धर्माने स्त्रियांवर लादलेलं दुय्यम स्थान

सर्वच धर्मांमध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा कनिष्ठ मानल्या जातात. प्रेषित पुरूष असल्याने प्रेषितांनी स्थापन केलेले धर्म पुरुषधर्जिणे असतात. ते पतीच्या सर्व हितसंबंधांची काळजी घेतात आणि त्याच्या पत्नीला घराच्या चार भिंतींमध्ये कैद करून ठेवतात.
हिंदु किंवा खरं तर वेदिक धर्म अपौरुषेय समजला जातो. म्हणजे हा धर्म माणसाने बनविलेला नाही. प्राचीन ऋषीमुनींच्या हजारो वर्षांच्या विवारमंथनातून हा धर्म उत्क्रान्त झाला. त्यामध्ये अनेक भिन्न मतांची दर्शने, उपासनेचे मार्ग, असंख्य देवदेवता, सर्व सृष्टीला कवेत घेणारा ब्रह्मा, आणि अगणित रूढी आणि कर्मकांडे आहेत. पण पुरुषश्रेष्ठत्वामध्ये हिंदू धर्म इतर कोणत्याही धर्माच्या मागे राहिलेला नाही. आमचा धर्म स्त्रियांची प्रतिष्ठा राखतो असे अनेक हिंदू ठासून सांगतात आणि आपल्या प्रतिपादनाला पुष्टी आणण्यासाठी ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते वसन्ते तत्र देवताः।।’ अशी वचने ऐकवतात, आणि गार्गी, मैत्रेयी यांच्यासारख्या विदूषींची उदाहरणे देवून आमच्या धर्मामध्ये विषमता नाही असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. पण खरी मेख आहे ती ते आपल्या घरातील व इतर स्त्रियांना आज कशा तऱ्हेची वागणूक देतात त्यामधे. ‘पायातली वहाण पायातच असली पाहिजे, तिला डोक्यावर घेवून चालणार नाही’ किंवा ‘कोपऱ्यातली केरसुणी दिवाणखान्यात आणून बसवायची नाही या दोन म्हणी स्त्रियांच्या आजच्या स्थितीचे यथार्थ दर्शन देतात. हाच आदेश थोड्या वेगळ्या शब्दांमध्ये प्राचीन ऋषीमुनींनी दिला होता. आणि हाच आदेश आजचे जगद्गुरू आणि इतर छोटेमोठे महात्मे देत असतात.
मनुस्मृती सारख्या नमुनेदार पुरुषश्रेष्ठत्वाच्या आचरणाच्या नियमावलीतील एक विधान वारंवार ऐकवलं जातं. ते असं: ‘स्त्रीने लहानपणी आपल्या पित्याच्या आज्ञेत रहावं, तरुणपणी लग्न झाल्यावर पतीच्या आज्ञेत व म्हातारपणी आपल्या मुलाच्या आज्ञेत रहावं; ती स्वतंत्र असण्यास पात्र नाही.’ प्राचीन भारतीय नारींच्या विद्वत्तेचं प्रतीक म्हणून जिच्याकडे पाहिले जाते त्या गार्गीला याज्ञवल्क्य ऋषी गार्गीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देता न आल्याने चिडून काय म्हणतात पहा. ते तिला धमकी देतात आणि शाप देत म्हणतात, ‘तुझ्या (स्त्री असल्याच्या) मर्यादा ओलांडू नकोस; गार्गी तू जर असं केलंस तर तुझं मस्तक धडापासून वेगळं होवून जमिनीवर पडेल!’ प्राचीन काळची गोष्ट सोडा. ऐतिहासिक काळातील उदारमतवादी आणि सहिष्णु समजला जाणारा संतकवी तुलसीदास स्त्रियांबाबत काय म्हणतो पहा; ‘शूद्र, गवार, पशू और नारी, ये सब ताडनके अधिकारी। स्त्रियांना मारण्याचा हक्कच तो पुरुषांना बहाल करून टाकतो.
