ने.वि.प्र.

आत्मा पुन:जन्म

हिंदूच नव्हे तर पुनर्जन्म न मानणाऱ्या ख्रिस्ती धर्मियांमधेसुद्धा २० टक्के लोक पुनर्जन्म मानतात. जन्माला आल्यावर पहिला श्वास घेताच मेंदूला झटका बसतो आणि आत्म्याची पूर्वजन्मांची स्मृती विस्मृतीते जाते. नवीन मेंदूमध्ये फारच थोडी राहाते. असं सांगितलं जातं. प्राणिमात्राचा त्याच्या पूर्वजन्मातील कर्मांनुसार कोणत्याही प्राणी अगर वनस्पती योनीमध्ये जन्म होतो. अशा ८४ लक्ष योनीपैकी (स्पीसीज) मनुष्य योनीमध्ये जन्म मिळायला खूप पुण्यसंचय असावा लागतो. मनुष्य जन्म मिळाल्यावर त्याचा योग्य उपयोग न केल्यास पुन्हा नीच योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. मनुष्य जन्माचा उपयोग या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून बाहेर पडण्यासाठी करून घ्यायचा असतो. इत्यादी तर्कशास्त्र हिंदू धार्मिक मंडळी लढवत असतात. प्रथम दर्शनीच हा युक्तिवाद किती तर्कदुष्ट आहे हे कोणाच्याही लक्षात येईल. नास्तिक लोक तर आत्म्याचे अस्तित्वच नाकारतात. मानसिक-बौद्धिक व्यक्तित्वासंविषयीच्या(सायको-न्युरल आयडेंटिटी) गृहितप्रमेयानुसार मेंदूची अवस्था म्हणजेच मेंदूचे कार्य. सर्व बौद्धिक कार्य मेंदूच्याच कार्याशी निगडित असल्याने वैयक्तिक गुणावगुण, स्वभाववैशिष्ट्ये, ज्ञान, स्वसंवेद्यता इत्यादी सर्व एका जन्मातून दुसऱ्या जन्मातील मेंदूमध्ये स्थलांतरित होणे अशक्य कोटीतील ठरते. अशा तऱ्हेने वैयक्तिक ज्ञान-स्मृती-गुणावगुण यांचे स्थानांतर/देहान्तर (ट्रान्समायग्रेशन) शक्य आहे असे मानायचे झाल्यास वर्तनवादी मज्जाविज्ञानात (बिहेव्हियोरल न्यूरोसायन्स) आज होत असलेले संशोधन म्हणजे मूर्खपणाच ठरेल. तात्विक दृष्ट्या सुद्धा आत्मा मानवामध्ये शिरतो किंवा बाहेर पडतो, त्या शरीरावर आणि मनावर ताबा मिळवतो आणि तेही कोणाला त्याची चाहूलही न लागता असं मानणं कसं शक्य आहे? जोपावेतो एखादा शास्त्रज्ञ पुनर्जन्माचे खोटे ठरविण्यायोग्य (फॉल्सिफियेबल) गृहीतक मांडत नाही तोपावेतो या पूर्वजन्मातील स्मृती इत्यादी संकल्पना भ्रामक विज्ञान म्हणून रद्दबातल केल्या पाहिजेत.

तुम्ही एकदा स्वर्गाचं अस्तित्व मानलं म्हणजे त्याबरोबर पऱ्या आणि देवदूत आलेच. परंतु मुळात जर स्वर्गच नसेल तर तुमचा आनंद वाढवायला पऱ्याही नसणार आणि आशिर्वाद द्यायाला देवदूतही नसणार. १९ व्या शतकामध्ये या पऱ्या आणि देवदूतांबाबत बरीच गरमागरम चर्चा होत असे. एवढेच काय, शेरलॉक होम्सचे लेखक आर्थर कोनंडायल सुद्धा त्यांच्या बागेतल्या एका फोटोमध्ये दिसणाऱ्या पऱ्या खऱ्या आहेत असे समजत होते. तो फोटो कसा नकली आहे हे त्यांचा जादुगार मित्र हौदिनी याने सिद्ध करून दाखविल्यावर त्यांचा गैरसमज दूर झाला. तो फोटो दोन मुलींनी काही क्लुप्त्या वापरून काढलेला होता.

