आत्म्याची संकल्पना

आत्मा ही संकल्पना मानसिक दृष्टीने मोलाची आहे. त्यामुळेच ती माणसाच्या मनामध्ये युगानुयुगे टिकून राहिली असावी. कालौघात स्वतःच्या अस्तित्वाची, तसेच आपण अमर नसल्याची जाणीव आणि आपला अंत कधी ना कधी होणारच ही भीती असणं केवळ माणसाच्या बाबतीतच शक्य आहे. कारण या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्व सजीव सृष्टीमध्ये हे जाणण्याएवढी बुद्धी केवळ माणसालाच लाभली आहे. सर्वांनाच अमर होण्याची इच्छा असते. तरीही आपल्या आतील ‘खरा मी’, आपला आत्मा जर अविनाशी असेल तर हे बाह्य शरीर सोडायला म्हणजे मरायला लोक तयार असतात. त्यांची अमरत्वाची आशा काही अंशी आत्मा या संकल्पनेमुळे सफल होते असं त्यांना वाटत असावं.

मानववंशशास्त्रज्ञ सर एड्वर्ड बर्नेट टायलर याच्या मते जीवात्मवादामुळे घटनांचं स्पष्टीकरण देता येतं. स्वप्न आणि आभास यांचं स्वरूप तसेच जिवंत असणं आणि मरणं यातील फरक या तात्त्विक समस्यांना बौद्धिक प्रतिसाद देता येतो एवढेच नव्हे तर इतर अनेक प्रकारच्या गरजांना -जशा आशा, भीती इत्यादी-प्रतिसाद देता येतो; स्वतःच्या तसेच आपल्या जीवनाशी संबंधित आपल्या आप्तांच्याही गरजा भागवू शकतो.

मध्य पुराणाश्मयुगामध्ये (पॅलिओलिथिक इरा) स्वनांचं स्वरूप समजून घेण्या साठी तसेच जगणं आणि मरणं यातील भेद समजण्यासाठी त्या काळच्या मानवाला आत्मा ही कल्पना सुचली असावी. कालांतराने या कल्पनेमध्ये थोडाफार फरक होत गेला तरी ती आजतागायत अस्तित्वात आहे कारण अनेक माणसांची मरणाची भीती आत्म्यावरील श्रद्धेमुळे बरीच कमी होवू शकते. परंतु आधुनिक विज्ञानातील प्रगतीमुळे हे कळून चुकलं आहे की नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया जीवनाचं संपूर्ण स्पष्टीकरण करू शकतात आणि त्यासाठी कोण्या अभौतिक चैतन्यशक्तीची कल्पना करणे मुळीच आवश्यक नाही. शिवाय आता आपण हेही मान्य करतो की मानवासहित सर्व जीवसृष्टी जैविक उत्क्रांतीमधून निर्माण झाली आहे आणि या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये आत्म्यासारख्या आधिभौतिक वस्तूची निर्मिती होण्यास वाव नाही. तेव्हा आपण -म्हणजे सर्व जीवसृष्टी -नैसर्गिक निर्मिती आहोत आणि कोणत्याही सजीवामध्ये एखादा अलौकिक घटक असणे शक्य नाही.