सर्वच धर्म स्त्रियांविरुद्ध अरेरावी आणि विषमता दाखवतात. बायबलमध्ये असं म्हटलं आहे की ईश्वराने पुरुष घडविल्यानंतर, पुरुषासाठी, त्याच्या बरगडीपासून (पुरुषाला सहवास आणि सुख मिळावं म्हणून) स्त्री घडविली. ह्या आद्य स्त्रीने-ईव्हने- मनाई केलेले ज्ञानवृक्षाचे फळ खाण्याचे पाप केले. त्यामुळे अॅडॅम आणि ईव्ह -या मूळ पुरुषाची आणि मूळ स्त्रीची- दोघांचीही स्वर्गातून हकालपट्टी झाली. आणि त्यांना पृथ्वीवर आपलं जीवन जगण्याची कठोर शिक्षा भोगावी लागली.’ ज्यू धर्मियांमध्ये बायकोच्या हातून चुकून भाकरी जळण्यासारखा क्षुल्लक गुन्हा झाला तरी नवऱ्याला तिला या एवढ्या कारणावरून घटस्फोट देण्याचा अधिकार दिलेला आहे. मुसलमान धर्मियांमध्ये स्त्रियांना दोन प्रकारे असहाय्य बनवले जाते. पुरुषांना अनेक स्त्रियांशी लग्न करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि काहीही पोटगी न देता अगदी सहजपणे पती आपल्या पत्नीला घटस्फोट देवू शकतो. जैन मतानुसार स्त्रीला तपस्या आणि प्रायश्चित्त यांचं गांभिर्य समजण्याइतकी अक्कल आणि कुवत नसते. प्राचीन काळातील एक बुद्धिप्रामाण्यवादी समजले गेलेले धम्मप्रवर्तक गौतम बुद्ध यांचं सुद्धा स्त्रियांच्या बाबतचं मत वाईट होतं. त्यांचा पट्टशिष्य आनंद ह्याच्या आग्रहाखातर त्यांनी स्त्रियांना आपल्या भिख्खूंच्या संघामध्ये प्रवेश दिला असला तरी त्याबद्दल त्यांना खेद वाटत होता. कारण त्यांच्या मते बौद्ध धर्म जो पुढील १००० वर्षे टिकणार होता तो स्त्रियांच्या संघामध्ये प्रवेश करण्यामुळे आता केवळ ५०० वर्षेच टिकेल. भूतलावरील कोणताही धर्म विचारात घ्या; स्त्रियांना कनिष्ठ लेखून पुरुषांचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्नच केलेला असतो.
आता कोणी असं म्हणेल की या सगळ्या प्राचीन काळच्या गोष्टी झाल्या. आता स्त्रियांना गुप्त मतदानपद्धतीने मतदान करण्याचा हक्क मिळाला आहेच ना. जीवनाच्या सर्वच प्रांतांमध्ये त्यांनी आक्रमण करून तिथल्या पुरुषांची हकालपट्टी केली नाही का? राजकारण, उद्योगधंदा, सर्व व्यवसाय, शासन, एवढेच नव्हे तर अवकाश संशोधनासारख्या साहसी उपक्रमांमेधेही त्या आघाडीवर पोचल्या आहेत. स्त्रियांविरुद्ध कोणत्याही प्रकारे विषमता दाखविली जात नाही याचं कल्पना चावला या एक उत्तम उदाहरण आहेत. आता हे खरं आहे की काही अगदी मोजक्या स्त्रिया अशा शिखरस्थानी स्वतःच्या कर्तृत्वाने पोचलेल्या आहेत आणि पोचत आहेत. परंतु या स्त्रियांना असामान्य बुद्धिमत्ता लाभलेली आहे आणि त्या जागी प्रत्येक पायरीवरील विषमतेशी संघर्ष करून ती त्यांना ओलांडावी लागली आहे. प्रवाहाविरुद्ध इतक्या दमदारपणे पोहण्याची कुवत अशा काही मोजक्याच व्यक्तींमध्ये असू शकते. सर्वसामान्य स्त्रियांची समाजामध्ये काय परिस्थिती असते? जरा आजूबाजूला पहा; धर्माने मान्यता दिलेली आणि त्यामध्ये हितसंबंध असलेल्या पुरुषवर्गाने पोसलेली, स्त्रियांच्या विरोधात दाखविली जाणारी विषमता आणि त्यांची पराधीनता तुमच्या डोळ्यामध्ये सलू लागेल. स्त्रीभृणहत्या, स्त्रीअर्भकांची हत्या, हुंडाबळी, लहान मुलींवरील बलात्कार, असल्या रोज घडणाऱ्या अनंत घटना समाजाचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती हीन आहे याचेच द्योतक आहेत.
