अंधश्रद्धा

अंधश्रद्धा म्हणजे त्या श्रद्धा आणि आचरण ज्यांना कोणत्याही पुराव्याचा आधार असत नाही आणि जे समाजाने गाठलेल्या प्रबुद्धतेच्या पातळीशी विसंगत असतात.

अंधश्रद्धेची ही व्याख्या विश्वविद्यालयाच्या पदवीच्या पाठ्यपुस्तकातून घेतलेली आहे. परंतु ती दुर्लक्षित राहिलेली आहे. ती खूप विस्तृत असून तिच्यामध्ये सर्व मानवी उपक्रमांची आणि ज्ञानाची सर्व क्षेत्रे समाविष्ट झालेली आहेत. या विधानाचं विश्लेषणात्मक स्पष्टीकरण असं: एखाद्या समाजाच्या श्रद्धा आणि आचार त्या समाजाच्या तत्कालीन ज्ञान आणि अनुभवांशी जोपावेतो सुसंगत असतील (ते ज्ञान व अनुभव चुकीचे असणे अशक्य नाही हे इथे लक्षात घ्यायला हवे) तोपावेतो त्या श्रद्धांना अंधश्रद्धा म्हणता येणार नाही किवा त्या तशा वाटणार नाहीत. याचं कारण त्या समाजाची प्रबुद्धतेची किंवा आकलनाची पातळी आजच्या जगाच्या पातळी एवढी उंचावलेली नाही. प्रबुद्धतेची पातळी उंचावण्यासाठी तर्कशुद्ध विचार करायला हवा आणि त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारायला हवा. ही वैज्ञानिक वृत्ती जोपासायची म्हणजे निरीक्षण, चाचण्या आणि त्यातून सिद्ध करता येण्याजोगी तथ्ये यांच्यावर आधारलेल्या जगाचं ज्ञान असायला हवं. हे मिळविण्यासाठी सहिष्णू वृत्ती असायला हवी.

तर्कशुद्ध विचार आणि प्राप्त असलेल्या ज्ञान व अनुभवांचं अन्वेषण करण्यासाठी विज्ञानासारखं दुसरं कोणतंही साधन नाही. याचा अर्थ असा नाही की केवळ महान पंडितांनाच तर्कशुद्ध विचारांची मक्तेदारी बहाल केलेली आहे. तर्कशुद्ध विचार करणं ही मानवाची उपजत वृत्तीच आहे. पण या वृतीला शतकानुशतके दडपून टाकण्यात आलेलं आहे. ज्या कोणाला खरा तर्कशुद्ध विचार करण्याची कुवत असेल तो विवेकीच आहे.

अनेक डॉक्टर, इंजिनियर, नेते आणि वैज्ञानिक सुद्धा खूप शिकलेले आणि पुरेसे प्रबुद्ध असतात आणि तरीही त्यांचा अंधश्रद्धांवर भरवसा असतो. अद्यावत सुखसोयींनी समृद्ध असलेली त्यांची राहाणी आणि सुखवस्तु जीवन असूनही त्यांच्या आचारामध्ये विज्ञान उतरत नाही; त्यांच्या रोजच्या जगण्यामध्ये ते वैज्ञानिक वृत्ती टाळतात. ह्या सर्व विद्वान मंडळींवर अंधश्रद्धा बाळगण्याची कोणी जबरदस्ती करीत नाही. पण तरीही ते अंधश्रद्ध असतात कारण एकतर ते मुळात स्वार्थी असतात नाहीतर त्यांना कशाची तरी भीती वाटत असते किंवा ते ढोंगी असतात. त्यांच्या या असमर्थनीय वागणुकीमुळे सामान्य लोक बुचकळ्यात पडले तरीही त्यांचंच अनुकरण करतात. त्यांचं हे तर्कदुष्ट वर्तन त्यांच्या प्रबुद्धतेशी पूर्णपणे विसंगत आहे. म्हणून त्यांना अंधश्रद्धाळू म्हटलं पाहिजे. असे मान्यता पावलेले विद्वान अंधश्रद्ध असण्याचं दुसरं कारण असं की ते विद्वान असले तरी ते तर्कशुद्ध विचार करीत नाहीत किंवा त्याबाबतीत सजग नसतात. विज्ञानाचा रोजच्या जीवनात वापर करणे त्यांना जमत नाही तसेच वैज्ञानिक वृत्तीने अंधश्रद्धांचं अन्वेषण करून त्यांच्या मागचं सत्य शोधून काढणंही त्यांना जमत नाही. खरं तर योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांना ते (वैज्ञानिक वृत्तीचा वापर करून अंधश्रद्धांचं अन्वेषण करणं) उमगतच नाही. अशा लोकांना मैत्रीपूर्वक सहानुभूतीने मार्गदर्शन करायला हवं.

