आपण अनेक प्रकारचे संत-महंत पाहिलेले असतात. मध्ययुगात भक्तीपंथाचे संत आणि सूफी संत सामाजिक सुधारणा आणि धर्मातील नैतिक मूल्यांचा पाठपुरावा करीत असत आणि आपल्या पंथामध्ये सर्वांचा समावेष करीत असत. अंधश्रद्धांना ते विरोध करीत आणि सर्व मानवजातीच्या एकजुटीवर भर देत असत. त्यामुळे अनेक धर्माचे लोक त्यांच्या भोवती गोळा होत असत.
आपल्याला असं वाटत असतं की जगातील सर्व संतमहात्म्यांनी आपल्या आचार-विचारांमध्ये सर्वांचं हित जपावं; ह्या परमप्रेमळ, आणि सुबुद्ध संतांनी स्वार्थासाठी सत्त्याचा विपर्यास करू नये आणि आपल्या दैवी सामर्थ्याचा उपयोग त्यांच्या भक्तांच्या लैंगिक वा इतर शोषणासाठी करू नये; ते कलुषित मतं, दांभिकता, हिंसा इत्यादी मानवी विकारांपासून मुक्त असावेत; आणि अशा संतांना खरेखुरे गूढ आध्यात्मिक परिप्रेक्ष आणि केवळ विभ्रम यातील फरक स्पष्ट दिसावा आणि त्यांचे चमत्कारपूर्ण रोगनिवारणाचे आणि संकटविमोचनाचे दावे खरे ठरावेत! पण दुःख हेच आहे की अगदी प्राथमिक स्वरुपाच्या विवेकनिष्ठ तपासणीमध्ये या अपेक्षांना खरा उतरणारा एकही संत अस्तित्वात नाही.
आज तरी साधुसंतांच्या पवित्र वस्त्रांमध्ये वावरणारे बाबा, गुरू वगैरे जुन्या पौराणिक धर्माचं पुनरुज्जीवन करू पहात आहेत; सामाजिक मूल्ये बाजूस सारीत आहेत आणि अनेक सामाजिक घटकांना डावलणारा पवित्रा घेत आहेत. श्रीमंतांना सुखशांती प्राप्त करून देणं हे त्यांचं मूळ उद्दिष्ट आहे आणि ते सत्ता आणि ऐश्वर्य यांच्या आसपास घोटाळत राहतात. अस्पृष्यता, हुंडाबळी, जातपातीची विषमता यांविषयी ते गप्पच असतात. या असल्या महात्म्यांमध्ये काहीजण तर त्यांची ऐशोआरामाची राहणी, त्यांची भाषा आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे कुप्रसिद्ध झाले आहेत. संतत्वाला बदनाम करीत आहेत.