शनीशिंगणापूर हे महाराष्ट्रातील नेवासा तालुक्यातील एक गाव आहे. एका उंच चौथऱ्यावर स्थानापन्न झालेले शनीदेव तेथील आराध्यदैवत आहे. या चौथऱ्यावर चढण्याची स्त्रियांना मनाई आहे. या विषमतेविरुद्ध अंनिसने चार वर्षांपूर्वी धरणे धरले आणि ही विषमता दूर करून स्त्रियांना देवाच्या जवळ जावू द्यावे अशी मागणी केली. काही कडव्या हिंदुत्ववादी संघटनांनी धर्मसंरक्षणाच्या नावाखाली अंनिसला जोरदार विरोध केला. विरोधकांमध्ये स्त्रियांची संख्या जास्त होती यात आश्चर्य वाटायला नको. त्यातून स्त्रिया मानसिकदृष्ट्या कश्या गुलाम राहिलेल्या आहेत हेच स्पष्ट होते. स्त्रियांना खरोखरच स्वतःला कनिष्ठ मानून गुलामगिरीतच जगायचे आहे का?
मुळीच नाही. धर्मानेच त्यांना ‘ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान मुकाट्याने आपले भोग भोगावेत, तक्रार करू नये असे शिकविले आहे. स्त्रियांची ही गुलागिरीची मानसिकता समजून घेण्यासाठी त्यांच्यावर परंपरेने लादण्यात आलेल्या व्रतवैकल्य, कर्मकांड आणि सणसमारंभ, पूजा-अर्चा आणि अशा अनेक निरर्थक गोष्टींकडे पहा. हा सारा खटाटोप असतो तो स्त्रीच्या प्रबोधनासाठी नव्हे तर तिच्या नवऱ्यासाठी, तिच्या पुत्रांसाठी, तिच्या कुटुंबासाठी आणि या सर्वांमुळे तिला या जन्मी मिळणाऱ्या सुखासाठी आणि पुढील जन्मी यापेक्षा चांगलं जीवन लाभण्यासाठी! स्त्रियांना गुलामगिरीत ठेवण्यासाठी शोधून काढलेल्या या सर्व क्लुप्त्यांचा विचार करण्यासाठी एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल.
