अंधश्रद्धेचे धोके

‘‘उच्च शैक्षिणिक संस्थांमध्ये ज्योतिष शास्त्र शिकविण्यास सुरुवात करणे ही एक अधोगतीकडे नेणारी संकल्पना आहे.’’ असं सीताराम येचुरी गरजले. अंधविश्वासामुळे निर्माण होत असलेल्या धोक्यांबद्दल ते बोलत होते. ते म्हणाले, ‘मुरली मनोहर जोशी म्हणाले होते ज्योतिष शास्त्राचा शिक्षणामध्ये अंतर्भाव झालाच पाहिजे. कारण आपल्या पूर्वापार श्रद्धांचा आपण आदर केला पाहिजे, त्यावर विश्वास ठेवला पाहिजे.’ याबाबतीत त्यांनी एक किस्सा सांगितला, ‘नुकतेच चेन्नईमध्ये एक मंत्र्यांचं प्रतिनिधीमंडळ गेलं होतं. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी झाली होती. व्यासपीठावरील टेबलावर पाणी भरलेले पेले होते त्यातील एक प्याला रंगीत पाण्याने भरला होता. एक मंत्री महाशय तिथे पोचले आणि त्यांनी तो रंगीत पाण्याचा पेला पाहिला. आपल्यासाठीच हा सरबताचा पेला असणार असा त्यांना विश्वास होता. त्यांनी ते रंगीत सरबत पिवून टाकले. आणि पुढे तीन दिवस ते हॉस्पिटलमध्ये बिछान्यावर पडून राहिले. अंधविश्वासाचं फळ, आणखी काय? प्रत्यक्षात तो ‘खास सरबताचा‘ पेला नसून ती फुलदाणी होती. जुनी फुले काढून टाकून त्याजागी ताजी फुले आणून ठेवण्यासाठी माळी बागेत गेला होता.’ तेव्हा येचुरी म्हणतात, ‘विश्वास आणि वैज्ञानिक विचार करणं यामध्ये नक्कीच फरक आहे- तो म्हणजे तीन दिवसांचा हॉस्पिटलमधला मुक्काम!

‘या ज्योतिषशास्त्राप्रमाणेच शासनाचा ऐतिहासिक नोंदी बदलण्याचा इरादासुद्धा काळजी करायला लावणाराच आहे. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष यांना हिंदूधर्म हा शुद्ध आणि एतद्देशीय धर्म आहे हे सिद्ध करण्यासाठी आर्य लोकही एतद्देशीयच होते, ते बाहेरून भारतामध्ये आलेले नाहीत असेही सिद्ध करणे भाग असते. मग आर्य एतद्देशीय होते असं म्हणायचं तर मोहेंजोदारो आणि हरप्पा येथे आर्य संस्कृती होती हे सिद्ध करणं भाग आहे. या आर्य संस्कृतीचं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे घोडा. त्यांना जलद प्रवास आणि युद्धासाठी घोडे फार आवश्यक होते. हरप्पा आणि मोहेंजोदारो येथील उत्खननाच्या जागी घोड्याचं एक हाड सापडलं. लगेच ते सुतावरून स्वर्गाला पोचले. घोड्याचं हाड उत्खननाच्या आसपास असणं हा तेथील वसती आर्यांचीच होती याचा सबळ पुरावाच ठरवण्यात आला. परंतु त्या हाडाचं जेव्हा विश्लेषण करण्यात आलं तेव्हा असं समजलं की ते केवळ २०० वर्षांपूर्वीचं हाड आहे!

भाजपाच्या आणखी एका इतिहासकाराची एक लोणकढी थाप येचुरींनी सांगितली, ‘उत्खननाच्या ठिकाणी एका बैलासारख्या दिसणाऱ्या, पण लांब केस आणि आयाळ असलेल्या प्राण्याची मूर्ती सापडली. त्याची प्रतिमा अनेक कॉंप्यूटरमध्ये फीड करून काय निष्कर्ष निघतो ते पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका काँप्यूटरने निष्कर्ष काढला की तो घोडा असावा. मग तो घोडाच म्हणजे आर्य संस्कृतीचीच खूण असली पाहिजे आणि ज्या अर्थी तो भारतातील उत्खननात सापडला त्याअर्थी भारत हीच आर्यांची जन्मभूमी असली पाहिजे’. येचुरी पुढे म्हणाले, ‘आता तुम्ही जेव्हा बैलाला घोडा म्हणता आणि इतरांना बैलाची मूर्ती घोड्याची आहे असे पटवता तेव्हा तुमचं तत्त्वज्ञान आणि तुमचे सिद्धान्त कोणत्या प्रकारचे आहेत हे उघड होतं.

