वेब साईट वाचकाना याबाबत अधिक जाणून घेण्याची, अथवा या कामात कोणत्याही स्वरुपात सहभागी होण्याची मनोमन इच्छा झाली तर त्यांचे या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीत मनापासून स्वागत आहे.
प्रशांत एस. पोतदार
राज्य प्रधान सचिव,
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,सातारा.
मोबाइल नं. 9421121328