स्त्रियांना गुलाम बनविणाऱ्या धार्मिक रूढी आणि व्रतवैकल्ये: स्त्रीला पुरुषाच्या आधीन करणं हे सर्वच धर्मांचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट असावं. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे धार्मिक विधी, कर्मकाण्डे आणि व्रतवैकल्ये त्यांच्यावर लादण्यात आली जेणेकरून स्त्रिया धर्माचरणामध्ये (याला आध्यात्मिकता असं गोंडस नाव दिलं जातं) गढून जातील आणि कुटुंबाचा कारभार, तसेच सार्वजनिक जीवनातील घडामोडींपासून त्या अलिप्त राहतील. ज्या स्त्रिया आपली पत्नीची आणि मातेची भूमिका कसोशीने पाळतील (म्हणजे इतर गोष्टींमध्ये लक्ष घालणार नाहीत) त्यांना धर्माने अत्युच्च सभ्यता आणि आदराचे स्थान दिले आहे. परंतु त्यांची स्वतंत्रपणे धर्म आणि धर्माज्ञांची चिकित्सा करण्याची कुवत मात्र अमान्य केली आहे. धार्मिक लोक असं मानतात की स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा मिळविण्यासाठी संघर्ष केला तर परंपरागत चालत आलेली कुटुंबव्यवस्था बिघडेल आणि मानवतेलाच धोका उत्पन्न होईल. जी स्त्री स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय अगर सेवा न करता केवळ आपला पती आणि मुले यांच्या तैनातीत मग्न राहील तिलाच स्वतंत्र व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीपेक्षा जास्त मान देण्यात येतो. अगदी जगातील सर्वात प्रमुख असलेल्या राष्ट्राच्या ‘फर्स्ट लेडीलासुद्धा ती गृहिणी असली आणि केवळ नवऱ्याला गरज पडेल तेव्हाच सार्वजनिक मंचावर लोकांच्या दृष्टीस पडणार असेल तरच मान मिळतो. आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या स्त्रीला असा मान मिळत नाही.
स्त्रियांना घराच्या चार भिंतीआड डांबून त्यांना आपल्या मुठीमध्ये ठेवण्यास पुरुषांना धर्माने खूप मदत केली आहे. शेकडो वर्षे ही व्यवस्था सुरळीतपणे चालू राहिली होती. परंतु गेल्या पाच शतकांच्या कालावधीमध्ये पुनरुज्जीवन, औद्योगिक क्रांती, फ्रेंच व अमेरिक न क्रांती आणि दोन जागतिक युद्धं अशा एकानंतर एक घटना घडल्या आणि धर्माचा भक्कम पाया असलेला पुरुषी वर्चस्वाचा समाज हादरू लागला. हल्लीच्या भाषेतील पहिलं आणि दुसरं जग हादरू लागल्यावर थोड्याच कालावधीनंतर तिसऱ्या जगालाही हे हादरे जाणवू लागले. याची प्रतिक्रिया म्हणून धर्मसंस्थेने स्त्रियांना जबाबदार धरून कुटुंबाकडे दुर्लक्ष करण्यासाठी, स्वतःचं चारित्र्य मलीन करण्यासाठी आणि स्वतःच्या निसर्गदत्त जबाबदाऱ्या सोडून पुरुषांच्या क्षेत्रांत त्यांच्याशी अहमहमिका करण्यासाठी स्त्रियांना दोशी ठरवलं. स्त्रियांना पुन्हा त्यांच्या पूर्वापार मार्गावर आणण्यासाठी धर्म त्यांना पुन्हा सच्चे ख्रिश्चन, सच्चे मुस्लिम आणि सच्चे हिंदू बनविण्याचे आटोकाट प्रयत्न करीत आहे. स्त्रियांना पुन्हा पहिल्यासारख्या धार्मिक बनविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना धार्मिक रूढी, व्रतवैकल्यं, कर्मकांड यामध्ये पूर्णपणे गुंतवून टाकणे. भारतामध्ये अनेक धर्म नांदत असले तरी हिंदू धर्माचा या सर्व इतर धर्मांवर बराच प्रभाव पडलेला आहे. त्यामुळे हिंदूंच्या काही धार्मिक रूढी आणि कर्मकांडांचं विश्लेषण करून ह्या धार्मिक गोष्टी स्त्रियांमध्ये गुलामगिरीची मानसिकता कशी रुजवितात त्यावर प्रकाश टाकता येईल.