चमत्कार, काल्पनिक विलक्षण गोष्टी, जादूचे प्रयोग इत्यादींचं फार आकर्षण असतं. एवढंच काय हास्यास्पद तर्कविसंगत गोष्टी सुद्धा ऐकायला, बघायला आवडतं. अशक्य गोष्टींवर विश्वास ठेवून अनेक जण स्वतःची कष्टाने जमविलेले पूंजी सुद्धा भोंदू लोकांच्या नादी लागून गमावून बसतात. वेळोवेळी प्रभामंडल (ऑरा), चक्रतुला (चक्र बॅलन्सिंग), आध्यात्मिक उपचार, स्फटिकाच्या गोळ्यावर नजर रोखून भविष्याबाबत तर्क लढविणे, वास्तुशास्त्र, कर्मकोला, बम्र्युडा त्रिकोण, पिरॅमिड्स, टेलिपथी, गेलर इफेक्ट, रेकी, आत्म्याचं माध्यम या आणि अशाच अनेक गोष्टींना लोकांच्यामध्ये ऊत येत असतो. आणि प्रसारमाध्यमं असल्या खुळचट गोष्टींना खतपाणी घालीत असतात. कालांतराने लोकांचा भ्रमनिरास झाल्यावर एकेका गोष्टीचं वेड ओसरतं आणि लोक त्या विसरतात. पूर्वजन्मांमध्ये परत शिरणं हे असंच एक फॅड आहे.

पूर्वजन्म प्रतिगमन ही एक भ्रामक उपचारपद्धती आहे. ती आपण टाकूनच दिली पाहिजे. अमेरिकेमध्ये तर या उपचारपद्धतीने अनेक वाद उत्पन्न झाले; आपल्या मुलांच्या पूर्वजन्माबाबत मिळालेल्या माहितीमुळे त्यांच्याशी वाईट वर्तणूक करणाऱ्या बऱ्याच पालकांना यातना सहन कराव्या लागल्या, कारावासही भोगावा लागला. आपल्या छद्मी बोलण्यातून ते लोकांवर मोहिनी घालतात. या लोकांच्या बाबतीत आजार (अर्थात इतरांचा, त्यांचा स्वतःचा नव्हे) म्हणजे शिकण्याची संधी, अशक्य गोष्ट म्हणजे आव्हान, कल्पनाविलास हा उद्योग, श्रद्धा म्हणजे तिकिट आणि मृत्यू म्हणजे अवस्थान्तर असतं. यांच्यापासून सावध रहा.

हिप्नॉटिक रिग्रेशनचे तज्ञ असलेले लोक असं म्हणतात की, हिप्नॉसिसमुळे तुमच्या मनामध्ये चुकीच्या आठवणी मूळ धरतात. हिप्नोसिस हे ज्ञान व माहिती मिळविण्याचे साधन असू शकते का याबाबत बराच विवाद आहे. हिप्नोसिस म्हणजे हिप्नॉटिस्टने रुग्णाच्या मनात घडवून आणलेली काही विशिष्ट प्रकारची तंद्री किंवा समाधीसारखी अवस्था असते, का रुग्ण केवळ हिप्नॉटिस्टने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करीत असतो? हीच शंका पूर्व जन्माच्या आठवणींबाबत किंवा पूर्वजन्मामध्ये प्रतिगमन (रिग्रेशन) करण्याबाबत घेता येईल. हिप्नॉटिस्ट सूचना देवून रुग्णाच्या मनात काही कल्पना रुजवण्याचा आणि त्यातून विलक्षण कल्पित गोष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो.

खरं तर पर्यायी उपचार पद्धती म्हणजे धर्म, गूढवाद, लोककथा, आपरामानसशास्त्र, भ्रामक विज्ञान आणि वैद्यकीय ठोकता़ळे या सर्वांचं खदखदणारं रसायन असतं. त्यामध्ये सैद्धान्तिक खुळचटपणा ओतप्रोत भरलेला असतो. स्फटिकात पाहाणं, रंगचिकित्सा, गंध चिकित्सा, जलौपचार, पूर्वजन्म प्रतिगमन इत्यादींना अलिकडे प्रयोगसिद्ध आणि अनेक वर्ष उपयोगात असलेल्या उपचारपद्धतीला पर्याय म्हणून स्थान मिळत आहे. हे उपचार दिव्या दत्ता आणि तिच्यासारख्या इतर व्यक्ती या उपचारांना बळी पडत आहेत. जादू केल्यासारखे वाटणारे हे उपचार आंधळेपणाने अंगिकारल्यास काय परिणाम होवू शकतो हे कोणाही विवेकी माणसाच्या ताबडतोब लक्षात येते.