येचुरी जेव्हा विश्वविद्यालयामध्ये प्राध्यापक होते तेव्हाचा एक मजेदार किस्सा त्यांनी सांगितला, ‘एका प्रोफेसरसाहेबांनी आपल्या बागेमध्ये एक १० फूट खोल खड्डा खणला. त्यात त्यांना एका प्रकारच्या तारेचा तुकडा सापडला. ते धावत दुसऱ्या प्रोफेसर मित्राकडे गेले आणि म्हणाले पहा मला काय सापडलंय! यावरून हेच सिद्ध होतं की आम्ही भारतीय प्राचीन काळी फार प्रगतावस्थेत होतो. आमच्याकडे टेलिफोन होते! दुसऱ्या प्रोफेसरसाहेबांनी तोच खड्डा आणखी खोल खणला आणि त्यांना काहीच सापडलं नाही. मग ते पहिल्या प्रोफेसरसाहेबांकडे घाईघाईने गेले आणि म्हणाले, बघा मला काहीच सापडलं नाही! म्हणजे प्राचीन काळाच्याही आधी-अतिप्रचीन काळी-आपण भारतीय प्राचीन काळापेक्षाही जास्त प्रगत होतो. आपल्याकडे तेव्हा ‘वायरलेस होते.

‘हिंदुधर्माची शुद्धता मोजण्याबाबत येचुरी म्हणतात, ‘मी आंध्र प्रदेशचा आहे. आंध्र प्रदेशात मुलगी वयात येताच तिचं मामाशीच लग्न लावून दिलं जातं. उत्तर भारतामध्ये या प्रथेला हीन मानतात आणि असं करणाऱ्याला शिक्षासुद्धा होवू शकते. आता प्रश्न असा उभा राहतो की यांच्यातील सच्चा हिंदू कोणाला मानायचं?

‘ हिंदुधर्माचा शुद्धपणा मोजायचा प्रयत्न करणं किती निरर्थक आहे याचं ‘माहाबळी हे एक उत्तम उदाहरण आहे. केरळ प्रांतात आणि केरळी लोकांमध्ये ओनम हा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. कारण लोक असं समजतात की महाबळी हा उत्तम आणि कल्याणकारी राजा त्या दिवशी त्याच्या प्रजेला भेटायला येतो. आणि प्रजेचा हा लाडका राजा वर्षातून एक दिवस आपल्या प्रजेसमवेत घालवतो. उत्तर भारतामध्ये महाबळी हा एक राक्षस समजला जातो. जग वाचावं म्हणून विष्णूला त्याला पाताळात दडपून टाकावं लागलं. यापैकी सच्चे हिंदू कोणाला म्हणायचं? बळीची पूजा करणाऱ्या केरळी लोकांना की बळीला राक्षस मानणाऱ्या उत्तरभारतीयांना?

‘धार्मिक श्रद्धांना विरोध करणं म्हणजे रामाने कृष्णभक्तांना कृष्णाची पूजा थांबवा असं सांगणं आहे आणि उलटपक्षी कृष्णाने रामभक्तांना रामाची पूजा करण्यापासून परावृत्त करणं आहे. प्रत्यक्ष देवालासुद्धा कोणाची पूजा करा वा कोणाची पूजा करू नका हे सांगण्याचा अधिकार नाही. निरीश्वरवाद हाही एक विश्वास आहे. पण ईश्वर न मानणाऱ्यांनासुद्धा शिक्षा करण्याचा अधिकार देवाला नाही. देवालाच जिथे धर्म आणि धार्मिकतेबाबत काही सांगण्याचा अधिकार नाही तिथे हे भाजप आणि त्यांचे भगवे बांधव देवधर्माबाबत आम्हाला का सांगत असतात?

(सीताराम येचुरी, भारतीय कम्यूनिस्ट पार्टीच्या पोलिटब्यूरोचे मेंबर, यांनी ११ ऑक्टोबर २००३ ला निगडी, पुणे येथे दिलेल्या भाषणाचा गोषवारा. निगेल जे. शॉनेसी यांच्या उताऱ्यावरून.)