डॉ. आ ह साळुंख्ये यांनी अशा अनेक धार्मिक आचरणांचं परीक्षण करून त्यांचं खरं स्वरूप उजेडात आणलं आहे. अशा धार्मिक कर्मकांडांपैकी तुळशीचं लग्न हे एक कर्मकांड आहे. इतर कर्मकांडांप्रमाणे ह्याचाही उगम एका पौराणिक कथेमध्ये सापडतो. एकच नव्हे तर अनेक पौराणिक कथा यामागे आहेत. एका कथेनुसार तुलसी ही एक महान पतिव्रता असून शंखचूड नावाच्या एका राक्षसाची पत्नी होती. दुसऱ्या एका कथेमध्ये ती अशीच पतिव्रता असते पण दुसऱ्याच एका जालंधर नावाच्या राक्षसाची पत्नी असते. दोन्ही कथांमध्ये तुलसीच्या निष्कलंक पातिव्रत्यामुळे तिला अलौकिक शक्ती प्राप्त झालेली असते आणि तिचा पती (कथेनुसार शंखचूड किंवा जालंधर) अजिंक्य बनतो. दोन्ही कथांमध्ये भगवान विष्णू तिच्या पतीच्या रूपात तिच्यासमोर अवतरतात आणि तिचा उपभोग घेतात. त्यामुळे तिचे पातिव्रत्य नष्ट होतं आणि त्याबरोबरच तिची अलौकिक शक्तीही नष्ट होते. हे साध्य झाल्याबरोबर देव शंखचूडाला (किंवा जालंधराला) सहजपणे मारून टाकतात. (या दोन्ही कथा सविस्तरपणे ‘भारतीय संस्कृतिकोश’ विभाग ४ मध्ये दिल्या आहेत.) पण जेव्हा एक स्त्रीलंपट देव एका पतिव्रता स्त्रीचं चारित्र्य भंग करतो तो हा दिवस हजारो वर्षे त्या बलात्कारित पतिव्रतेचं त्याच बलात्कारी पुरुषाशी दर वर्षी लग्न लावून साजरा केला जातो. अर्थात ह्या बलात्काराचे समर्थन करण्यासाठी आपले पुराणकथाकार तुलसीच्या विष्णूशी एकरूप होण्याच्या पूर्वजन्मींच्या इच्छेचे जाळं आपल्यासमोर फेकायला विसरत नाहीत. भगवान विष्णूंनी तिची ही जन्मोजन्मींची इच्छा पुरी केली. (त्यासाठी ती कुमारिका असतानाच तिचा पत्नी म्हणून का स्वीकार करता आला नाही?) आमच्या या औधत्यपूर्ण विधानांबद्दल विष्णुभक्तांची माफी मागून असं विचारावसं वाटतं की हे विकृत मनोवृत्तीचे पुराणिकच आपल्या भन्नाट कल्पनांनी आपल्या देवदेवतांची अवहेलना करीत नाहीत का? या तुलसीविवाह नामक कर्मकांडाचा मतितार्थ काय? त्यातून स्त्रियांच्या मनावर हे बिंबवायचे आहे किंवा बिंबवले जाते आहे की स्त्रीची सारी शक्ती तिच्या पातिव्रत्यामध्ये साठलेली आहे; तिचा पति एखादा राक्षस जरी असला तरी ती त्याच्याशी एकनिष्ठच असली पाहिजे. आणखी एक गोष्ट. तिने बलात्कार आपले प्राक्तन म्हणून मुकाट्याने सोसला पाहिजे. पण आपण स्त्रिया हे अपमानास्पद कर्मकांड का साजरं करीत असतो? त्याचं कारण म्हणजे आपल्याला लहानपणापासून अशीच शिकवण दिलेली असते की ‘तुम्ही प्रश्न विचारायचे नाहीत. हुकूम ऐकायचे आणि निमूटपणे त्यांचं पालन करायचं. पुढील जन्मामध्ये यापेक्षा बरं जीवन मिळावं म्हणून कष्ट उपसत राह्यचं. वटपूजा, हरतालिका यासारखी आणखी अनेक व्रतवैकल्ये स्त्रियांना धार्मिकतेमधे, खरंतर निरर्थक कर्मकांडांमध्ये गुरफटून टाकतात. त्यामुळे रोजच्या कामाच्या रहाटगाड़ग्यातून बाहेर पडून स्वतःची उन्नती करण्याचा विचार करायलाही त्यांना फुरसत नसते. स्वातंत्र्यवीर सावरकर, वेदिक साहित्याचे गाढे अभ्यासक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि इतर अनेक पुरोगामी व्यक्तींनी आपल्या कर्मकांडांमधली अर्थशून्यता आणि खोडसाळपणा उघडकीस आणला आहे. शास्त्रीजी त्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करण्यात येणारा जादुटोणा आणि मंत्र तंत्र म्हणतात.
