आकाश निरीक्षण

माध्यमांमुळे शहरातील काही लोक थोडेफार जाणकार झालेले आहेत. पण त्यांच्यातही विविध प्रकारच्या ‘हाय टेक् अंधश्रद्धा दिसतातच. खेड्यांमध्ये अजूनही अंधश्रद्धांच्यामुळे कितीतरी पैसे अनाठायी खर्चले जातात. खेड्यातील या लोकांना आणि विशेषतः मुलांना विज्ञानाच्या मूळ तत्त्वांची जाण करून द्यायलाच हवी जेणेकरून हा वायफळ खर्च करण्यापासून ते परावृत्त होतील. प्राधान्याने अनुसूचित जाती, जमाती आणि स्त्रिया यांनी बनलेल्या ह्या खेड्यातील समाजामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबतची जाण वाढावी म्हणून खूप जास्त प्रयत्न करायला हवेत.

ग्रामीण केंद्रस्थान: ग्रामीण भागामध्ये प्रयत्नांची शिकस्त करायला हवी हे लक्षात घेवून, तेथील जनतेच्या भावना न दुखावता, व्याख्यानं-प्रात्यक्षिकं इत्यादी शांततेच्या मार्गाने लोकांच्या मनामध्ये घट्ट रुजलेल्या अंधश्रद्धांचं निर्मूलन करण्यावर अंनिसने लक्ष केंद्रित केले. ग्रामीण भागातील काही सुजाण नागरिक अन्निसच्या या प्रयत्नांचं स्वागत करतात आणि आपली हलाखीची स्थिती आणि परंपरागत जीवनशैली असून सुद्धा अंनिसच्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देतात. काही छोटीमोठी शहरं सोडली तर महाराष्ट्र अजूनही वैज्ञानिक मनोवृत्तीच्या बाबतीत मागासच म्हणायला हवा. आदिवासी भागात तर अजूनही चेटुक आणि नरबळीच्या प्रथेवर लोकांचा विश्वास आहे. खेड्यावर/पाड्यावर काहीही संकट ओढवलं तर खेड्यातीलच एखाद्या स्त्रीला चेटकीण म्हणून लक्ष्य केलं जातं. ह्या सर्व गोष्टी टाळता येण्यासारख्या आहेत आणि त्यासाठी फारसा खर्चही करावा लागणार नाही पण स्वयंसेवी संस्थांनी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करण्याची मात्र नितांत आवश्यकता आहे.

फलज्योतिष, राशीचक्र, ग्रहांच्या गतीवर अवलंबून असलेल्या शुभ वेळ, दैव इत्यादी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी सर्वात जास्त परिणामकारक असलेले साधन म्हणजे आकाशदर्शन. परंतु ते केवळ एका टेलीस्कोपच्या सहाय्याने साध्य करता येणार नाही हे विज्ञानबोधवाहिनीचा कार्यक्रम राबवितांना लक्षात आले. वैज्ञानिक मनोवृत्तीचा पायाच मुळात विश्वाची उत्पत्ती आणि स्वरूप, विश्वशास्त्र, खगोलशास्त्र इत्यादींच्या प्राथमिक ज्ञानावर आधारित आहे. ह्याचे गरजेपुरते ज्ञान देण्यास तारांगणासारख्या साधनाची अंनिसला गरज भासली. या बाबतीत अंनिसने आयुकाशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडे असलेले तारांगण काही काळासाठी घेवून त्याची उपयुक्तता किती आहे याचा अंदाज औरंगाबाद येथील एका कार्यक्रमामध्ये घेतला. हा कार्यक्रम खूपच परिणामकारक व लोकप्रिय ठरला.

ह्या अनुभवामुळे अंनिसने एका वाहनामध्ये फिरते नभांगण घेवून ८वी आणि ९वी च्या दररोज २०० विद्यार्थ्यांसाठी जागोजागी आकाशदर्शनाचे कार्यक्रम राबविण्याची दोन वर्षांची योजना आखली. कलकत्त्याच्या नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम या संस्थेने असे फिरते तारांगण बनविले आहे. त्यांच्याकडे या योजनेचा प्रस्ताव पाठविला आहे. हे तारांगण मिळायला अजून बराच अवधी लागेल. मधल्या काळात अंनिसने आयुकाकडून तारांगण घेवून आपले ग्रामीण व शहरी भागातील आकाशदर्शनाचे कार्यक्रम सुरू ठेवले आहेत.

आकाशदर्शन योजनेची कार्यवाही: ह्या योजनेमध्ये आसपासच्या ग्रामीण विभागाचं प्रमुख केंद्र असलेल्या एका शाळेमध्ये एक फुगविण्याजोगे (इन्फ्लेटेबल) तारांगण ठेवायचे. या शाळेने आसपासच्या शाळांशी संपर्क साधून तेथून काही विद्यार्थी प्रदर्शन पाहण्यास बोलवायचे. एका वेळेस प्रत्येक वर्गातील २० विद्यार्थ्यांसाठी ३० मिनिटांचे प्रात्यक्षिक दाखविले जाईल. शाळेच्या वेळात ह्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना हजर राहता यावे यासाठी संबधित शिक्षण अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात येईल. अशा तऱ्हेने प्रत्येक दिवशी पाच तासांमध्ये २०० विद्यार्थ्यांना तारांगण पाहण्याची संधी मिळेल. प्रात्यक्षिकाच्या अगोदर व नंतरच्या कालावधीत विद्यार्थ्यांना पोस्टर्सचे प्रदर्शन, प्रश्नमंजुशा, आणि वक्तृत्व स्पर्धा अशा मनोरंजक व उद्बोधक कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. यातून विश्वाबाबतची बरीच माहिती ते मिळवू शकतील. प्रशिक्षित निवेदक तारांगणाच्या आतील घटकांची माहिती देतील. प्रात्यक्षिकामध्ये खगोलशास्त्र आणि विश्वशास्त्र, ग्रहताऱ्यांची स्थिती आणि त्याचा माणसाच्या दैनंदिन जीवनाशी काही संदर्भ आहे का याचे स्पष्टीकरण दिले जाईल.