पूर्वायुष्य आणि भविष्य कथनाचा हा धंदा चेन्नईजवळ असलेल्या ताम्बरम येथे चालतो. भूतकाळ व भविष्यकाळ जाणण्याचे ढोंग करणारे हे भोंदू आपल्याकडे प्राचीन काळच्या ऋषींनी लिहिलेली ताडपत्रे असून त्यावर प्राचीन द्राविडी भाषेत सर्व माणसांचे भूत व भविष्य लिहिलेले आहे असा दावा करतात. त्यावर ते असेही सांगत असतात की हे सर्व लिखाण गूढलिपीमध्ये लिहिलेले असल्याने ते स्वतःच केवळ त्यावरील मजकूर वाचून त्याचा अर्थ लावू शकतात. त्यासाठी त्यांना त्या व्यक्तीची फक्त नाव, कुटुंबाची माहिती, गोत्र, जन्मस्थळ, जन्मवेळ, लिंग इत्यादी माहिती पुरवावी लागते. एवढ्यावरच त्या पौराणिक माहितीच्या जंजाळातून ते तुमचे भूत-भविष्य सांगू शकतात.

या भोंदूंची एक विशिष्ट कार्यपद्धती असते. त्याच्या सहाय्याने ते त्यांच्याकडे येणाऱ्या भोळ्या लोकांची बरीचशी माहिती गोळा करतात. त्यांच्या सेवेचा बराचसा मोबदला गिऱ्हाइकाकडून वसूल केल्यानंतर ते काही ताडपत्रे काढून तुम्हाला असं भासवतात की जणू तुमच्या जन्माअगोदरच तुमचं भविष्य प्राचीन ऋषीमुनींनी लिहून ठेवलेलं आहे. यावरील माहिती-नातेवाइकांची नावं, तुम्ही गेले असलेली स्थळं, जन्मखुणा, कामधंदा व मिळकतीविषयीची तपशीलं इत्यादी माहिती-त्यांना तुम्हीच पहिल्या भेटीमध्ये पुरविलेली असते. तीच माहिती त्यांनी ताडपत्रीवरून मिळविली असे तुम्हाला भासवतात. त्या ताडपत्रीवर नक्की काय लिहिले आहे किंवा त्या ताडपत्र्या कार्बन डेटिंगपद्धतीने किती जुन्या आहेत याचा शहानिशा करण्याचा आजपावेतो प्रयत्नच झालेला नाही. एक साधा विचार करा. त्यांच्याकडे जगातील सर्व माणसांचे भूत-भविष्य लिहिलेल्या ताडपत्र्या असल्या तर त्या सांभाळून ठेवण्यासाठी किती जागा लागेल?

इथे आश्चर्याची एक गोष्ट अशी की या सगळ्या थोतांडाचा पुरस्कार वायुसेनेतील एक अधिकारी करीत होता आणि या टोळक्याला पुण्याला आणण्याच्या खटाटोपात होता. असल्या भोंदूंवर आपला पैसा उधळायची लोकांना खोड असते. त्यांच्याशी फक्त योग्य तऱ्हने सलगी करून गोड बोलता आले पाहिजे. वास्तवात वावरतांना लोक अनुभवातून शहाणपण शिकत नाहीत. परंतु विवेक मात्र आपल्याला असल्या सर्व गोष्टींवर भाभडेपणाने विश्वास न ठेवता शंका उपस्थित करण्यास प्रवृत्त करतो. गोडगोड बोलून दुसऱ्या माणसांच्या मनामध स्वतःविषयी एकदा विश्वास निर्माण केला की मग त्यांना हवे तितके लुबाडता येते अशी या भोंदूंची शिकवण असते.