पण या नाहीतर त्या कर्मकांडाचं आपण योग्य पालन न केल्यास काहीतरी अघटित नक्की घडेल या दडपणाखाली आमच्या स्त्रियांनी सारा सारासार विचार बाजूला सारला आहे आणि आत्मविश्वास गमावला आहे. त्यांच्या कौटुंबिक कर्मकांडांचं पालन तर त्या करतातच पण इतरही दूरवरच्या सामाजिक-सांस्कृतिक गटांमध्ये रूढ असलेल्या कर्मकांडांचेही पालन करतात. करवा चौथ हे व्रत उत्तरभारतातील विवाहित स्त्रियांनी आचरण्याचे व्रत आहे. परंतु टीव्हीच्या मालिकांनी ते आता महाराष्ट्रातील स्त्रियांच्याही गळी उतरविले आहे. या दिवशी स्त्रिया निर्जळी उपवास करून रात्री चंद्रदर्शनानंतर नवऱ्याच्या हातून पाणी पितात. नवरे मात्र यथेच्छ खातात पितात आणि मजा करतात. यामध्ये सर्वात खटकणारी गोष्ट ही की सुशिक्षित आणि अर्थार्जन करून आपल्या कुटुंबाचे (आणि कधी कधी निरुद्योगी आणि व्यसनी नवऱ्याचेही) पालनपोषण करणाऱ्या स्त्रिया सुद्धा, आपली प्रकृती आणि आपली कार्यक्षमता बाजूस सारून, हे कष्टमय व्रत पाळतात. या कर्मकांडांच्या बरोबरीने आमच्या चालीरीती आणि रूढीपरंपरासुद्धा स्त्रियांना गुलाम बनविण्यामध्ये मोठं योगदान देतात. उदा: भारतीय नारीने आपल्या नवऱ्याच्या नावाचा उच्चार करायचा नसतो. त्याला त्याच्या नावने जर पत्नीने हाक मारलं तर त्याचं आयुष्य कमी होतं. अजूनही अनेक भोळ्या स्त्रिया भीतीने नवऱ्याच्या नावाचा उच्चार करीत नाहीत. कर्मकाण्डे आणि व्रतवैकल्ये कसोशीने पाळणाऱ्या या स्त्रिया असं समजतात की त्यांच्या या धार्मिकतेने त्या इतर कुटुंबियांपेक्षा जास्त पुण्यशील झाल्या आहेत आणि कुटुंबातील इतर निधर्मी व्यक्तींच्या पापांचेही क्षालन करीत आहेत.