साधारणतः अंधश्रद्धा धर्माचाच परिपाक समजल्या जातात. धर्म कधीच बदलत नाही; विज्ञान मात्र सतत बदल होण्याच्या प्रतीक्षेमध्ये असतं आणि ज्या बदलाची सत्यता सिद्ध होईल तो बदल स्वीकारतं. सर्व समाजसमूहांच्या स्थल-काल विशिष्ट पारंपरिक समजुती असतात; या समजुती सत्त्यतेच्या कसोटीवर खऱ्या उतरत नसतानाही त्यांना कवटाळून ठेवणं म्हणजेही अंधश्रद्धाच आहे. या अंधश्रद्धा अतिरेकीपणाला आणि मूलतत्त्ववादाला जन्म देतात. त्यामुळे मानवी प्रगती आणि विकासामध्ये अडथळा उत्पन्न होतो. त्याउलट सातत्याने बदल घडणं म्हणजे सतत उत्क्रांत होत राहाणं हा निसर्गाचा नियम आहे. जगण्यास जो सर्वात जास्त लायक तोच जगणार हा तर उत्क्रांतीचा कायदा आहे. गेल्या लाखो वर्षांच्या उत्क्रान्तीमध्ये जीवजातीच्या शारीरिक बळावर, ‘बळी तो कानपिळी’ या तत्त्वावर साऱ्या जीवजातींचं अस्तित्व अवलंबून होतं. पण मानवाचं पृथ्वितलावर आगमन झाल्यापासून हा नियम बदलला. इतर जीवजातींच्या मेंदूपेक्षा मानवाच्या मेंदूमध्ये काही खास अधिक आहे, आणि ते म्हणजे त्याची विचार करण्याची कुवत. ही कुवत नसती तर मानवजातीला निसर्गाच्या निर्दय परिस्थितीला टक्कर देत वाढत राहाण अशक्य होतं. आता माणसाच्या बद्धीची, विचारशक्तीची ताकद हाच तग धरून राहण्याचा नवा कायदा बनला. इथेच तर्कशुद्ध विचारप्रक्रियेला सुरुवात झाली. सुरुवातीस ही प्रक्रिया प्राथमिक स्वरूपाची आणि अपरिपक्व होती. ह्या तार्किक विचारप्रक्रियेच्या सहाय्याने मानवाने सभ्यता निर्माण केली आणि इतर प्राणिमात्रांबाबत आणि आपल्या प्रजातिबांधवांबाबतही कसलाच विचार न करता सारं जग पादाक्रांत केलं. विज्ञानाची धारदार तलवार माणसाच्या भल्यासाठी असल्याने ती विवेकबुद्धीच्या माणसांच्याच हाती राह्यला हवी.

आपली आजची सभ्यता आधुनिक आणि प्रगतीशील असली तरी ती पूर्वीपेक्षा चांगली आहे असं म्हणता येणार नाही. आपल्याला अधिकाधिक विवेकशील सभ्यता निर्माण करायला हवी. आपल्या सभोवतालच्या निसर्गाचे आणि त्यातील सर्व प्रजातींचे शोषण आणि संहार थांबवून अशा उत्तम पद्धती वापरल्या पाहिजेत की ज्यांच्यामुळे सर्वांच्या रास्त गरजा कोणताही धोका उत्पन्न न होता निरंतरपणे भागवता येतील आणि सर्वांना सुखाने आयुष्य कंठता येईल. तीच पूर्ण विवेकी, उच्च सभ्यता असेल.
टी एस् रासकर