भूत

भुतांबाबत सर्व वयाच्या महिला आणि पुरुषांमध्ये फार कुतुहल असतं. एक क्रिकेट सोडलं तर हा एकच असा विषय आहे की ज्यावर प्रत्येकाला काहीतरी सांगायचं असतंच; एखाद्या भयानक प्रसंगाचं वर्णन जणूकाही सांगणारी व्यक्ती तिथे स्वतः हजर होती अशा आविर्भावामध्ये करायचं असतं. खरं तर तुम्ही जास्त खोलात जावून प्रश्न विचारलेत तर समजतं की ती सर्व माहिती पूर्ण ऐकीव आहे. कोणाकडून तरी केव्हातरी ऐकलेली! पण आश्चर्य असं की साऱ्या जगातील भुताखेतांच्या कथांमध्ये कमालीचं साम्य असतं. त्यातील आपल्याला माहीत असतं ते असं की-कोणीतरी मेलेलं असतं-अपघाताने, हृदयविकाराने किंवा म्हातारपणामुळे सुद्धा. मेल्यानंतर आत्मा शरीर सोडून जातो. मृत मनुष्य पुण्यवान असल्यास त्याचा आत्मा स्वर्गात व पापी असल्यास नरकात जातो. परंतु पुरेसे पुण्यवान अगर पापी नसलेले आणि अतृप्त इच्छा राहिलेले अधलेमधले स्वर्ग आणि नरक यामध्ये लोंबकळत राहतात. हे अतृप्त आत्मे म्हणजे भुते. पडकी घरं, जुनाट निर्मनुष्य किल्ले आणि जंगले किंवा पिंपळाच्या झाडावर राहतात. पौर्णिमा-अमावास्येच्या दिवशी त्यांचीही माणसांसारखीच पार्टी असते. ते केवळ रात्रीच जेवतात आणि त्यांच्याही आवडीनिवडी असतात. मटन, चिकन, लिंब, लोणी किंवा वेगवेगळ्या संस्कृतींनुसार त्यांच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात.
एक गोष्ट मात्र सगळीकडे सारखीच असते. आपण सगळेजण असं मानतो की देवाचं नाव घेतलं-रामराम-म्हणत राहिलं की भुतं पळून जातात. प्रत्येकाला १००% खात्री असते की भुतांना चेहरा नसतो, डोळे छातीवर असतात, सावली नसते, त्यांना आरशामध्ये आपले प्रतिबिंब दिसत नाही, त्यांची पावले उलटी असतात याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नसते. (अर्थात संशयवादी सोडून.)

Category: भूत

सजीवसृष्टीमध्ये अनेक जाती-प्रजाती आहेत. भूत ही जाती मात्र त्यामध्ये नाही. भुतं असतात पण केवळ आपल्या मनामधे. आपलं मन जी भुतंरंगवतं त्यांचे दोन प्रकार असतात. माया किंवा विभ्रमामुळे तयार झालेली भुतं हा आत्मवंचनेचा प्रकार आणि दुसरा प्रकार मानसिक असंतुलनामुळे भासणाऱ्या भुतांचा. आत्मवंचना ही जाणून बुजून केलेकी ढोंगबाजी तरी असते किंवा सांस्कृतिक अगर सूचनांच्या दबावा खाली घडलेलं वर्तन असतं किंवा इंद्रियजन्य कल्पना असतात. ह्यातील एका अगर अनेक कारणांमुळे आपल्या मनामध्ये भूत साकारतं.
ढोंगी लोक भोळ्या लोकांना आपल्या स्वार्थासाठी भूत असल्याची खात्री पटवून देतात. लहानपणापासून आपल्याला भुताखेतांच्या गोष्टी ऐकायला लागतात. त्यामुळे ती आहेत की नाहीत अशी शंकाही मनात न आणता आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. सूचना अमलात आणण्यास मानवी मन तत्पर असतं. सारं जाहीरातींचं जग आपल्या मनाच्या या तत्परतेवर अवलंबून असतं. सूचनांनुसार आपलं वर्तन बदलतं. आपल्याला जर कोणी भुतं असल्याचं खात्रीपूर्वक सांगितलं तर आपण त्यावर विश्वास ठेवतो. आपल्या इंद्रियांद्वारेच आपण ज्ञान मिळवत असतो.पण अनेक वेळा आपण केवळ कल्पना करतो- दोरीलाच साप समजतो. या इंद्रियभ्रमामुळे आपण अस्तित्वात नसलेली भुतंही असतात असं मानतो. सायकॉसिस या मानसिक आजारामुळेही भुतांवर विश्वास बसतो. मेंदूच्या कार्यांतील बिघाडामुळे कोणत्याही बाह्य कारणांशिवाय भुतांचं अस्तित्व जाणवतं.