इथे आपण केवळ हिंदू रूढी आणि रीतिरिवाजांचा विचार केला आहे. पण इतर धर्मही स्त्रियांना अशीच किंवा यापेक्षाही क्रूर वागणूक देतात. लहान वयातच मुलींच्या लैंगिक अवयवांचे विच्छेदन करण्याची आफ्रिकेतील मुस्लिमांची रूढी हा अत्याचारचा कळस आहे. त्यांच्यामध्ये कर्मठ नियमांनी बांधलेले पोशाखच स्त्रिया घालू शकतात. सर्वच धर्मातील ज्यांचं सत्ता काबीज करणं हेच खरं उद्दिष्ट असतं ते धर्मांध पुरुष स्त्रियांच्या वर्तनाचे आणि पेहेरावाचे नियम बनवतात आणि स्त्रियांना त्यांचं पालन करावं लागतं. स्त्रियांना योग्य मार्गावर ठेवण्यात पुरोहित वर्गाचं हित असतं. तरच त्यांना (म्हणजे पुरोहितांना, स्त्रियांना नव्हे) विलासी जीवन आणि त्यांच्या मताला राजकारणात महत्त्व मिळू शकतं।
हे सर्व सणवार, व्रतवैकल्यं, उपासतापास हे सर्व आपल्या संस्कृतीचं अंग समजलं जातं; त्यामुळे काहीही करून ह्या सर्व गोष्टींचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे असं धार्मिक लोक मानतात. परंतु इथे मेख अशी आहे की ही संस्कृती जतन करण्याची जबाबदारी सर्वस्वी स्त्रियांवर सोपविलेली असते. आणि स्त्रियांनीच याकडे दुर्लक्ष केलं तर परंपरागत कुटुंबपद्धतीच धोक्यात येईल. शिवाय यातून स्त्रीसुलभ आणि त्यांच्यामध्ये असणे आवश्यक असलेले असे सोशिकपणा, त्याग, दयाळूपणा, क्षमाशीलता इत्यादी समाजामध्ये प्रतिष्ठा मिळविण्यास गरजेचे असलेले सर्व गुण स्त्रियांच्यामध्ये रुजतात. ज्या स्त्रीमध्ये आत्मविश्वास असेल आणि जी ह्या सर्व भूलथापांचा अर्थ जाणू शकेल आणि स्वतंत्र विचार आणि त्यानुसार आचरण करील तिला समाजामध्ये असभ्य आणि छिछोर मानण्यात येते. जी स्त्री स्वतःला कनिष्ठ मानायला तयार नसेल तिला समाजात स्थान नाही. या सर्वाचा-स्त्रियांवर लादलेल्या धार्मिक आणि सामाजिक बंधनांचा- अर्थ एकच; आणि तो म्हणजे परंपरागत चालत आलेले विषमता, पुरुषसत्ता, सामाजिक विकृती आणि पुरुषी वर्चस्व धर्माच्या व संस्कृतीजतनाच्या नावाने अबाधित ठेवायचे.
या सर्व कालबाह्य धार्मिक कर्मकांड आणि उपासना इत्यादींबाबत समाजाने आणि विषेशतः स्त्रियांनी नव्याने विचार करण्याची आणि त्यांचा ताबडतोब त्याग करण्याची वेळ येवून ठेपली आहे. आपल्या आजच्या आचरणाचं समर्थन आपण पौराणिक वा़ंग्मयामध्ये शोधण बंद केलं पाहिजे. पौराणिक साहित्य नव्हे तर मानवी मूल्यांतून आपल्या आजच्या आचारविचारांचे मार्गदर्शन व्हायला पाहिजे. सर्वच धर्माच्या स्त्रियांची गुलामगिरीची मानसिकता बदलायला हवी. पण हे एका झटक्यात होणार नाही. ही प्रक्रिया गोगलगाईच्या वेगाने प्रगती करते. खरं तर स्वतंत्रपणे विचार करून आपल्या स्वातंत्र्याचा आणि उन्नतीचा मार्ग आखला पाहिजे. सूज्ञ, विवेकी पुरूष त्यांना सहयोग करण्यात नक्कीच पुढाकार घेतील. महिलांच्या जाहीरनाम्याचे हे संमेलन म्हणजे ह्या दिशेने टाकलेलं पुढचं पावूल आहे.