Category: भूत

माझी आजी वारली त्या प्रसंगाची मला तीव्र आठवण येत असते. तिने आम्हाला सोडून जावू नाही असं आम्हाला फार वाटायचं. त्यामुळे भुताची कल्पना मला आवडायची; त्यामुळे मी आजीशी बोलू शकेन असं वाटायचं. आपल्याला भूतकाळाशी जोडणारं साधन म्हणजे ही भुतं. ती असावीत अशी आपल्याला जबर एच्छा असते.
आपल्या ह्या प्रबळ इच्छेचा उपयोग हे ढोंगी स्वयंघोषित चॅनलर करीत असतात; आपल्याला आपल्या प्रिय मृत व्यक्तीशी संपर्क करून देण्याचे आश्वासन देतात. आपल्याला मृत व्यक्तींशी मरणोत्तर संपर्क साधण्याचा जन्मसिद्ध हक्क मिळालेला आहे असे ही मंडळी मानतात किंवा भासवतात. यांच्या कारवायांचा विवेकवाद्यांनी तपास केल्यावर असं लक्षात आलं की ह्या मंडळींचं भोळ्या भाबड्या लोकांच्या दुःखाचं आणि भावनांचं भांडवल करून त्यांना लुबाडण्याचं मोठं षडयंत्र आहे.

Category: भूत

मध्याश्मयुगामध्ये भुताची संकल्पना उदयास आली असावी. ही कल्पना म्हणजे आदिमानवाने स्वप्नांचं स्वरूप आणि जीवन मरण यांच्यातील फरक जाणून घेण्यासाठी केलेला प्रयत्न असावा. कालांतरानुसार या कल्पनेमध्ये बदल होत गेले पण ती कल्पना टिकून राहिली कारण अनेक लोकांना या कल्पनेमुळे मरणाच्या भीतीतून थोडासा दिलासा मिळतो.
परंतु आता विज्ञानातील प्रगतीमुळे मानवी जीवन म्हणजे नैसर्गिक-भौतिक प्रक्रिया असतात आणि त्यामध्ये एखाद्या अतिभौतिक शक्तीचं अस्तित्व मानण्याची गरज नाही हे सिद्ध झालेलं आहे. शिवाय मानवासहित सर्व जीवसृष्टी जैविक उत्क्रान्तीच्या तत्त्वानुसार सिद्ध झाली आहे आणि ह्या नैसर्गिक प्रक्रियेमधून आत्म्यासारखे अतिनैसर्गिक सृजन होणे अशक्य आहे हे आता सर्वमान्य झाले आहे. आपण पूर्णपणे नैसर्गिक रीत्या घडलेलो आहोत आणि आपल्यामध्ये काही अतिनैसर्गिक अंश नाही असे मानण्यास पुरेसा आधार आहे.
आत्म्याचे अस्तित्व हा भूत मानण्यामागचा आधार आहे. हा आत्माच काल्पनिक असल्याने त्याचे अगर भुताचे इतस्ततः वावरणे हेही काल्पनिकच असणार.

Category: भूत

जगामध्ये काही घटना अशा असू शकतात की ज्यांचे स्पष्टीकरण अजून करता येत नाही. पण भुतांवरचा विश्वास ही तशी घटना नाही. भुतांचे अस्तित्व हा मानसिक विकार आहे आणि त्याचा आणखी अभ्यास व्हायला हवा असे शास्त्रज्ञ मानतात. मानसशास्त्र, मानवाचं वर्तन, मज्जाशास्त्र, मेंदूचं कार्य इत्यादींमधील अद्यावत संशोधनातून असं दिसून आलं आहे की भूतं ही माणसाच्या मनामध्ये कल्पनारूपाने असतात. बाह्य जगामध्ये त्यांना अस्तित्व नाही.

Category: भूत

Load More